Drip irrigation is beneficial in vegetable crops
Drip irrigation is beneficial in vegetable crops 
ॲग्रो गाईड

भाजीपाला पिकांना द्या गरजेनुसार पाणी

डॉ. एस. एम. घावडे

आधुनिक पद्धतीने भाजीपाला पिके घेत असताना पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. भाजीपाला पिकाला पारंपरिक पद्धतीने पाणी देण्याऐवजी आधुनिक पद्धतींचा वापर फायदेशीर ठरते. भाजीपाला पिके वर्षातील तिन्ही हंगामांत घेतली जातात. हवामान बदल, तापमान, आर्द्रता तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीचा प्रकार यांचा एकत्रित विचार करून पिकाची पाण्याची गरज भागविणे गरजेचे असते. प्रत्येक भाजीपाला पिकाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. विविध भाजीपाल्यांची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. भाजीपाला पिकांत आधुनिक पद्धती म्हणजेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेनपोर्ट पद्धती, सूक्ष्म तुषार सिंचन यांचा वापर फायदेशीर ठरतो. या तंत्रज्ञानासाठी सुरुवातीला जास्त खर्च येत असला तरी हा खर्च एकदाच करावा लागतो. पुढील ७ ते १० वर्षांपर्यंत पुन्हा खर्च करण्याची करण्याची गरज राहत नाही. आधुनिक पद्धतीद्वारे पिकांच्या गरजेइतकेच पाणी पुरविले जाते. तसेच पाण्याची बचत होऊन पाणी व्यवस्थापनावरील खर्च कमी होण्यास मदत होते. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे भाजीपाला पिकांची प्रतवारी सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.

  • भाजीपाला पिकांच्या शाखीय वाढ, पुनरुत्पादित वाढ, परिपक्वतेचा काळ या प्रमुख अवस्था आहेत.
  • भाजीपाला पिकांचे बियाणे किंवा रोपटे जमिनीत रुजल्यानंतर शाखीय वाढीत पाण्याचा अतिरेकी वापर आणि पाण्याचा ताण बसणे या बाबी घातक ठरतात.
  • जमिनीचा उतार, सामू, क्षारांचे प्रमाण याचा अभ्यास करूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज आहे.
  • फुलधारणा होऊन त्याचे फळधारणेत रूपांतर होण्याचा कालावधी भाजीपाला पिकात अत्यंत संवेदनशील मानला जातो.
  • मिरची, वांगी व टोमॅटो 

  • या पिकांमध्ये आधुनिक पद्धतींद्वारे पाणी व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरते.
  • ठिबक किंवा रेनपोर्ट सिंचन पद्धतीद्वारे पिकाला पाण्याबरोबरच खत देणे सोयीचे होते. ठिबक सिंचनाच्या नळ्यातून पाण्याद्वारे विद्राव्य खतांची मात्रा देता येते.
  • आधुनिक पद्धतीद्वारे पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणाऱ्या नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा योग्य प्रमाणात पुरवली जाते.
  • काकडी व ढेमसे 

  • या वेलवर्गीय पिकांच्या वेलींना वळण देणे आवश्‍यक असते. नाहीतर वेली जमिनीवर पसरतात.
  • वेली पाट किंवा सरीच्या काठांवर लावल्या जातात. त्यामुळे या वेली पाटाच्या पाण्यात वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • वेली दोन पाटांमधील मोकळ्या जागेत पसराव्यात.
  • लागवडीपासून ३० दिवसांनंतर वेली झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते. अशावेळी त्यांना वळण देणे आवश्‍यक असते.
  • फुले व कोवळी फळे यांचा पाण्यासोबत संपर्क येऊ देऊ नये. यासाठी वेली मांडव करून किंवा काठ्यांच्या आधाराने टेलिफोन पद्धतीने खुंट्यांना बांधलेल्या तारांवर बांधून वाढू द्याव्यात.
  • कारली 

  • कारलीची लागवड केल्यानंतर उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात.
  • उन्हाळ्यामध्ये ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे.
  • वेलींना फुले आल्यापासून ते फळधारणा होतांना नियमित पाणी द्यावे. फळे पोसण्यासाठी भरपूर पाणी लागते.
  • टरबूज आणि खरबूज 

  • या पिकांला सुरुवातीला उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या लवकर द्याव्यात.
  • जमिनीचा मगदूर, हवामान, पिकाच्या वाढीची अवस्था यांचा विचार करून पाण्याच्या पाळ्यांचे अंतर ठेवावे.
  • उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • भारी जमिनीत पाणी नियमित द्यावे. विशेषतः फळधारणा झाल्यानंतर अनियमित पाणी दिल्यास टरबुजाची फळे तडकण्याचा संभव असतो.
  • टरबूज व खरबूज काढण्यापूर्वी २ दिवस आधी पाणी तोडल्यास फळांची गोडी वाढण्यास मदत होते.
  • भेंडी 

  • जमिनीचा मगदूर आणि हंगामानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने भेंडी पिकांस पाणी द्यावे.
  • उन्हाळी हंगामात जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी भेंडीच्या दोन ओळींत सुक्या गवताचे किंवा भाताच्या पेढ्यांचे किंवा काळ्या पॉलिथिनचे आच्छादन घालावे.
  • आच्छादनामुळे तणांचा उपद्रव कमी होऊन निंदणीसाठी होणारा खर्च कमी होतो.
  • या पिकास ठिंबक सिंचनाची पद्धतीची शिफारस करण्यात येते.
  • गवार 

  • गवार पीक कोरडवाहू म्हणून अधिक चांगले आहे.
  • या पिकाला उन्हाळी हंगामात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. फुले धरल्यापासून ते शेंगांचा बहर पूर्ण होईपर्यंत १० ते १२ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
  • हंगाम, जमिनीचा मगदूर आणि पिकांच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन पाण्याच्या पाळ्या आणि त्यातील अंतर ठरवावे.
  • दुधीभोपळा 

  • पिकाची लागवड केल्यानंतर उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात.
  • उन्हाळ्यामध्ये ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • वेलींना फुले आल्यापासून ते फळधारणा होताना नियमित पाणी द्यावे. फळे पोसण्यासाठी भरपूर पाणी लागते.
  • शिरी दोडका

  • लागवडीपूर्वी सऱ्या ओलवून घ्याव्यात. आणि बियांची टोकण केल्यानंतर लगेच पाणी देऊन पाट भिजवून घ्यावेत.
  • उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पाट पद्धतीने लागवड केल्यास पाणी पाटाच्या बाहेर वाहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • चवळी 

  • उन्हाळी हंगामात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे.
  • फुले धरल्यापासून ते शेंगांचा बहर पूर्ण होईपर्यंत १० ते १२ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
  • पालेवर्गीय भाज्या 

  • पालेवर्गीय पिकांमध्ये बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते.
  • उन्हाळ्यात ४ ते ६ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
  • काढणीच्या २ ते ३ दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकांचा दर्जा सुधारतो.
  • - डॉ. एस. एम. घावडे, ७०२०५ ७५८६७ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT