`ई-पॉस मशिन'द्वारे धान्य वितरणात धुळे राज्यात नववे
धुळे : काळा बाजार राेखण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांत "पॉइंट ऑफ सेल'' अर्थात `पॉस' मशिन आणले असून, जिल्ह्यातील एकूण ९८० पैकी ९५९ रेशन दुकानदारांनी या मशिनचा नियमित वापर सुरू केला आहे. "ई-पॉस'' मशिनद्वारे धान्य वितरणाचे व्यवहार करण्यात धुळे जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर आला आहे.
स्वस्त धान्य दुकानांतील गैरप्रकारांना आळा बसावा, शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना रोखीने व्यवहार करणे सोपे व्हावे म्हणून बायोमेट्रिक सेल यंत्रणा बसविण्यात आली आहे. असे मशिन वापरण्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. धुळे जिल्ह्याचा नववा क्रमांक, तर नाशिक विभागात जळगाव १७, नगर १८, नाशिक २२, नंदुरबार ३७ व्या क्रमांकावर आहे.
ई-पॉसचा ९५९ दुकानांमध्ये वापर जिल्ह्यात एकूण ९८० स्वस्त धान्य दुकाने, तर १४ लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी ९५९ रेशन दुकानांमध्ये "पॉस मशिन''द्वारे धान्य वितरणास सुरवात झाली आहे. उर्वरित २१ दुकाने ही शिरपूरसारख्या दुर्गम भागातील असल्याने तेथे "नेटवर्क''च्या अडचणी येत आहेत. "पॉस''चा वापर सक्तीचा केल्याने सर्वच दुकानांमध्ये असे व्यवहार सुरू झाले आहेत.
व्यवहारात पारदर्शीपणा या मशिनच्या माध्यमातून रेशन दुकानदाराने किती धान्य आणले, किती ग्राहकांना व किती रुपयात दिले, याची अचूक माहिती मिळते. "जीपीएस'' प्रणालीसोबत संलग्न असलेल्या या मशिनमुळे रेशन दुकानदार आता ग्राहकांची फसवणूक करू शकत नाही, यामुळे थोड्या फार प्रमाणात का होईना धान्य वाटपात पारदर्शीपणा आला आहे.