Nagpur News : शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला तरी त्यातून नफ्याचे मार्जिन वाढण्यासाठी मदत होते. निधीअभावी वैयक्तिक स्तरावर अशा प्रकल्पाची उभारणी शक्य नसल्यास शासकीय योजनेतून सामूहिकस्तरावर असे प्रकल्प उभारता येतात. नवअनंत शेतकरी कंपनीने त्यानुसार केलेली सुरुवात निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले.
म्हसेपठार येथील नवअनंत शेतकरी कंपनीच्या संत्रा क्लिनिंग, ग्रेडिंग आणि व्हॅक्सीन प्रकल्पाच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. या वेळी विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, अरविंद उपरीकर उपस्थित होते. कंपनीचे संचालक राकेश मानकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांसह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर कंपनीच्या ग्रेडिंग तसेच व्हॅक्सीन प्रकल्पाच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देण्यात आली. प्रकल्पाच्या सनियंत्रणाविषयी विभागीय कृषी सहसंचालकांनी समाधान व्यक्त केले. संत्रा हे विदर्भातील मुख्य फळपीक असल्याने त्याच्या मूल्यवर्धनाला चालना मिळण्याची गरज आहे.
त्याकरिता शेतकऱ्यांनी सामूहिकस्तरावर अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. विदर्भात शेतीमालाच्या मूल्यवर्धनावर भर दिल्यास या भागातही परिस्थिती बदलेल, अशा आशावाद घाटगे यांनी व्यक्त केला.
बड्या ब्रॅण्डना पुरवठा
आंबट-गोड चवीच्या नागपुरी संत्रा फळांना देश-विदेशात मागणी आहे. नवअनंत शेतकरी कंपनीच्या वतीने कंटेनरच्या माध्यमातून नुकतीच दुबईला संत्रा निर्यात करण्यात आली. त्यासोबतच फळांचा दर्जा राखला जात असल्याने रिलायंससह देशभरातील बड्या ब्रॅण्डना संत्रा फळांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती यावेळी कंपनीचे संचालक राकेश मानकर यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.