bitter gourd cultivation
bitter gourd cultivation 
महिला

फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक सक्षमता

Vinod Ingole

शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील सुवर्णा इखार लग्नानंतर शेतीत रमल्या. पतीच्या बरोबरीने बाजारपेठेची मागणी, तांत्रिक अभ्यास आणि मिळत गेलेल्या अनुभवातून शिकत भाजीपाला शेतीकडे वळल्या. फळबागेसह भाजीपाला पिकाच्या लागवडीवर भर देत त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू सक्षम केली आहे. 

तिवसा तालुक्‍यात असलेले कुऱ्हा हे भाजीपाला उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपास आले आहे. पारंपरिक पिकांपासून फारकत घेत या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीत सातत्य राखले आहे. येथील सुवर्णा इखार यांनीही भाजीपाला शेतीत आघाडी घेतली आहे. सुवर्णाताईंचे माहेर घाटलाडकी (जि. अमरावती). त्यांचे वडील जयराज राजस संत्रा, केळी, आले, हळद यांसारखी व्यावसायिक पिके घेत. सुवर्णाताईंनी इतिहास विषयात एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. घरच्या शेतीत सहज जावे लागत असले तरी काम कधीच करावे लागले नाही. त्यामुळे शेती व्यवस्थापनाचा सुवर्णाताईंना कोणताच अनुभव नव्हता, असे त्या सांगतात. २००४ मध्ये सुवर्णाताईंचे नितीन यांच्याशी लग्न झाले. नितीन शेती करायचे. पुढे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू लागले. त्यामुळे सुवर्णाताईंनी पतीच्या बरोबरीने स्वतः शेतीतील पीक नियोजन करायचे  ठरविले. फळबागेला भाजीपाला शेतीची जोड दिली. अनुभवातून शिकत त्यांनी भाजीपाला शेतीत प्रगती चांगली साधली आहे. त्यामुळेच विविध व्यासपीठांवर त्यांचा गौरव करण्यात आला. माजी मंत्री सुनील देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, घातखेडा यांच्या वतीने देखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

शेतीचे नियोजन इखार कुटुंबीयांची एकून साडेदहा एकर शेती आहे. या संपूर्ण क्षेत्राचे व्यवस्थापन सुवर्णा आणि नितीन हे दोघे दांपत्य पाहतात. भाजीपाला पीक व्यवस्थापनाची जबाबदारी सुवर्णा पहातात.एकूण शेतीपैकी सुमारे सहा एकर क्षेत्रावर संत्रा बाग आहे. यातील काही झाडे ३०, १२ तर काही झाडे आठ वर्षाची आहेत. तीन एकरांवर दोन वर्षांपूर्वी नव्याने संत्रा लागवड केली आहे.   शेतात दोन विहिरी आहेत. २०१८-१९ या वर्षात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. त्यामुळे ५०० फुटांचे दोन बोअरवेल, एक विहीर नव्याने खोदण्यात आली. हे सारे पर्याय निष्प्रभ ठरल्याने नव्या विहिरीत आडवे, उभे बोअर घेण्यात आले. या सर्व कामावर सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च झाला. परंतू पाण्याची उपलब्धता करण्यात अपयश आले. परिणामी दोन एकरावरील बाग जळाली. या अडचणीवर मात करत  नव्याने संत्रा बाग आणि भाजीपाला पिकाच्या व्यवस्थापनावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.  यांत्रिकीकरणावर भर इखार कुटुंबीयांकडे ट्रॅक्‍टरसह रोटाव्हेटर, पॉवर टिलर, ग्रास कटर, फवारणी यंत्र आहे. शेती कामात मजुरांचा वापर कमीत कमी असावा, असा उद्देश यांत्रिकीकरणामागे असल्याचे त्या सांगतात. यातून वेळेची, श्रमाची आणि पैशांची देखील बचत होण्यास मदत होते. 

चर्चा, बाजारपेठेच्या अभ्यासातून पिकाचे नियोजन बाजारात पुढील काळात कोणत्या पिकाला चांगले दर मिळतील, याबाबत सुवर्णाताई आणि नितीन चर्चा करतात. त्याच आधारे पिकाची निवड करून लागवड करण्यावर भर दिला जातो. भाजीपाला बाजारपेठेत मोठी अनिश्‍चितता राहते. त्यामुळे कधी खूप चांगला भाव मिळतो, तर काही वेळा अतिशय कमी दराने भाज्या विकाव्या लागतात. याकरिता खबरदारी म्हणून प्रत्येक वेळी पीक घेण्याआधी बाजाराचा अंदाज घेतला जातो. मागणी असलेल्या भाजीपाल्याची लागवड करून चांगला दर मिळवण्यावर भर असतो. 

भाजीपाला पिकात सातत्य नव्याने लागवड केलेल्या संत्रा बागेत आंतरपीक म्हणून आणि उर्वरित दीड एकर सलग क्षेत्रावरही भाजीपाला पिके घेतली जातात. कारली, काकडी, टोमॅटो, वांगी आदी पिकांची लागवड केली जाते. भरताच्या वांग्याचीही लागवड केली जाते. लागवड पाच फूट उंच आणि तीन फूट रुंद गादीवाफ्यावर केली जाते. विक्री आर्वी, शेंदूरजनाबाजार, तिवसा, कुऱ्हा, मंगरुळ दस्तगीर येथील बाजारात केली जाते. 

पाणीटंचाईचा उत्पादनावर परिणाम पाणी उपलब्ध असल्यास एकरी ४० टन संत्र्याचे उत्पादन मिळते. या वर्षी मात्र पाण्याअभावी १३ टनांपर्यंतच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पन्नातही मोठी घट होणार आहे. व्यापाऱ्याला क्रेटनुसार संत्र्याची विक्री केली जाते. गेल्या वर्षी ७६० रुपये प्रति क्रेटप्रमाणे संत्र्याला दर मिळाला होता. एका क्रेटमध्ये २२ ते २३ किलो संत्री असतात.      अडत्यामार्फत भाज्यांची विक्री होते. बाजारपेठेतील चढउतारानुसार उत्पन्नावर परिणाम होतो. यंदा वांगी पिकाला चांगला दर मिळाला. वांग्याचे सध्याचे घाऊक दर किलोसाठी ४० रुपये आहेत. कारली तीस ते पन्नास रुपये किलो दराने विकली जातात.   अपर वर्धा प्रकल्पाचा कालवा शेतालगत आहे. परंतू गेल्या वर्षी पाऊसमान कमी झाल्याने प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता होऊ शकली नाही. त्यासोबतच संरक्षित सिंचनाचे स्रोतही आटल्याने पिकांसाठी पाण्याची सोय करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. २०१८ मध्ये तीन एकरावर केळी लागवडीचा प्रयोग केला. केळीच्या ऊती संवर्धित रोपांची लागवड केली. लागवडीसाठी त्या वेळी साधारणपणे एकरी अडीच लाख रुपये खर्च आला. परंतू पाणी नसल्यामुळे संपूर्ण तीन एकरांवरील केळी बाग जळून गेली. त्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यातून धडा घेत बाजारपेठेची मागणी आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच पिकांचे नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

 - सुवर्णा इखार, ८३०८१४७७०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT