बोंड अळीच्या चक्रव्यूहात साधले देशी कापसाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन
बोंड अळीच्या चक्रव्यूहात साधले देशी कापसाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन 
मुख्य बातम्या

बोंड अळीच्या चक्रव्यूहात साधले देशी कापसाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन

Chandrakant Jadhav

जळगाव ः केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्‍यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील अतुल मधुकर पाटील यांनी गुलाबी बोंड अळीच्या चक्रव्यूहात देशी कापसाचे सरासरी उत्पादन साधले आहे. बोंड अळीमुळे जिल्ह्यातील इतर भागात पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र जानेवारीतच रिकामे करण्याची वेळ आली. पण अतुल यांच्या कापसाच्या पिकात अजूनही म्हणजेच एप्रिलच्या मध्यापर्यंत वेचणी सुरू आहे. लांब धाग्याचा गुणवत्तापूर्ण कापूस त्यांनी घेतला असून, त्याला दरही अधिक मिळतील, अशी स्थिती आहे.  अतुल यांच्याकडे ५० एकर शेती आहे. ते दरवर्षी १० एकरात कापसाची लागवड करतात. केळी घेऊन रिकाम्या झालेल्या क्षेत्रात बेवड म्हणून मागील आठ वर्षे कापसाच्या देशी सुधारित बियाण्याची लागवड ते करीत आहेत. यंदा पिंप्री शिवारात देशी सुधारित बियाण्याची १० एकरात लागवड केली होती. जमीन मध्यम स्वरूपाची आहे. पलटी नांगराने खोल नांगरणी करून नंतर जमीन भुसभुशीत केली होती. पाच बाय सव्वा फुटावर ९ जून २०१७ ला लागवड केली. इनलाइन ड्रीप सिंचनासाठी टाकली.  लागवडीनंतर २५ दिवसांत एकरी एक गोणी डीएपी व एक गोणी २०.२६.२६ रासायनिक खत (बेसल डोस) दिले. नंतर बेसल डोस म्हणून ५० दिवसात एकरी २५ किलो युरिया व २५ किलो पोटॅश, १० किलो सल्फर, पाच किलो झिंक आणि पाच किलो फेरस दिले. नंतर डिसेंबरपर्यंत दर १८ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये ड्रीपमधून दिली. तीनदा शेंडे खुडले. कारण वाढ जोमात होती. तरीही किमान आठ फुटांपर्यंत झाडांची वाढ झाली.  नोव्हेंबरमध्ये वेचणी सुरू झाली. डिसेंबरमध्ये गुलाबी बोंड अळीचा किरकोळ प्रकोप होता. लागलीच प्रिव्हेंटीव कार्यक्रम राबवून फवारण्या घेतल्या. या अळीच्या प्रकोपात या भागातील इतर शेतकऱ्यांना बीटी कापसाचे पीक मोडावे लागले. पण अतुल यांचे कापसाचे पीक डिसेंबरमध्ये हिरवेगार दिसत होते. यामुळे या कापसाची फरदड (दुसरा बहार) घेण्याचा निर्णय अतुल यांनी घेतला. पहिल्या वेचणीला जेवढा कापूस आला नाही तेवढा नंतरच्या वेचणीला आला. जानेवारीच्या अखेरीस वेचणी सुरू झाली. १५ एप्रिल २०१८ पर्यंत वेचणी सुरू राहिली.  एकरी १५ क्विंटल उत्पादन त्यांनी मिळविले आहे. कापसाचा दर्जा चांगला आहे. बोंडे व्यवस्थित उमलल्याने वेचणीला मजुरांना त्रास झाला नाही. किडका कापूस कुठे दिसत नाही. त्याचे प्रमाण सुमारे तीन टक्केच आहे. कापसाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळेल. अजून कापूस विकलेला नाही. या कापसाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यावर ऊतिसंवर्धित केळी रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे, असे अतुल म्हणाले. मी देशी कापसाचे उत्पादन मागील आठ वर्षे घेत आहे. केळीसाठी चांगले बेवड म्हणून देशी कापूस वाणांची लागवड करतो. यंदा उत्पादन बऱ्यापैकी आले. एकरी १८ ते १९ क्विंटल उत्पादन मी देशी कापसाचे घेतले आहे. यंदाही एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन हाती आले. बोंड अळीचे प्रमाण अतिशय कमी होते.  - अतुल पाटील, कापूस उत्पादक, केऱ्हाळे बुद्रुक,  ता. रावेर, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT