Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Price Rise: व्यापार युद्ध निवळल्याने सोयाबीनच्या दरात वाढ

Trade War Update: चीन-अमेरिका व्यापार युद्धाला मिळालेल्या तात्पुरत्या विश्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असली, तरी ब्राझीलमधून होणाऱ्या स्वस्त पुरवठ्यामुळे आणि शुल्कवाढीमुळे अमेरिकन शेतकरी अजूनही अस्वस्थ आहेत.

Team Agrowon

Pune News: चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाला मिळालेला तात्पुरता विराम तसेच सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज यामुळे अमेरिकेत सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. मात्र चीनच्या बाजारपेठेत ब्राझीलशी असलेली स्पर्धा आणि नव्या हंगामाच्या तोंडावरील संभाव्य अनिश्‍चितता यामुळे दरवाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाला सोमवारी (ता. १२) ९० दिवसांसाठी विराम मिळाला. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या मालावर १४५ टक्क्यांऐवजी ३० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. तर चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर १२५ टक्क्यांऐवजी १० टक्के शुल्क लागू केले.

अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन निर्यातदार देश असून चीन सर्वांत मोठा आयातदार आहे. या दोन देशांमध्ये तोडगा निघाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. आता चीन अमेरिकेकडून जास्त सोयाबीन खरेदी करेल असे चित्र तयार झाल्याने सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा दिसून आली. मात्र या दर सुधारणेला मर्यादाही आहेत.

चीनच्या बाजारात अमेरिकेला ब्राझीलच्या सोयाबीनशी स्पर्धा करावी लागत आहे. चीनने ब्राझीलमधून आयात होत असलेल्या सोयाबीनवर शुल्क लावलेले नाही. त्यामुळे ब्राझीलचे सोयाबीन स्वस्त पडत आहे. तसेच ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाल्याने पुरवठाही चांगला आहे. चीनने आतापर्यंत गरजेच्या ७० टक्के सोयाबीन ब्राझीलमधून घेतले आहे. अमेरिकेच्या सोयाबीनवर चीनमध्ये १० टक्के शुल्क असल्याचा फटका बसेल, अशी चिंता अमेरिकेतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादकांसाठी चीनची बाजारपेठ खूपच महत्त्वाची आहे. २०२२-२३ मध्ये चीनच्या एकूण आयातीपैकी २८ टक्के सोयाबीन अमेरिकेतून आले होते. तसेच मागील काही वर्षांत अमेरिकेच्या एकूण निर्यातीपैकी निम्म्याहून अधिक सोयाबीन चीनला गेले आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांना फटका बसत आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धावर सध्या तात्पुरता तोडगा निघालेला असला तरी पुढे कधी काय होईल, याविषयी अनिश्‍चितता आहे. त्यामुळे चीनमधील आयातदार अमेरिकेशी मोठे आयात करार करताना दिसत नाहीत.

नव्या हंगामाच्या तोंडावर वाद उफाळणार

अमेरिकेत सध्या सोयाबीनची पेरणी सुरू आहे. निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली. पुढील तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये सोयाबीनची काढणीही सुरू होईल. नेमक्या त्याच वेळी व्यापार युद्धाचा मुद्दा पुन्हा तोंड वर काढणार आहे. सोयाबीन काढणीच्या तोंडावर शेतकरी वायद्यांमध्ये सोयाबीनचे व्यवहार करतात. हा काळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. मात्र त्यावेळी आयात-निर्यातीबद्दल अनिश्‍चितता असेल तर त्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल, अशीही भीती अमेरिकेच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

इतरही निर्यातीला धोका

ट्रम्प प्रशासनाच्या धोरणामुळे सोयाबीनबरोबरच अमेरिकेतील ज्वारी आणि पोर्क उत्पादनांच्या चीनमधील निर्यातीवर परिणाम होत आहे. ब्राझीलने याचा चांगलाच फायदा उठवला आहे. ब्राझील आता चीनला सोयाबीन, ज्वारी, पोर्क उत्पादने, चिकन यांची जास्तीत जास्त निर्यात करू पाहत आहे. ब्राझीलच्या उत्पादनांवर शुल्क नाही, अमेरिकेच्या उत्पादनांवर आहे; मग चीनी लोक महाग माल का घेतील, असा प्रश्‍न अमेरिकेतील शेतकरी उपस्थित करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT