Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean : सोयाबीन हंगामात दडलंय काय?

जागतिक पातळीवर २०२१-२२ च्या हंगामात महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांचे उत्पादन घटले. ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. अमेरिकेतील उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे. तसेच जागतिक उत्पादनात ११ टक्के वाढ होईल, असाही अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारतातील सोयाबीन हंगामात काय स्थिती राहू शकते? याचा घेतलेला आढावा...

अनिल जाधव

जागतिक तेलबिया उत्पादन (Global Oil Seed Production) २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६४३ दशलक्ष टनांवर स्थिरावण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (United States Department Of Agriculture) (यूएसडीए) दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन अधिक आहे. या हंगामात रशियामध्ये मोहरीचे उत्पादन (Mustard Production In Russia) वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मात्र सोयाबीन उत्पादन (Soybean Production In USA) कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच अमेरिकेतून सोयाबीन निर्यातही (Soybean Export From USA) कमी असेल. ब्राझीलची सोयाबीन निर्यात (Brazil Soybean Export) मागील हंगामाप्रमाणे २०२२-२३ मध्येही वाढेल. मागील वर्षात सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) ब्राझील जगात अव्वल आणि अमेरिका दुसऱ्या स्थानावर होती. चालू वर्षात रशिया आणि युरोपीय संघामध्ये सूर्यफूल उत्पादन (Sunflower Production) वाढीची शक्यता आहे. कारण या दोन्ही विभागांत सूर्यफूल लागवड (Sunflower Cultivation) वाढली आहे.

वर्षनिहाय जगातील तेलबिया उत्पादन आणि गाळप (दशलक्ष टन)

वर्ष…उत्पादन…गाळप

२०१८-१९…६०१…४८९

२०१९-२०…५८०…५०८

२०२०-२१…६०६…५०८

२०२१-२२…६००…५१०

२०२२-२३…६४३…५२९

देशनिहाय तेलबिया उत्पादन

चालू आर्थिक वर्षात तेलबिया उत्पादनात ब्राझील आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये यंदा तेलबिया उत्पादन १७ टक्क्यांनी अधिक राहील, असे यूएसडीएने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच अमेरिकेतही तेलबिया उत्पादन ४ टक्क्यांनी अधिक राहण्याचा अंदाज आहे. चीन आणि अर्जेंटिनातही तेलबिया पिकांचे उत्पादन वाढणार आहे. भारतातील उत्पादनही २ टक्क्यांनी अधिक राहून ४२ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी भारतात ४१ दशलक्ष टन तेलबिया उत्पादन झाले होते.

२०२२- २३ मधील देशनिहाय तेलबिया उत्पादन आणि गाळपाचा अंदाज (दशलक्ष टन)

ब्राझील…१५४…५४

अमेरिका…१३३…६५

चीन…६४…१३३

अर्जेंटिना ५७…४५

भारत…४२…३५

जागतिक सोयाबीन उत्पादन

जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला आहे. मागील वर्षी जगात ३५२.७ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. ते यंदा ३९१ दशलक्ष टनांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढेल. मागील हंगामात जागतिक खाद्यतेल बाजार तेजीत होता. त्यामुळे सोयाबीनला मागणी वाढली. परिणामी, दर तेजीत

आले. ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना या देशातील शेतकऱ्यांना मागील वर्षभरात चांगला दर मिळाला. त्यामुळे या महत्त्वाच्या तीन देशांत सोयाबीन लागवड आणि उत्पादन वाढीचा अंदाज आहे. जागतिक सोयाबीन गाळपही यंदा अधिक राहण्याची शक्यता आहे. मागील हंगामात जगात ३१३.७ दशलक्ष टन सोयाबीन गाळप झाले होते. मात्र यंदा ते ३२७ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादन आणि गाळप (दशलक्ष टन)

वर्ष…उत्पादन…गाळप

२०१८-१९…३६२…२९८.६

२०१९-२०…३४०…३१२

२०२०-२१…३६८…३१५

२०२१-२२…३५२…३१३.७

२०२२-२३…३९१…३२७

देशनिहाय सोयाबीन उत्पादन

चालू वर्षात ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन १८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर अमेरिकेत दीड टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत यंदा बऱ्याच भागांना दुष्काळी स्थितीचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील उत्पादनवाढ कमी राहण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनात यंदा १६ टक्क्यांनी उत्पादन वाढेल. मात्र भारतातील सोयाबीन उत्पादन जवळपास ४ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज ‘युएसडीए‘ने व्यक्त केला.

