डाळिंब फळावरील तेलकट डाग रोग
मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाऱ्याचा वेग ४.१ ते ८.८ कि. मी. प्रतितास आणि तापमान १८.५ ते ३५ अंश सेल्सिअस असते. वातावरणातील आर्द्रता ६२ ते ९५ टक्के असते. अशा प्रकारचे वातावरण तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल असते. त्याशिवाय मृग बहार बागेवर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रसार होण्यास अत्यंत अनुकूल परिस्थिती असते. अशा परिस्थितीत रोगास प्रतिबंधात्मक तातडीच्या व वेळेवर फवारण्या कराव्यात. पावसाळ्यात डाळिंब बागेवर तेलकट डाग रोगाशिवाय फळावरील (सरकोस्पोरा किंवा स्फेसिलोमा स्कॅब) ठिपके व कोलेटोट्रिकम फळकूज या रोगांचा व रसशोषक पतंगाचा प्रादुर्भाव वाढतो. कीड-रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी योग्य प्रमाणात सिंचन व्यवस्थापन, संतुलित आहार व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. सामान्य व्यवस्थापन
कीड - रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी बागेचे नियमित परीक्षण करावे.पावसाचे प्रमाण या काळात जास्त असल्यामुळे बागेस आवश्यकतेनुसारच सिंचन करावे. सिंचनाचे प्रमाण जास्त झाल्यास बागेत नवीन फुटवे फुटतात. त्याचा वाढीच्या अवस्थेत असलेल्या फळांना फटका बसतो. तसेच फळावरील (सरकोस्पोरा किंवा स्फेसिलोमा स्कॅब) ठिपके व कोलेटोट्रिकम फळकूज या रोगांचे प्रमाण खूप वाढते.रसशोषक पतंगाच्या नियंत्रणासाठी बागेत प्रकाश सापळे एकरी १० लावावेत व त्यात सापडलेले पतंग गोळा करून मारून टाकावेत. बागेच्या आजूबाजूला गुळवेल असेल तर काढून टाकावी. रसशोषक किडीने छिद्र पाडलेली फळे काढून टाकू नयेत. कारण पतंग पुन्हा त्याच फळावर बसेल व दुसरे फळ खराब करणार नाही.संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे पिकाची कीड - रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फळधारणा झालेल्या बागेत बोरीक अॅसिड २ ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रण (ग्रेड २) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी करावी. तसेच ठिबक संचातून १९:१९:१९ हे विद्राव्य खत ८ किलो प्रतिहेक्टर याप्रमाणात एक दिवसाआड महिनाभर द्यावे.पहिल्या फवारणीनंतर आठवड्याने मॅग्नेशियम सल्फेट २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच जमिनीतून नत्राची १/४ मात्रा (४ वर्षाखालील झाडांसाठी युरिया १३५ ग्रॅम प्रतिझाड किंवा ४ वर्षांपुढील झाडांसाठी २७० ग्रॅम प्रतिझाड) द्यावी.संपूर्ण सप्टेंबर महिन्याच्या काळात ००:५२:३४ हे विद्राव्य खत २.५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात एक दिवसाआड महिनाभर ठिबक संचातून द्यावे.फळवाढीच्या अवस्थेत नत्राची १/४ मात्रा (जमिनीतून ४ वर्षाखालील झाडांसाठी युरिया १३५ ग्रॅम प्रतिझाड किंवा ४ वर्षांपुढील झाडांसाठी २७० ग्रॅम प्रतिझाड) द्यावी. कीड - रोग नियंत्रणासाठी फवारणी वेळापत्रक
तेलकट डाग रोग, फळावरील ठिपके व फळकूज हे रोग तसेच रसशोषक पतंगासाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.कीड रोगप्रतिबंधात्मक म्हणून स्ट्रेप्टोमायसिन ०.५ ग्रॅम अधिक थायोफिनेट मिथाईल (७० टक्के विद्राव्य) १ मि.लि. अधिक सायपरमेथ्रिन (२५ टक्के इ.सी.) १ मि.लि. अधिक निंबोळी अर्क ५० ग्रॅम किंवा अॅझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मि.लि. अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.पहिल्या फवारणीनंतर आठवड्याच्या अंतराने ब्रोमोपॉल (२ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १-३ डायोल) ०.५ ग्रॅम अधिक फोसेटील ए.एल. (८० टक्के डब्ल्यू. पी.) २ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.साधारणत: १५ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान फळवाढीची अवस्था सुरू होते. अशावेळी पिकाची कीड - रोग प्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी सॅलिसिलिक आम्ल ०.३ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. संध्याकाळी ०.५ टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. त्यानंतर साधारणत: आठवड्याच्या अंतराने ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक मॅंकोझेब (७५ टक्के विद्राव्य) २ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.साधारणत: एक आठवड्यानंतर स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (५० टक्के विद्राव्य) १ ग्रॅम अधिक मिथोमिल (४० टक्के एस. पी.) १ ग्रॅम अधिक निंबोळी अर्क ५० ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.पुढील आठ दिवसांत सॅलिसिलिक अॅसिड ०.३ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. याप्रमाणात फवारणी करावी. तसेच ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक काॅपर हायड्रोक्साईड (७७ डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम अधिक निंबोळी अर्क ५० ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.त्यानंतर पुढील आठ दिवसांत बागेवर बोर्डो मिश्रण (०.५ टक्के) फवारावे. त्यापुढील आठ दिवसांत पीक संरक्षणासाठी स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक कॅप्टन (५० टक्के विद्राव्य) २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल (४० टक्के एस.पी.) १ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणात फवारणी करावी. नत्राची अतिरिक्त मात्रा देऊ नये,त्यामुळे तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खालील ४ फवारण्या ५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. प्रत्येक फवारणीपूर्वी तेलकट व रोगट फळे तोडून टाकावीत.
पहिली : कॉपरहायड्रॉक्साईड २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.दुसरी : कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.तिसरी : कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी. चौथी : मॅंकोझेब (७५ टक्के विद्राव्य) २ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी.झाडाचे वय, हंगाम व वाढीची अवस्था, जमिनीचा मगदूर व वातावरण यांचा विचार करून सिंचन करावे. निर्यातक्षम बागेस शिफारशीत कीडनाशकांचाच वापर करावा. संपर्क : डॉ. डी. टी. मेश्राम, ७५०७१९२६०६ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)