सुधारित लागवडीतून वाढवा करडई पिकाची उत्पादकता
सुधारित लागवडीतून वाढवा करडई पिकाची उत्पादकता  
ॲग्रो गाईड

सुधारित लागवडीतून वाढवा करडई पिकाची उत्पादकता

विशाल सुतार, शरद नायक

कोरडवाहूसह बागायती क्षेत्रातील करडई हे महत्त्‍वाचे तेलबिया पीक आहे. या पिकामध्ये लागवडीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या अभावी योग्य उत्पादकता मिळत नाही. उत्पादकता कमी होण्याची कारणे जाणून सुधारित पद्धतीचा अवलंब करावा. अनेक शतकांपासून करडईची लागवड नारंगी रंग व तेलासाठी केली जाते. करडईच्या तेलामध्ये ७६ टक्के लिनोलिक आम्ल असून, ते रक्तातील कोलोस्टेरॉल कमी करते. करडई बियांच्या टरफलाचा वापर कोस्युलोज इन्सुलेशन प्लॅस्टिकसाठी करतात. करडई पिकाच्या कमी उत्पादकतेची कारणे ः

  • प्रामुख्याने कोरडवाहू भागात लागवड. त्यात करडईखालील क्षेत्र हे सर्वसाधारणपणे ६० टक्के क्षेत्र अवर्षणग्रस्त विभागामध्ये आहे.
  • पीक हलक्या ते मध्यम जमिनीवर घेतले जाते.
  • मोठ्या प्रमाणात आंतरपीक/ पट्टा पेर पद्धतीने घेतात.
  • सुधारित वाणांचा कमी वापर.
  • शिफारशीत खतमात्रा देण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
  • विरळणी योग्य प्रमाणात केली जात नाही.
  • पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष.
  • हवामान ः करडई पिकास थंड हवामान मानवते. पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. अतिउष्ण तापमानाचासुद्धा पिकावर विपरीत परिणाम होतो. जमीन ः मध्यम ते भारी प्रकारातील उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी. क्षारयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक घेता येते. पूर्वमशागत ः लोखंडी नांगराने जमीन नांगरावी आणि दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. पावसाळ्यात पाणी जिरवून तण नियंत्रण ठेवावे. शेवटच्या व खरणीपूर्वी पाच टन शेखणत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

    सुधारित वाण
    क्र.  वाण  कालावधी उत्पादन  वैशिष्ट्ये
    १.  भीमा  १३०-१३५ १४-१६  कोरडवाहू क्षेत्रास योग्य
    २. गिरणा  १३५-१४० १५-१७ कोरडवाहू व बागायती क्षेत्रास योग्य
    ३. शारदा   १२५-१३० १५-१७   मराठवाडा विभागाकरिता प्रसारित
    ४.  नारी-६ १३०-१३५  १०-२२ बिगर काटेरी, पाकळा गोळा करण्यास योग्य
    ५.  नारी एच-१  १३०-१३५   १२-१५ बिगर काटेरी संरक्षित वाण
    ६. डीएसएच-१२९ १२५-१३०  १८-२० संकरित वाण
    ७. परभणी कुसुम  १३०-१३५  १६-१८  संपूर्ण भारताकरिता प्रसारित
    ८.  फुले कुसुमा  १३५-१४०  १६-१८ कोरडवाहू, हमखास पाऊस व संरक्षित पाण्यासाठी योग्य

    बियाणे ः प्रतिहेक्‍टरी १० ते १२ किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे. बीजप्रक्रिया (प्रतिकिलो बियाणे) ः कार्बेन्डाझीम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम त्यानंतर ॲझेटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम पेरणी ः करडईची पेरणी योग्य वेळी केल्यास या पिकावर येणाऱ्या कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. करडईची पेरणी ऑक्‍टोबर महिन्यामध्ये करावी. संरक्षित पाणी असल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेरणी करता येते. थंडीच्या काळात उशिरा पेरणी केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. करडई पिकांच्या दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी आणि दोन रोपांतील अंतर २० सेंमी ठेवावे. खत व्यवस्थापन ः करडई पीक रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देते. करडई पिकास प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि ३५ किलो स्फुरद (२२० किलो सुपर फॉस्फेट) द्यावे. खताच्या मात्रेपैकी निम्मे नत्र व पूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित निम्मे नत्र ३० दिवसांनी पहिली पाण्याची पाळी देताना द्यावे. विरळणी ः उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी या पिकाची विरळणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा त्याचा परिणाम झाडे लहान राहून उत्पादनात मोठी घट येते. विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावीत. दोन रोपांमधील अंतर २० सेंमी ठेवावे. आंतरमशागत ः रब्बी हंगामात गरज भासल्यास एकदा खुरपणी करावी. मात्र दोन ते तीन कोळपण्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे भेगा कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. कोळपणीसाठी पासाच्या किंवा दातेरी कोळप्याचा वापर करावा. पाणी व्यवस्थापन ः करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. दोन ते तीन पाण्याच्या पाळ्यांद्वारे पिकाची गरज भागते. करडई पिकास पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांच्या दरम्यान द्यावे. ६० ते ६५ दिवसांनी पीक फुलोरा येताना दुसरे पाणी दिल्यास उत्पादनात ५० ते ६० टक्के वाढ होते. योग्य प्रकारे लागवडीसह, खत व्यवस्थापन आणि विरळणी यांचा अवलंब केल्यास मध्यम जमिनीत हेक्टरी १० ते १२ क्विंटल आणि भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल उत्पादन कोरडवाहू स्थितीमध्ये मिळू शकते. ओलित शक्य असल्यास वरील नमूद पाणी संवेदनशील अवस्थेमध्ये दिल्यास १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्‍टर उत्पादन मिळू शकते. संपर्क ः ०२४५२-२२९००० (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

    POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    SCROLL FOR NEXT