Wardha News : राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. दिवाळी तसेच रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या पैशाची सोय म्हणून शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत.
सद्या हिंगणघाट बाजार समितीत शनिवारी (ता. २८) १० हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनचे व्यवहार किमान ३६०० ते कमाल ४८०० रुपयांनी होत आहेत.
सोयाबीन काढणीचा हंगाम सद्या सुरु आहे. यलो मोझॅक तसेच बुरशीजन्य रोगांच्या परिणामी यंदा सोयाबीनची उत्पादकता एकरी अवघी २ ते अडीच क्विंटलवर आली आहे. बाजारात दरही दबावात असल्याने शेतकऱ्यांकडून आहे त्या परिस्थितीत सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढती असल्याचे चित्र आहे.
हिंगणघाट बाजार समितीत दररोजची सरासरी आवक दहा क्विंटलच्या घरात आहे. शनिवारी (ता. २८) ती १० हजार ५०० क्विंटलवर पोचली. मळणी यंत्राद्वारे काढल्यानंतर पोत्यात न भरता थेट ट्रॉलीतच टाकून सोयाबीन विक्रीसाठी आणण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. सोयाबीन काढणीनंतर ते पोत्यात भरल्यास मजुरीवर अतिरिक्त खर्च होतो.
तुलनेत बाजारात दर नसल्यामुळे हा पर्यायी मार्ग अवलंबिला जात आहे. सोयाबीनमध्ये १२ टक्के आर्द्रता पाहिजे. परंतु बाजारात सद्या १९ ते २० टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन विक्रीसाठी येत आहे.
त्याचाही परिणाम दरावर होत असल्याचे बाजार समिती सचिव तुकाराम चांभारे यांनी सांगितले. शनिवारी बाजारात आलेल्या सोयाबीनला ३६०० ते ४८०० रुपयांपर्यंत दर मिळाला तर हमीभाव ४६०० रुपये इतका आहे.
बाजारात सोयाबीनची आवक वाढती असून ती सरासरी १० हजार क्विंटलपेक्षा अधिक आहे. अपेक्षीत दर्जा नसल्यामुळे सद्या दर दबावात असल्याचे चित्र आहे. मॉईश्चर कमी असल्यास व्यापारी चांगला दर देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काडी कचरा विरहित चांगले वाळलेले सोयाबीन विक्रीसाठी आणण्यावर भर दिला पाहिजे.- तुकाराम चांभारे, सचिव, बाजार समिती, हिंगणघाट, वर्धा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.