दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे संकेत
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे संकेत 
ॲग्रोमनी

दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे संकेत

Chandrakant Jadhav

जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक दाक्षिणात्य राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने कापसावर प्रादुर्भाव केला. त्याचा फटका जगभरातील कापूस बाजारपेठांना बसला असून, देशाचा कापूस ताळेबंदच बिघडला आहे. देशात फरदड कापूस येणार नाही हे गृहीत धरून दक्षिण भारतातील सूतगिरण्यांसह कापड उद्योगांनी कापूस (रुई) आयातीचा धडाका सुरू केला आहे. यामुळे देशात यंदा एक दशकानंतर प्रथमच सर्वाधिक कापूस आयात होणार असून, ही आयात १८ लाख गाठींवर जाईल, असे संकेत कापूस बाजारपेठेतील तज्ज्ञ, निर्यातदारांनी दिले आहेत. भारत जगातील आघाडीचा कापूस निर्यातदार देश आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया कापूस निर्यातदार देशांच्या रांगेत भारत आहे. परंतु यंदा गुलाबी बोंड अळीमुळे देशात कापूस दरवाढ १२ टक्के झाली. जगाच्या कापूस बाजारात ही दरवाढ सात टक्के आहे. दुसऱ्या बाजूला मागील वर्षाच्या तुलनेत डॉलर रुपयाच्या तुलनेत कमजोर दिसत असून, तब्बल पाच ते साडेपाच रुपयांनी डॉलरचे मूल्य कमी झाले आहे. महाराष्ट्र, सीमांध्र, तेलंगण, मध्य प्रदेशात कापसावर गुलाबी बोंड अळी आल्याने देशाचा कापूस उत्पादनाचा ताळेबंद चुकला आहे. सुरवातीला ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३४० ते ३५० लाख गाठींपर्यंतच उत्पादन होईल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी म्हटले आहे. यामुळे सर्वाधिक कापडमिला असलेल्या दाक्षिणात्य भागाला जबर फटका बसला असून, फरदडचे कापूस पीक येणार नाही म्हणून तेथील सूतगिरण्यांसह आघाडीच्या कापड उद्योगांनी रुईची आयात सुरू केली आहे. 

आठ लाख गाठींची आयात आजघडीला आठ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आयात झाली आहे. दरवर्षी कापूस हंगामाअखेर म्हणजेच १ ऑक्‍टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत सहा ते सात लाख गाठींची आयात व्हायची. परंतु यंदा कापूस हंगाम सुरू होऊन चार महिनेही पूर्ण झालेले नसताना आठ लाख गाठींची आयात झाली. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे १८ लाख गाठींची आयात होईल, असा अंदाज आहे. यामुळे मागील १० ते ११ वर्षानंतर प्रथमच सर्वाधिक कापूस आयात भारतात होईल, असे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  अमेरिकेकडून दहा टक्के रकमेवर आयात देशात मागील ३५ दिवसांपासून कापूस दर स्थिर आहेत. ३८ हजारांना विकली जाणारी खंडी (३५६ किलो रुई) ४१ हजार रुपयांवर पोचली आहे. अशातच अमेरिकेकडून खंडी आगाऊ १० टक्के रक्कम देऊन दाक्षिणात्य आयातदारांना मिळत आहे. १० टक्‍क्‍यांपुढील उर्वरित रक्कम पुढील वित्तीय वर्षात देण्याचा वायदा करून अमेरिकेकडून देशात कापूस आयात सुरू आहे. पुढे दरवाढ झाली तरी सध्या जे दर आहेत, तेच देण्याच्या अटीवर हे सौदे झाले असून, आजच पूर्ण रक्कम द्यायची नाही, त्यामुळे आयातदारांना परदेशातून आयात परवडणारी ठरत आहे. रुपया मजबूत होत असल्याने निर्यातीवर परिणाम झाला असून, १९ लाख गाठींची निर्यात झाली आहे. 

पाकिस्तानला पाच लाख गाठी निर्यात भारताचा कट्टर शत्रू असलेला पाकिस्तान भारतातील कापसाचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असून, तेथे सुमारे पाच लाख गाठींची निर्यात झाली आहे. सर्वाधिक साडेसात लाख गाठींची निर्यात बांगलादेशात झाली आहे. यासोबत इंडोनेशिया, व्हिएतनाम व काही प्रमाणात कझाकिस्तानमध्येही भारतातून कापूस निर्यात झाली असून, हंगामाअखेर ५० लाख गाठींची निर्यात अपेक्षित असल्याचे कापूस निर्यातदार दिनेश हेगडे (मुंबई) यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले. 

ताळेबंद चुकला भारतात ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३४० ते ३५० लाख गाठींचे उत्पादन शक्‍य आहे. ३२५ लाख गाठींची स्थानिक गरज होती. ही गरज भागविण्यासाठी आयातीचा धडाका आतापासून सुरू झाला आहे. ५० लाख गाठींची निर्यात अपेक्षित होती. सध्या निर्यातीला फारशी चालना नाही. ४० ते ४२ लाख गाठी कॅरी फॉरवर्ड (शिल्लक) म्हणून अपेक्षित होत्या, परंतु किती गाठी शिल्लक राहतील, हे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाने कुणीही स्पष्टपणे सांगू शकत नसल्याचे चित्र आहे.  जगाच्या तुलनेत देशात १२ टक्के कापूस दरवाढ झाली. स्थानिक गरज मोठी आहे. तीच पूर्ण करायची धावपळ कापड मिल, सूतगिरण्या व जिनिंगमध्ये आहे. उत्पादनातील घटीने पूर्ण ताळेबंदच चुकला आहे. कापूस आयातही अनेक वर्षांनंतर देशात वाढणार आहे. कापूस दरवाढ टिकून राहील.  - अनिल सोमाणी,  सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT