Pune News : कापूस दरात सुधारणा होण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. दुसरीकडे देशातील कापूस लागवड ७ जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात माघारलेली दिसते. त्यातच बहुतांशी कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाचा जोर अद्याप कमीच आहे.
त्यामुळे कापूस बाजाराचे लक्ष खरिपातील कापूस लागवड आणि पाऊसमानाकडे आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात कापूस लागवड जास्त आहे. तर महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लागवड पिछाडीवर आहे.
देशातील बाजारात कापसाचे भाव मागील तीन महिन्यांपासून दबावात आहेत. दर वाढत नसल्याने शेतकरीही कापूस विकत आहेत. आज देशातील बाजारात ३२ लाख गाठींच्या दरम्यान आवक झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर कापसाचे भाव आजही स्थिर दिसले.
कापसाला आज सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. देशातील वायद्यांमध्येही काल बाजार बंद होताना नरमाई आली होती. काल कापूस वायदे १४० रुपयांनी कमी होऊन ५६ हजार ८४० रुपयांवर बंद झाले होते
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव दबावात आहेत. जागतिक बाजारात सूत आणि कापडाला उठाव कमी आहे. त्यामुळे कापसाचा जागतिक बाजारातच नरमाई दिसून येत आहे.
याचा दबाव देशातील कापूस बाजारावर आला. भारतातूनही कापूस निर्यात यंदा घटली. तर सूत आणि कापड निर्यातही कमी आहे, असे निर्यातदारांनी सांगितले. त्यामुळे कापूस बाजाराला आधार देशातील कापूस लागवड आणि उत्पादनावर अवलंबून आहे.
आता पाहूयात कापूस लागवडीचं चित्र काय राहीलं… देशातील कापूस लागवड आतापर्यंत १२ टक्क्यांनी घटली आहे. उद्योगांच्या मते देशात आतापर्यंत जवळपास ८७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. तर गेल्याहंगामात याच काळातील लागवड ९९ लाख हेक्टरवर होती.
म्हणजेच आजपर्यंत कापूस लागवड १२ लाख हेक्टरवने पिछाडीवर दिसते. यंदा दक्षिण भारतातील कापूस लागवड सर्वात कमी दिसते. दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये तब्बल २१ टक्क्यांनी लागवड कमी दिसते.
सर्वाधिक पिछाडी कर्नाटकात
दक्षिण भारतात कापूस लागवडीत सर्वाधिक पिछाडीवर कर्नाटक आहे. कर्नाटकात गेल्यावर्षीपेक्षा ५४ टक्क्यांनी तर आंध्र प्रदेशात ३७ टक्क्यांनी कापूस लागवड पिछाडीवर आहे.
पंजाबमध्येही कापूस लागवड यंदा २६ टक्क्यांनी घटली आहे. तर गुजरातमधील लागवड गेल्यावर्षीपेक्षा आतापर्यंत ३० टक्क्यांनी आघाडीवर दिसते. तसेच मध्य प्रदेशातही लागडीने ३१ टक्क्यांनी आघाडी घेतली. राजस्थानमध्येही कापूस पेरा १० टक्क्यांनी अधिक दिसतो.
महाराष्ट्रात ३७ टक्के कमी लागवड
राज्यातील कापूस लागवड आतापर्यंत ३७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे कमी पाऊस. राज्यातील महत्वाच्या कापूस उत्पादक मराठवाडा आणि विदर्भात आतापर्यंत खूपच कमी पाऊस पडला. यामुळे कापसाच्या लागवडी खोळंबल्या आहेत.
मागील तीन दिवसांमध्ये काही भागांमध्ये पाऊस झाल्याने लागवडी सुरु झाल्या. पण आतापर्यंत केवळ १७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. गेल्यावर्षी ७ जुलैपर्यंत जवळपास २८ लाख हेक्टरवर कापूस लागवड होती. राज्यातील कापूस लागवडीला गती येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.