नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करून आंदोलकांनी संपात सहभाग घेतला. जिल्ह्यातील मालेगाव, दाभाडी, डुबेरे, सिन्नर, वावी या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
बंदची हाक दिल्यानंतर सर्वानुमते अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली. सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी बससेवादेखील बंद ठेवण्यात आल्या. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सकाळी श्रद्धांजली वाहून मराठा समाजाने शासनाचा निषेध केला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलकांनी डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करून बंदमध्ये सहभागी होत सरकारचे लक्ष वेधले.