Kolhapur News : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर सध्या स्थिर आहेत. देशांतर्गत बाजारात साखरेला क्विंटलला ३६०० ते ३७०० रुपये इतका दर मिळत आहे. देशात साखरेचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. उत्तर प्रदेश वगळता अन्य साखर उत्पादक राज्यांमध्ये साखर उत्पादन धीम्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे सध्या तरी अनेक कारखाने जुनी साखरच विकत असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने साखरेचे भाव वाढू नयेत यासाठी १५-१५ दिवसांच्या अंतराने कोटे दिल्याने साखरेच्या किमती अजूनही नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात ४२ रुपये किलोपर्यंत साखरेची किंमत गेली असली तरी कारखाना पातळीवर मात्र ही किंमत ३६०० ते ३७००, तर क्वचितप्रसंगी ३८०० इतकी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
दिवाळीच्या दरम्यान पंधरा दिवस साखरेला चांगली मागणी होती. या दरम्यान अनेक साखर कारखान्यांना ३७०० ते ३८०० रुपयांनी साखर विकता आली. दिवाळीनंतर बहुतांश बाजारपेठांतून साखरेला मागणी काहीशी कमी आहे. यंदा देशात साखरेचे उत्पादन कमी होईल या अंदाजामुळे मंदीचे वातावरण मात्र नसल्याचे चित्र आहे.
देशाचा साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत मात्र अद्याप नवी साखर ज्या प्रमाणात बाजारात येणे अपेक्षित होती तितक्या प्रमाणात आलेली नाही. महाराष्ट्रात आंदोलनामुळे जवळजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्के साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. कर्नाटकातही फारशी वेगळी परिस्थिती नाही.
यामुळे कारखान्याकडे मोठ्या विक्रीसाठी नवी साखर अजून उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनांचे आंदोलन संपले आहे, आता हळूहळू कारखाने गाळपास गती घेतील. येत्या पंधरा दिवसांत साखरेचे उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटकमध्येही गती घेईल, अशी शक्यता आहे.
औद्योगिक मागणीवरच भिस्त
गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी होणार हे निश्चित असल्याने त्याचा परिणाम यंदा देशांतर्गत बाजारावरही जाणवेल. मागणी कमी जास्त होत असली तरी एकदम मागणी कमी होण्याची शक्यता नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अन्न मंत्रालयाने डिसेंबर महिन्यासाठी २४ लाख टनांचा कोटा दिला आहे, जो नोव्हेंबरच्या तुलनेत १ लाख टन अधिक आहे. आगामी काळात शीत पेय उद्योगातून मागणी कशी राहते यावरच साखरेचे दर कितपत वाढतील हे सांगता येणार असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. दिवाळीनंतर मात्र काही दिवस ग्राहकांकडून मागणी कमी होणार असल्याने साखरेची भिस्त औद्योगिक मागणीवरच असणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.