२०२२-२३ मधील सोयाबीन उत्पादन आणि गाळपाचा अंदाज (दशलक्ष टन)

वर्ष…उत्पादन…गाळप

ब्राझील…१४९..४९.५

अमेरिका…१२२.६…६१

अर्जेंटिना ५१…४१

चीन…१७.४…९५

भारत…११.५…१०

पेरुग्वे…१०…३.२

(सोयाबीन उत्पादन आणि गाळपाचे पायचार्ट शेजारी लावणे)

जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाटा (टक्के)

देश…हिस्सा

ब्राझील…३८.१०

अमेरिका…३१.३५

अर्जेंटिना१३

चीन…४.४७

भारत…२.९४

पेरुग्वे…२.५५

कॅनडा…१.५३

इतर…६.०६

जागतिक सोयाबीन गाळपातील वाटा (टक्के)

देश…हिस्सा

चीन…२९

अमेरिका…१८.६५

ब्राझील…१५.१३

अर्जेंटिना१२.५३

युरोपियन युनियन…४.२२

भारत…३

मेक्सिको…१.९८

इतर…१५.४९

भारतातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज

भारताचा विचार करता मागील पाच वर्षांत सोयाबीन उत्पादनात चढ-उतार पाहायला मिळाले. जगात भारताचे स्थान ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना आणि चीननंतर पाचव्या क्रमांकाचे राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशातील सोयाबीन उत्पादन ११५ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. मागील हंगामात देशातील उत्पादन ११९ लाख टनांवर पोहोचले होते. तर २०२०-२१ मधील उत्पादन १०४ लाख टनांपर्यंत झाले होते. देशातील सोयाबीन गाळप मात्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात ९७ लाख टन सोयाबीन गाळप झाले होते. ते यंदा १०० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

देशातील सोयाबीन उत्पादन आणि गाळपाचा अंदाज (लाख टन)

वर्ष…उत्पादन…गाळप

२०१८-१९…१०९…९६

२०१९-२०…९३…८४

२०२०-२१…१०४…९५

२०२१-२२…११९…९७

२०२२-२३…११५…१००

सोयापेंड उत्पादनाचा अंदाज

भारतात नॉ जीएम सोयाबीनचे पीक घेतले जाते. त्यामुळे भारताच्या सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असते. सोयाबीन गाळप केल्यानंतर तेल आणि पेंड मिळते. सोयाबीनचे दर प्रामुख्याने पेंडीच्या दरावर अवलंबून असतात. सोयापेंडचा मुख्य ग्राहक पोल्ट्री उद्योग आहे. ‘यूएसडीए‘ने यंदा २५७ दशलक्ष टन सोयापेंड उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षी मात्र सोयापेंड उत्पादन २४६ दशलक्ष टनांवरच स्थिरावले होते. २०१८-१९ मध्ये २३४ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा भारतातील सोयापेंड उत्पादन १४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. यंदा भारतात ८० लाख टन सोयापेंड निर्मितीची शक्यता आहे. तर मागील वर्षी देशात ७७ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती.

भारतातील वर्षनिहाय सोयापेंड उत्पादन आणि वापर (लाख टन)

वर्ष…उत्पादन…वापर

२०१८-१९…७६.८…५३.८

२०१९-२०…६७.२…५६.७

२०२०-२१…७६…५९.९

२०२१-२२…७७.६…६४.३

२०२२-२३…८०…६८

यूएसडीने यंदा भारतात सोयापेंड उत्पादन वाढीसह वापरही वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. भारतात यंदा सोयापेंडीचा विक्रमी वापर होईल. मागील वर्षी ६४ लाख ३ हजार टन सोयापेंडीचा देशात वापर झाला. तर यंदा ६८ लाख टनांचा वापर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशात एवढ्या प्रमाणात सोयापेंडीचा वापर झाला नाही. तर २०१८-१९ मध्ये सर्वांत कमी म्हणजेच ५३.८ लाख टनांचा वापर झाला होता.

