लिंबू लोणचे तयार करताना जयश्री गुंबळे आणि सहकारी
लिंबू लोणचे तयार करताना जयश्री गुंबळे आणि सहकारी 
महिला

प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळख

Vinod Ingole

अमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या सात वर्षांत प्रक्रिया उद्योगात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. प्रक्रिया उद्योगाच्या बरोबरीने जयश्रीताई ग्रामीण भागातील युवक, युवती आणि महिलांना प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण देखील देतात. विदर्भाच्या बरोबरीने राज्यभरातील मोठ्या शहरातही त्यांनी बारा प्रकारच्या लोणचे विक्रीचे नियोजन केले आहे.

अमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी प्रक्रिया पदार्थनिर्मितीची आवड म्हणून कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर येथे प्रशिक्षण घेतले. हळूहळू घरच्या घरी त्यांनी लोणचे निर्मिती आणि विक्रीस सुरवात केली. उत्पादनांस ग्राहकांचा जसजसा प्रतिसाद मिळू लागला, त्या प्रमाणात जयश्रीताईंनी प्रक्रिया उद्योग वाढविला. कधीकाळी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या जयश्रीताई आज महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या प्रशिक्षणवर्गामध्ये स्वयंरोजगाराच्या ट्रेनर म्हणून ग्रामीण भागातील युवक, युवतींना मार्गदर्शन करतात.

प्रशिक्षणातून सुरवात  गृहउद्योगाच्या बळावर कुटुंबाला आर्थिकस्थैर्य मिळवून देण्यात जयश्रीताईंना यश आले. विशेष म्हणजे व्यावसायिकता ही त्यांच्या कुटुंबाच्या रक्‍तातच भिनली आहे. त्यांचे पती रवींद्र गुंबळे यांचा अमरावती शहरात सराफा व्यवसाय आहे. पतीच्या सहकार्याने जयश्रीताईंनी गृहउद्योगात पाय रोवले. जयश्रीताईंचे बी.ए. व्दितीय वर्षापर्यंत शिक्षण झाले. मुले मोठी झाल्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या काही अंशी कमी झाल्या. त्यामुळे वेळेचा सदुपयोग व्हावा आणि कुटुंबाकतकरिता उत्पन्नाचा नवा स्रोत तयार होण्याच्या दृष्टीने काही करता येईल का ? याची चाचपणी जयश्रीताईंनी सुरू केली.  दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक के. एन. धापके यांनी महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यामध्ये जयश्रीताई सहभागी झाल्या. प्रक्रिया उद्योगाची संपूर्ण माहिती डॉ. अर्चना काकडे, प्रा. प्रताप जायले यांच्याकडून मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जयश्रीताईंनी पती रवींद्र यांना गृहउद्योगाची कल्पना बोलून दाखविली. त्यांनी लगेच होकार दिला. परिणामी, हुरूप वाढलेल्या जयश्रीताईंनी २०१२ साली प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. सुरवातीला लिंबू, हळद, आंबा लोणचे आणि आवळा सरबत तयार करून अमरावती शहरामध्ये विक्री केली. हळूहळू मागणी वाढत गेली. ग्राहकांच्या मागणीनुसार जयश्रीताई बारा प्रकारची लोणची तयार करतात. नेहमीच्या लोणच्यांबरोबरीने जयश्रीताई मेथी, लसूण, कारल्याचे लोणचे तयार करतात. प्रक्रियेसाठी बाजार समिती तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून ओली हळद, आंबा, कवठ, कारले, मिरची तसेच आवळ्याची खरेदी केली जाते. जयश्रीताईंना दैनंदिन व्यवसाय व्यवस्थापनात पती रवींद्रसह मुलगा ऋषिकेश, अभिषेक यांचेही सहकार्य मिळते. जयश्रीताईंनी पहिल्यांदा अमरावती शहरातील रहिवासी कॉलनीमध्ये स्वतः घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री केली. याच दरम्यान कृषी विज्ञान केंद्राने देखील जयश्रीताईंना उत्पादनांच्या विक्रीसाठी सहकार्य केले. परिसरातील कृषी प्रदर्शनात त्यांना सहभागी करून घेतले. यामुळे उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोचली.

राज्यभर विस्ताराचे नियोजन   अवघ्या चार वर्षांत जयश्रीताईंनी प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यास सुरवात केली. त्यादृष्टीने सर्व प्रमाणपत्रांची पूर्ततादेखील केली. त्यामागे त्यांचे अपार कष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात कृषी प्रदर्शनातून उत्पादनांच्या विक्रीवर त्यांचा भर होता. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागपूर, वर्धा शहरातील वितरकांनी त्यांच्याकडून उत्पादनांची खरेदी केली होती. टप्याटप्याने उत्पादनांची मागणी वाढू लागली. गेल्या दोन वर्षांत जयश्रीताईंची उत्पादने अकोला, नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा तसेच पुणे शहरातही विक्रीला जातात. त्यामुळे त्यांच्या प्रक्रिया उद्योगाची उलाढाल चांगली वाढली आहे. प्रक्रिया उद्योगाचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने उत्पादने तयार करणे, पॅकिंग, लेबलिंग आणि वितरण व्यवस्थेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता वाढली. सध्या त्यांच्याकडे पंधरा गरजू युवक आणि महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे.  

ग्रामीण युवक, महिलांना मार्गदर्शन  जयश्रीताईंसह अमरावती शहरातील महिला उद्योजकांना एकत्र घेऊन औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक किरण पातूरकर यांनी स्वयंसिध्दा गट तयार केला. या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील युवक, युवतींना प्रशिक्षण दिले जाते. यासाठी एमआयडीसीने बारा दिवसांचा खास अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये व्यवसाय प्रकल्प अहवाल, बॅंक कर्ज सुविधा तसेच व्यवसाय उभारणीसाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. प्रक्रिया उद्योग आणि विस्ताराची दखल घेत जयश्रीताईंना सिफेट संस्थेतर्फे राष्ट्रीयस्तरावरील दुसरा पुरस्कार, कृषी विज्ञान केंद्रातर्फे उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार, राजीव गांधी कृषिरत्न तसेच नारीशक्‍ती पुरस्कार आणि सह्याद्री वाहिनीनेदेखील पुरस्कार देऊन गौरविले आहे.

बारा प्रकारची लोणची 

  • ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जयश्रीताई आंबा, लिंबू, लिंबू क्रॅश जॅम, मिक्‍स, मिरची, मेथी, कारले, कवठ, हळद आणि करवंदाचे लोणचे तयार करतात. १०० ग्रॅम पाऊच आणि ३०० व ५०० ग्रॅम बॉटलीमध्ये लोणचे पॅकिंग केले जाते. 
  • आंबा, ओली हळद लोणचे प्रती किलो २५० रुपये, कवठ आणि करवंद लोणचे प्रती किलो २४० रुपये दराने विकले जाते.
  • हंगामानुसार पाच प्रकारच्या सरबतांची निर्मिती, गावरान गुलबापासून गुलकंदनिर्मिती.
  • व्यवसायाची वैशिष्ट्ये 

  •  बारा प्रकारची लोणची, पाच प्रकारच्या सरबताचे उत्पादन.
  •  परिसरातील बाजारपेठा आणि शेतकऱ्यांकडून कच्यामालाची खरेदी.
  •  नागपूर, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि पुणे येथे वितरण व्यवस्था.
  •  विदर्भात ठिकठिकाणी विक्री प्रतिनिधी.
  •  प्रक्रिया उद्योगातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती. प्रशिक्षणाची सोय.
  • - जयश्री गुंबळे, ८०८७९२१५३१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT