Market Bulletin :
सोयाबीन दबावातच
सोयाबीनचे भाव दबावातच असून काहिसे चढ उतारही होत आहेत. सोयाबीनला आजही सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते.
एनसीडीईएक्सच्या खेरदी केंद्रांवरही सोयाबीन आज ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे दबावातच आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसात नरमाई
कापसाचे भाव दबावातच आहेत. तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक वाढत आहे. खेडा खरेदीही जोमाने सुरु आहे. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
तर वायद्यांमध्ये जानेवारीच्या सौद्यांमध्ये कापसाला ५६ हजार रुपये प्रतिखंडीचा भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात चढी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापूस बाजारातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
कांदा दरात सुधारणा
कांद्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. कांद्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. सध्या कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला.
सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर खरिप कांद्याची आवक अजून वाढलेली नाही. त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे. खरिपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील. परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.
हिरवी मिरची टिकून
बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहिसे चढ उतार सुरु आहेत. दुसरीकडे बाजारात मागणीही टिकून आहे.
परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
लसूण तेजीतच
बाजारात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारात लसणाची आवक खपूच कमी आहे. तसेच नवा माल बाजारात खूपच कमी प्रमाणात येत आहे. लसणाची आवक वाढण्याला आणखी उशीर आहे.
पण दुसरीकडे सणामुळे लसणाला चांगला उठाव आहे. यामुळे लसणाला चांगला भाव मिळत आहे. बाजारात सध्या लसूण २० हजार ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. पुढच्या काही आठवड्यांमध्ये लसणाची आवक काहीशी वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.