देवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप पॉक्स लस व शेळ्यांसाठी गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आजाराची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
देवी हा पॉक्स विषाणूपासून शेळ्या, मेंढ्यांना होणारा अती संसर्गजन्य साथीचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचे विषाणू सूर्यकिरणांना संवेदनाक्षम असतात, परंतु शरीरावरील लोकर / केस, तसेच बाधित जनावरांच्या शरीरावरील कोरड्या झालेल्या खपल्यामध्ये तीन महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. आजारामध्ये मेंढ्यांच्या शरीरावर (कान, तोंड, कास, सड, शेवटीखालील जागा, पोट इ.) प्रथम लालसर पुरळ येतात. त्यामध्ये पू होऊन ते पिवळ्या रंगाचे दिसतात. त्याचे रूपांतर खपल्यामध्ये होते. आजारामध्ये प्रौढ शेळ्या, मेंढ्यांमध्ये ५ ते १० टक्के मरतुकीचे प्रमाण असून करडे, कोकरांमध्ये हे प्रमाण जास्त असते. प्रसार
बाधित जनावरांच्या संपर्कामुळे. बाधित खाद्य, चारा, वाड्यामधील साहित्य, खाद्य भांडी, पाण्याच्या कुंड्या जनावरांच्या गोठ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या माश्यांमार्फत प्रसार. बाधित जनावरांची लाळ तसेच नाक व डोळ्यांतील स्रावाद्वारे प्रसार. बाधित जनावरांचे दूध व मलमूत्राद्वारेसुद्धा रोगाचा प्रसार होतो. आजाराची तीव्रता, जनावरांचे वय, जात तसेच जनावरांची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असतात. विषाणूचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यापासून साधारणपणे ८ ते १३ दिवसांमध्ये लक्षणे दिसतात. १०४ अंश फॅरनहाइटपेक्षा जास्त शरीराचे तापमान वाढते. जनावरांची भूक मंदावते, सुस्त व मलूल दिसते. सुरुवातीला शरीरावरील लोकर नसलेल्या भागावर (कान, नाक, कास, सड, शेपटीखालील जागा इ.) पुरळ येतात. त्यामध्ये पू तयार होऊन त्याचे रूपांतर गाठीमध्ये होते. नाक, डोळ्यांतील आतील त्वचा लालसर तसेच मानेवरील लसिका गाठीवर सूज येते. डोळ्यांच्या पापण्या तसेच नाकामधील आंत्रर्त्वचा यावर पुरळ आल्यामुळे तेथे दाह निर्माण होऊन नाकातून व डोळ्यांतून चिकट स्राव स्रवतो. श्वास घेताना त्रास होतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. करडे, कोकरामध्ये तीव्रता अधिक असून मरतुकीचे प्रमाण जास्त असते. आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. लक्षणे आढळून आल्यास प्रथम आजारी जनावर कळपामधून वेगळे करावे. इतर जिवाणूचे संक्रमण टाळण्याकरिता ५ दिवस प्रतिजैविके व वेदनाशामक औषधोपचार करावा. शरीरावरील जखमा पोटॅशिअम परमॅंगनेट द्रावणाने स्वच्छ व निर्जंतुक करून त्यावर जंतुनाशक मलम लावावे.मेंढ्यांकरिता शीप पॉक्स लस व शेळ्याकरिता गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. लसीची रोग प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत जनावरांच्या शरीरामध्ये राहते. याकरिता तीन महिने वयाच्या वरील सर्व शेळ्या व मेंढ्यांना डिसेंबर - जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी न चुकता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. लसीकरण करताना योग्य मात्रा, प्रमाण, लसीची कालबाह्य तारीख इत्यादीची खात्री करूनच लसीकरण करावे.२ टक्के फेनोल किंवा १ टक्का फोर्मलीनचे द्रावण वापरून जनावरांचे वाडे तसेच इतर साहित्य निर्जंतुक करून घ्यावे. त्याचप्रमाणे फ्लेम गनच्या साह्याने वाडे वरच्यावर निर्जंतुक करावेत. गोठ्यामधील बाधित जनावरांच्या संपर्कात आलेला चारा, खाद्य तसेच मृत जनावरे जमिनीमध्ये पुरवून किंवा जाळून त्याची विल्हेवाट लावावी. बाधित कळप किंवा जनावरे किमान ४५ दिवस वेगळे ठेवावे. नवीन खरेदी केलेली जनावरे किमान २१ दिवस पायाभूत कळपामध्ये मिसळू ठेवू नयेत. प्रादुर्भाव झालेल्या भागामध्ये मेंढ्यांचे स्थलांतर करू नये. - डॉ. सचीन टेकाडे, ८८८८८९०२७० (सहायक संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)