‘लीफ कलर चार्ट’द्वारे पानातील नत्राचे प्रमाण तपासता येते.
‘लीफ कलर चार्ट’द्वारे पानातील नत्राचे प्रमाण तपासता येते.  
कृषी सल्ला

नत्रयुक्त खतांच्या कार्यक्षम वापरासाठी ‘लीफ कलर चार्ट’

प्रणवसिंह पाटील, अश्विनी करपे

नत्र हे पिकासाठी सर्वात जास्त गरजेचे व महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. तृणधान्य पिकांच्या वाढीसाठी नत्राची गरज सर्वात जास्त असते. नत्रयुक्त खते पाण्यात सहज विरघळत असल्याने ते पिकांना सहज उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे नत्राचे पाण्यासोबत निचरा होणे किंवा वायूत रुपांतर होणे अशा विविध पद्धतीने ऱ्हासही होतो. उदा. भातासारख्या पिकात पाण्यासोबत नत्रयुक्त खते वाहून जातात. अन्य पिकांमध्ये नत्रांचा वापर एकाच वेळी केला जात असल्याने पिकांकडून शोषण होण्याआधी त्यांचे वायूत रुपांतर होते. तृणधान्य पिकांमध्ये नत्र ५० ते ६० टक्केच वापरले जाते. त्यातही भातासारख्या पिकामध्ये हे प्रमाण ३० टक्के इतकेच आहे. हे टाळण्यासाठी युरिया-डीएपी ब्रिकेटस वापरणे फायदेशीर ठरू शकते. आपण शिफारशीप्रमाणे खते दिली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात नत्राचा ऱ्हास होत असल्याने दिलेले खत पिकांना उपलब्ध झाले आहे की नाही, पाहणे गरजेचे ठरते. त्यासाठी लीफ कलर चार्ट उपयुक्त ठरतो. लीफ कलर चार्ट म्हणजे काय? लीफ कलर चार्ट म्हणजे पिकांच्या पानांच्या रंगाची पट्टी. या पट्टीवर हिरव्या रंगाच्या फिकट ते गडद असे विविध प्लेट्स असतात. पानांच्या रंगावरून सध्या पिकामध्ये उपलब्ध असलेली नत्र मात्रा समजते. त्यानुसार पिकाला द्यावयाच्या नत्र अन्नद्रव्यांची मात्रा ठरवता येते. विशेषतः तृणधान्यवर्गीय पिके, उदा. मका, भात व गहू आणि ऊस अशा पिकांसाठी हे तंत्र वापरले जाते. वापरण्याची पद्धत ः पिकाच्या पानांचा हिरवा रंग हा त्यातील नत्र मूलद्रव्याची मात्रा दर्शवित असतो. त्यामुळे पाने पिवळी पडल्यास शेतकरी युरिया या खतांचा वापर करतो. मात्र, पिकाची पाने पिवळी पडेपर्यंत वाट पाहिल्यास पिकाचे उत्पादन घटू शकते. नत्राचे प्रमाणावरच पानातील हरितद्रव्याचे प्रमाण ठरते. त्यावरच प्रकाश संश्लेषण क्रिया अवलंबून असते. या प्रक्रियेवर पिकाचे उत्पादन ठरते.

  • विविध रंगांच्या प्लेटशी पानांचा रंग जुळवून पाहावा. अ) कमतरता ः जर पाचपैकी १, २ (फिकट) या प्लेटशी पानांचा रंग जुळला, तर नत्राच्या मात्रेची आवश्यकता आहे असे समजावे.
  • ब) समाधानकारक ः ३, ४, ५ नंबरच्या (गडद हिरव्या) प्लेटशी पानांचा रंग जुळत असल्यास मातीत नत्राची मात्रा योग्य असल्याचे समजावे.
  • पिकाच्या वाढीच्या अवस्थेत दर आठवड्याला पानांचा रंग तपासून पाहावा. नत्र कमी आढळल्यास एकरी २५ किलो नत्र द्यावे.
  • ज्यांना डोळ्यांच्या साह्याने रंगभेद ओळखता येतो, त्यांना चार्ट वापरण्यात फारशी अडचण येत नाही. मात्र, रंगाआंधळेपणाची समस्या असल्यास काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात.
  • भारतीय भात संशोधन केंद्राची भातासाठी शिफारस १. लीफ कलर चार्ट वापरून रोप लागवडीनंतर १४ दिवसांपासून ते फुलोऱ्यापर्यंत दर आठवड्याला नोंदी घ्याव्यात. २. जर नोंद ३ पेक्षा कमी आढळल्यास एकरी २५ किलो नत्र द्यावे. ३. यासाठी पिकाच्या सर्वात वरील व परिपूर्ण वाढलेल्या पानाचा रंग लीफ कलर चार्टसोबत तपासावा. त्यासाठी पानाचा मध्य भाग चार्टवर ठेवावा. ४. नोंद घेताना आपल्या शरीराने सूर्यप्रकाश अडवून सावली चार्ट व पानांवर पडेल, असे पाहावे. नोंद अचूकतेने घेता येईल. ५. प्रत्येक प्रक्षेत्रामध्ये १० नोंदी घेऊन त्याची सरासरी काढावी. वापराचे फायदे

  • नत्राचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास पिकाच्या उत्पादनात घट होते. तर जास्त झाल्यास त्याचे निचऱ्याद्वारे किंवा वायूत रुपांत होऊन प्रदूषण होते. पिकांची शाकीय वाढ जास्त होते. पाने कोवळी, लुसलुशीत राहिल्याने रोग व किडी आकर्षित होतात. या दोन्ही बाबी टाळून नत्र खताचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लीफ कलर चार्ट उपयुक्त ठरतो.
  • पिकाच्या गरजेनुसार खताचे व्यवस्थापन करता येते.
  • उत्पादनात १०-१५ % पर्यंत वाढ होताना दिसते.
  • अतिशय सोपे व कमी खर्चाचे तंत्रज्ञान. एका पिकासाठी एकच चार्ट लागतो. १२० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, तो एकदाच विकत घेतल्यास पुन्हा पुन्हा अनेक हंगामापर्यंत वापरता येतो.
  • लीफ कलर चार्टची उपलब्धता ः महाराष्ट्रामध्ये हे चार्ट फारसे प्रचलित नाहीत. आपल्याकडे विद्यापीठांनी अद्याप त्याचा फारसा प्रचार केलेला नाही. तुलनेने पंजाब कृषी विद्यापीठात याचे अधिक प्रयोग झाले असून, त्याच्या शिफारसी दिल्या आहेत. या विद्यापीठाशी संलग्नपणे काही खासगी कंपन्यांनी असे चार्ट उपलब्ध केले आहेत. संपर्क ः प्रणवसिंह पाटील, ७७०९१९५३८३ (सहायक प्राध्यापक, कृषी महविद्यालय, बारामती.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

    Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

    Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

    Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

    Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

    SCROLL FOR NEXT