Sangli News : तालुक्यातील चार गावांच्या टेंभू पाणी योजनेच्या पाणी वितरण व्यवस्थापनाची जबाबदारी जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील पाटबंधारे विभागाकडे दिल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ‘लाभक्षेत्र एका जिल्ह्यात आणि व्यवस्थापन दुसऱ्या जिल्ह्यात’ असे अजब पाणी वितरण व्यवस्थापन केले आहे. त्यावर शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर आहे.
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १० जानेवारीपासून पाणी सुरू केले आहे. आटपाडी तालुक्यात बंदिस्त पाइपलाइनने वितरण सुरू केले आहे. यंदापासून पहिल्यांदाच पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग पाणी वितरण करत आहे.
शेतकऱ्यांनी वितरण व्यवस्थेवरील संस्थेकडे लेखी मागणी करायची आहे. पाटबंधारे विभागाकडे संस्था असलेली मागणी पाठवून नियोजन केले जाते. ओढ्यावरील बंधारे भरण्याचे नियोजन स्वतः पाटबंधारे विभागाने घेतले आहे.
आटपाडी तालुक्यातून ‘टेंभू’चा डावा कालवा, घाणंद ते हिवतड कालवा, कवठेमहांकाळ आणि सांगोला असे कालवे गेलेत. घाणंद ते हिवतड कालवा तसाच पुढे सांगोला तालुक्याला जातो. हे हिवतडपर्यंतची जबाबदारी आटपाडीकडे आहे. त्याच्या पुढील जबाबदारी जुनोनी (ता. सांगोला) येथील पाटबंधारे विभागाकडे दिली आहे.
हिवतडच्या पुढे करगणी, शेटफळे, माळेवाडी, तळेवाडी आणि पात्रेवाडी या पाच गावांना ओढ्यांनी आणि बंदिस्त पाइपलाइनने पाणी दिले जाते. या गावांचे पाणी देण्याचे नियोजन जुनोनी येथून केले जाते.
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील ५ गावांतील शेतकरी, पाणी वापर संस्थांना (सोलापूर) जिल्ह्यातील सांगोला विभागाकडे करावी लागत आहे. लाभक्षेत्राचा तालुका व जिल्हा एक आणि मागणी दुसरा तालुका, जिल्ह्याकडे करावी लागत आहे. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना आटपाडी विभाग सोयीचा आहे. आटपाडीकडे येणे-जाणे असते. मात्र, पाण्याची मागणी नोंदवण्यासाठी सांगोल्यात जावे लागत आहे.
आम्हाला आटपाडी जवळ आहे. असे असताना पाण्याची मागणी करण्यास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विभागाकडे जावे लागते. आटपाडीत मागणी घेतली जात नाही. तालुक्यातील सर्वच गावांची जबाबदारी आटपाडी विभागाकडे द्यावी.- प्रकाश गायकवाड, शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.