सोयातेल उत्पादनाची स्थिती ः

देशात यंदा १८ लाख टन सोयातेल उत्पादन होईल. असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. हा अंदाज खरा ठरल्यास देशातील आतापर्यंतचे हे विक्रमी उत्पादन ठरेल. मागील वर्षी १७ लाख ४६ हजार टन सोयातेल उत्पादन झाले होते. तर २०१९-२० मध्ये देशातील सोयातेल उत्पादन १५ लाख १२ हजार टनांवर स्थिरावले होतं. त्याआधीच्या वर्षातील उत्पादन १७ लाख २८ हजार टनांवर झाले होते. म्हणजेच या वर्षात २ लाख १६ हजार टनाने उत्पादन कमी झाले. परंतु त्यानंतरच्या वर्षात उत्पादन जवळपास २ लाख टनांनी वाढले.

भारतात गरजेच्या तुलनेत सोयातेल उत्पादन कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. सोयातेल आयातीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. यंदा देशात उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्याने आयात कमी होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात ३८ लाख टन सोयातेल आयात झाली होती. ती यंदा ३७ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. भारताने २०१८-१९ मध्ये ३० लाख टन सोयातेल आयात केले होते. त्यानंतर ही आयात वाढतच गेली.

भारतातील सोयातेलाचा वापर आणि आयात (लाख टन)

वर्ष…वापर…आयात

२०१८-१९…४७.५०…३०

२०१९-२०…५१.२०…३६.२६

२०२०-२१…४९.३७…३२.४६

२०२१-२२…५५.३२…३८

२०२२-२३…५४.६७…३७

जागतिक उत्पादन खरंच वाढणार का?

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ११ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र सध्या अमेरिकेच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे येथील उत्पादन जवळपास ६० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच मागील हंगामात ब्राझील आणि अर्जेंटिनालाही दुष्काळ आणि पुराचा फटका बसला होता. त्यामुळे ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी घटले होते. तर अर्जेंटिनातील उत्पादन ५ टक्क्यांनी कमी राहिले. म्हणजेच एकाच हंगामात अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनाला दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे ब्राझील आणि अर्जेंटिनात सोयाबीन हंगामात वातावरण कसे राहते, यावरून जागतिक सोयाबीन उत्पादनाचा अंदाज खरा ठरेल, असे जाणकारांनी सांगितले.

भारतात काय स्थिती राहणार

‘यूएसडीए‘ने यंदा भारतात ११५ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत देशात यंदा सोयाबीन उत्पादन ४ लाख टनांनी कमी राहील. विशेष म्हणजे मागील हंगामात चांगला दर मिळाल्याने यंदा लागवड वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र तरीही ‘यूएसडीए‘ने देशात उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सोयाबीन गाळप यंदा तीन लाख टनांनी वाढणार आहे. त्यामुळे सोयापेंड उत्पादन वाढेल. कारण २०२१-२२ मधील जवळपास १० लाख ३४ हजार टन सोयाबीनचा साठा असेल. त्यामुळे देशात सोयापेंड निर्मिती वाढेल. त्याआधीच्या वर्षात साडेचार लाख टन साठा शिल्लक होता. सोयापेंड उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अडीच लाख टनांनी वाढणार आहे. मात्र देशातील सोयापेंड वापर जवळपास साडेचार लाख टनाने वाढेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला.

देशात यंदा मागील वर्षातील शिल्लक साठा १० लाख टन असेल आणि उत्पादन ४ लाख टनांनी घटणार आहे. तर गाळप वाढून सोयापेंड उत्पादन अडीच लाख टनाने वाढेल, मात्र वापर साडेचार लाख टनांनी वाढणार आहे. म्हणजेच यंदाच्या हंगामात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्यामध्ये जास्त तफावत नसेल. यंदाच्या हंगामातही सोयाबीनला चांगली मागणी राहू शकते. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. सोयाबीन हंगामात शेतकऱ्यांना पाच ते साडेपाच हजारांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT