कापूस
कापूस  
मुख्य बातम्या

अमेरिकन कापसावर २५ टक्के कर कायम; चीनचा माघारीस नकार

Chandrakant Jadhav

जळगाव ः चीन या हंगामातदेखील कापसाचा सर्वाधिक गरज (कन्झमशन) असलेला देश ठरला आहे. याच वेळी अमेरिकेतील विदेश व्यापार विभाग व इतर यंत्रणांसोबत चार-पाच बैठकांनंतरही चीनने व्यापार युद्धातून माघार घेण्यासंबंधी निर्णय घेतलेला नाही. अमेरिकन कापसावर जुलै, २०१८ मध्ये लादलेला २५ टक्के कर चीनने कायम ठेवला आहे. परिणामी, जागतिक कापूस बाजारात उलथापालथ झाली असून, त्याचे पडसाद आघाडीचे कापूस उत्पादक, निर्यातदार देशांमध्ये दिसत आहे. भारतात खंडीचे (३५६ किलो रुई) दर ४७ हजार ५०० रुपयांवरून ४५ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.  चीनने व्यापार युद्धातून माघार घेण्यास नकारात्मक पवित्रा कायम ठेवत या हंगामातील आपल्याकडील कापूससाठ्यातून (बफर स्टॉक) ३० सप्टेंबर २०१९ पूर्वी लिलाव प्रक्रियेतून कापसाची किंवा रुईची विक्री करण्याचा निर्णयही नुकताच जाहीर केला आहे. सुमारे आठ लाख टन कापसाची लिलावात चीन येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत विक्री करणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रकही चीनने जाहीर केले असून, प्रतिदिन १० हजार टन कापसाची लिलावात विक्री करण्यासंबंधी चीनने जाहीर केले आहे. चीनमध्ये या हंगामात आठ लाख ४५ दशलक्ष टन कापसाची गरज (कन्झमशन) राहिली आहे. चीन जगातला सर्वांत मोठा कापसाचा ग्राहक देश म्हणून या हंगामातही पुढे आला आहे.  अमेरिकेशी व्यापार युद्ध कायम ठेवत असतानाच पुढेही ब्राझील व ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारत, सुदान, बेनीन, ग्रीस, माली या देशांमधून अधिकाधिक कापूस आयात करण्यावर चीन भर देणार असल्याची माहिती मिळाली. अमेरिकेकडून या हंगामात चीनने कापूस आयात मागील (२०१७-१८) हंगामाच्या तुलनेत कमी केली आहे. त्यासंबंधीची माहिती जागतिक कापूस व्यापार क्षेत्रात कार्यरत संस्थांनी जाहीर केली असून, त्यानुसार चीनने मागील हंगामात फेब्रुवारीमध्ये अमेरिकेकडून सात लाख ३८ हजार टन कापसाची आयात केली होती. तर या हंगामात (२०१८-१९) फेब्रुवारीत फक्त तीन लाख १८ हजार टन कापसाची आयात केली आहे. तर ब्राझील, ऑस्ट्रेलियाकडून कापूस आयात वाढविली आहे.   चीनने २०१७-१८ मध्ये ऑस्ट्रलियाकडून पूर्ण हंगामात दोन लाख ८० हजारटन कापसाची आयात केली होती. या हंगामात मार्चअखेरपर्यंत चार लाख ४० हजार टन कापसाची आयात ऑस्ट्रेलियातून केली. तर ब्राझीलमधून तीन लाख ८० हजार टन कापसाची आयात या हंगामात केली असून, ही आयात मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे तीन लाख टनांनी अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.  चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध कायम असतानादेखील अमेरिका जगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार म्हणून समोर आला असून, तेथील निर्यात सुमारे १८० लाख गाठींपर्यंत झाली आहे. चीनने आपल्या कापूससाठ्यातून लिलावांची घोषणा व अमेरिकेसोबतचे व्यापार युद्ध कायम ठेवण्याचे संकेत देताच जागतिक कापूस बाजारात दरांवर दबाव आला आहे. देशातील शंकर-६, डीसीएच या प्रकारच्या रुईचे दरही दबावात आले असून, त्यात दोन ते तीन हजार रुपयांनी खंडीमागे घसरण झाली आहे.  सरकीचे दर देशात उच्चांकी पातळीवर देशात सरकीचे दर उच्चांकी पातळीवर पोचले असून, मागील २० ते २२ दिवसांत दरात क्विंटलमागे सुमारे ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. सरकीचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल असून, उत्पादनात या हंगामात २० टक्के घट झाली आहे. सरकी तेलासह पशुखाद्यास उठाव असल्याने सरकीची मागणी कायम आहे. या हंगामात देशात किंवा भारतात सुमारे ११ कोटी क्विंटल सरकी उत्पादनाचा अंदाज होता. परंतु, उत्पादन दोन कोटी क्विंटलने घटल्याची माहिती मिळाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT