Buldhana News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत खरीप क्षेत्र लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ३६ हजार ५६६ हेक्टरच्या तुलनेत सहा लाख १९ हजार ३०९ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. सरासरीच्या ८४.०८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे.
खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरात ही लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.या हंगामातही जिल्ह्यात सोयाबीन हेच खरिपाचे पहिल्या पसंतीचे पीक ठरले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची तीन लाख ९७ हजार ४१ हेक्टर या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख ६९ हजार १११ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
९३ टक्के एवढी सरासरी या पिकाच्या लागवडीने गाठली आहे. कपाशीची एक लाख २१ हजार ३०५ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची लागवड यावर्षी संथ गतीने झाली आहे. आता जुलै महिना उजाडल्याने उर्वरित राहिलेल्या सरासरीतील सुमारे पाऊण लाख हेक्टरपैकी किती क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल हे अनिश्चित आहे.
जिल्ह्यात या वर्षी प्रामुख्याने कपाशी या पिकाचे क्षेत्र मक्याखाली आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात खरीप मक्याचे सरासरी क्षेत्र २४ हजार हेक्टरपर्यंत राहते. यंदा ही लागवड ४० हजार हेक्टरपर्यंत पोचली आहे. सरासरीच्या १६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या आगमनानंतर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
त्यानुसार शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत, कीटकनाशके खरेदी करून तयारी केली होती. परंतु, पावसाच्या अनियमिततेमुळे पेरण्या लांबल्या आणि खरिपाचा पहिला आठवडा वाया गेला. आता जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी १०० टक्के पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना गती मिळाली असून आता शेवटच्या टप्प्यात शेतकरी कामाला लागले आहेत.
असमतोल पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचेही संकट ओढवले आहेत. आताही काही ठिकाणी मक्याचे पीक पिवळसर झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. मात्र, हे तत्कालिक असून पीक लवकरच सावरेल, असे अधिकारी सांगत आहेत. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाल्यामुळे आता उर्वरित पेरणी वेगाने होणे आवश्यक आहे.
तणनाशकाच्या फवारणीला वेग
सततच्या पावसाने अंकुरलेल्या पिकांत तणेही उगवली आहेत. या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी तणनाशकाची फवारणी घेत आहेत. तणनाशकांचा परिणाम फारसा येत नसल्याचे शेतकरी तक्रारी करू लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी घेतल्यानंतर तणावर किंचितही परिणाम झाला नाही.
पीकनिहाय पेरणी, कंसात सरासरी (हेक्टरमध्ये)
मका ३९८०३ (सरासरी २३९९५), तूर ७७५२६ (८१६९७), मूग ५२५८ (१३९३८), उडीद ५६१४ (१४७८०), सोयाबीन ३ लाख ६९ हजार १११ ( ३ लाख ९७ हजार ४१ हेक्टर) , कपाशी १२१३०५ (१९७६३८), एकूण ६१९३०९ हेक्टरवर पेरणी आटोपली. ८४.८ टक्के एवढी ही लागवड आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.