Akola News : सध्या शेतशिवारांमध्ये विविध कामांची एकच लगबग सुरू आहे. कुठे सोयाबीनचे शेत तयार करणे, कुठे कपाशीची वेचणी तर रब्बी पेरणीला वेग आलेला दिसून येत आहे. एकाचवेळी सुरू असलेल्या कामांसोबतच दिवाळी सणामुळे मजुरांची संख्या कमालीची कमी असून मजूर मिळेनासे झाले. कापूस वेचणी १० ते १२ रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना करावी लागत आहे. तर या कापसाची खेडा खरेदी सहा ते साडेसहा हजारांदरम्यान व्यापारी करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पाऊस थांबल्यानंतर दिवसाचे तापमान वाढले. दिवसभर ऊन असल्याने कपाशीची बोंडे उमलत आहेत. अनेक ठिकाणी कपाशीच्या शेतांमध्ये वेचणीला आलेला कापूस झाडांवर लटकलेला दिसून येत आहे. मजूर मिळत नसल्याने हा कापूस प्रमाणाबाहेर सुकू लागला आहे. त्याचे वजन कमी होत आहे. कापूस वेचणीसाठी यंदा मजुरांना किलोमागे १० ते ११ रुपये आणि मजुरांच्या मोऱ्हक्याला प्रतिकिलो १ रुपया प्रमाणे मजुरी चुकवावी लागते आहे. मजूर दिवसभरात ४० ते ७० किलोपर्यंत कापूस वेचणी करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटला असून तो वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने घरादारातील आबाल वृद्धांसह छोटी मुलेही वेचणी करण्यासाठी जात आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्याने सोयाबीन काढणी हंगाम लांबला होता. सोबत कापूस वेचणीलाही मजुरांची टंचाई डोकेदुखी बनली. काही भागात बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन एकरी ३ ते ५ क्विंटलपर्यंत येत आहे. सध्या कापसाची खेडा खरेदी सहा हजारांपासून व्यापारी करीत आहेत. सरासरी साडेसहा दरम्यान खरेदी होत आहे.
कापसात ओलावा, कव़डी असल्याचे कारण देत व्यापारी कमी दरात खरेदी करीत आहेत. यंदा कापूच वेचणीकरून घरात आणेपर्यंत २५ टक्के खर्च करावा लागतो आहे. कापसाची वेचणी करून घरी येईपर्यंत किलोला १५ रुपयांचा खर्च होत आहे. जूनच्या प्रारंभी लागवड केलेल्या कापूस क्षेत्रात वेचणी होत आहे. पावसावर आधारित कपाशीची पेरणी झालेल्या शेतांमध्ये फूल, पात्या, बोंड परिपक्व होण्याची अवस्था सुरू झालेली आहे.
यंदा कापसाला हमीदर ७५२१ रुपये आहे. दुसरीकडे खेडाखरेदी साडेसहा हजारांदरम्यान केली जात आहे. या दोन्ही खरेदी दरात हजार रुपयांची तफावत आहे. कापूस हंगामाच्या पार्श्वभूमीवर सीसीआयने एक ऑक्टोबरपासून खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आदेश काढलेले आहेत. विदर्भात ६१ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर देशभरात सीसीआय ५०० केंद्रांवर कापूस खरेदी करीत आहे. महाराष्ट्रभर १२० खरेदी केंद्रे असून अर्धीअधिक विदर्भात आहेत. अद्याप एकाही केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेला नाही. सीसीआयचे अधिकारी सातत्याने समन्वय ठेवत खरेदीबाबत पाठपुरावा करीत आहेत. शेतकऱ्यांनी निकषात बसणारा कापूस विक्रीला आणला तर केंद्रावर खरेदीची सुविधा तयार आहे, असे सीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम विदर्भातील केंद्रे
अकोला जिल्हा : अकोट, बार्शीटाकळी, बोरगावमंजू, चिखलगाव, चोहोट्टा बाजार, हिवरखेड, मूर्तिजापूर, पारस, तेल्हारा
बुलडाणा : चिखली, देऊळगावराजा, जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर, नांदुरा, शेगाव
वाशीम : मंगरूळपीर, अनसिंग, कारंजा लाड
अमरावती : अंजनगावसुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, दर्यापूर, धामणगावरेल्वे, नांदगावपेठ, वरुड, येवदा
यवतमाळ : दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब, खैरी, महागाव, मुकूटबन, पांढरकवाडा, पुसद, राळेगाव, शिंदोळा, वणी, यवतमाळ.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.