Animal Care
Animal Care Agrowon
ॲनिमल केअर

Animal Diet : हिवाळ्यात जनावरांना द्या संतुलित आहार

टीम ॲग्रोवन

डॉ.संजय भालेराव, डॉ.शुभम थोरात, डॉ.अंकुश राठोड

हि वाळ्यात जनावरांची योग्य ती काळजी (Animal Care) घ्यावी लागते. थंडीला सुरुवात होताच जनावरांना मोकळ्या जागेत न बांधता गोठ्यात बांधावे. तशी व्यवस्था झाली नाही झाली तर त्यांच्या अंगावर उबदार ब्लॅंकेट, कपडा किंवा पोते टाकावे. रात्रीच्या वेळी जनावरांना फरशी बांधणार असाल तर त्यावर गवत टाकणे गरजेचे आहे. जेणेकरून उबदारपणा निर्माण होईल. थंडीपासून (Cold) वाचवण्यासाठी संतुलित आहार (Animal Diet) द्यावा. यामुळे जनावरांना ऊर्जा मिळते. शरीर जितके तंदुरुस्त असेल, तेवढी थंडी कमी वाजते. त्याचबरोबर जनावरांची प्रतिकार शक्तीही वाढते आणि आजाराशी लढण्याची क्षमता विकसित होते.

समतोल आहारामध्ये ओला चारा, वाळलेला चारा आणि खुराक यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. दुभत्या जनावरास पशुखाद्य देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते.

दुधाळ गाईस १ ते १.५ किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति २.५ किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे. म्हणजेच ५०० किलो वजनाची गाय १५ लिटर दुग्धोत्पादन देत असेल तर १.५ किलो अंबोण शरीर पोषणासाठी आणि ५ किलो अंबोण १५ लिटर दुग्धोत्पादनासाठी असे एकूण ६.५ किलो अंबोण दररोज द्यावे.

अंबोणाव्यतिरिक्त अशा गाईस ५ ते ६ किलो सुका चारा आणि ८ ते १o किलो ओला चारा द्यावा.

दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते.

म्हशींच्या शरीर पोषणासाठी १.५ ते २ किलो अंबोण आणि प्रति २ लिटर दुग्धोत्पादनासाठी १ किलो अंबोण देणे गरजेचे आहे.

जनावरास अंबोण देण्यापूर्वी ८ ते १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे त्याचा रुचकरपणा वाढतो. त्याची पाचकतादेखील वाढते. हिवाळ्यात दुग्धजन्य गाय,म्हशींचे खाद्य प्रमाण समायोजित केले पाहिजे, जे सामान्य आहार मानकांपेक्षा १० ते १५ टक्के जास्त आहे.

हिवाळ्यात आहारातील सामग्री, जेव्हा आहारातील कॅल्शिअम आणि फॉस्फरस अपुरे पडते. यामुळे प्रजनन गाईची वाढ रोखली जाते, त्यांना होण्याची शक्यता असते. काहीवेळा मुडदूस होतो. जेव्हा वासराला दूध पाजणारी गाय आणि गर्भवती गायींमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसची कमतरता दीर्घकालीन असते, तेव्हा अस्थिरोग, हाडे आणि हातपाय विकृती उद्‌भवते. यामुळे गाईंचे आरोग्य आणि दुग्ध उत्पादन गंभीरपणे प्रभावित होते. यासाठी गोठ्यात चाटण विटा ठेवाव्यात. यामुळे गाई मुक्तपणे या विटा चाटतील. गाईंचा निरोगी विकास होईल.

वेळेवर लसीकरण आवश्यक ः

वाढत्या थंडीमध्ये लाळ्या खुरकूत, न्यूमोनिया, अतिसार यांसारख्या आजारांचा धोका असतो. काही पशुवैद्यक संतुलित आहार, तसेच तेल पाजण्याची शिफारस करतात. तथापि, आपण फक्त अधिक दुधाळ जनावरांना तेल देऊ शकतो. लाळ्या खुरकूत आलेल्या जनावरांना तेल देणे हे धोक्याचे आहे. त्यामुळे इतर आजारांमध्ये वाढ होणार आहे. याचा सामना करण्यासाठी प्राण्यांना वेळेवर लस दिली पाहिजे.

न्यूमोनिया टाळण्यासाठी जनावराचे थंड हवेपासून संरक्षण करणे हाच योग्य पर्याय आहे. दिवसभर ऊन आणि सकाळ-संध्याकाळ थंड वातावरण असेल, तर मग अशावेळी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

अतिथंडीमुळे होणारे दुष्परिणाम :

अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. त्यांची त्वचा खरबरीत होते. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होते.

सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते. ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते.

चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते. दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही, त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन प्रतीवर परिणाम होतो. अति थंडीमुळे गाई-म्हशीची वासरे गारठून मृत्युमुखी पडतात.

हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते. गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी उद्‌भवू शकते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते.

हिवाळ्यातील उपाययोजना :

सकाळ आणि सायंकाळचे ऊन येईल अशी गोठ्याची रचना असावी. हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूंनी, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत.

जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये. गोठ्यामध्ये जनावरांना उबदारपणा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॉटचे बल्ब लावावेत.

गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड वापरून गादी तयार करावी. जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करावा. सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तत्काळ उपचार करावेत. दूधदोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.

हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा जनावरांच्या आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन जनावरांतील अपचन टाळता येईल.

ज्याठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी दुधाळ जनावरांना ठेवावे. वासरांना ऊबदार ठिकाणी ठेवावे.

हवामान तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावरे पाणी कमी पिते. जनावरांनी भरपूर पाणी प्यावे, यासाठी ते कोमट असावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी. दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावे.

बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.

गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार दिलेली नाली असावी. गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी.

डॉ. संजय भालेराव,

०९०९६३२४०४५, ०९९२०९४६५४६

(सहायक प्राध्यापक, पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT