Rural Hospital  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Social Structure : गावगाड्यात जागा हुडकणाऱ्या माणसांची गोष्ट!

सुन्या म्हणला, "काय झालतं? डॉक्टर काय म्हणला?""म्हातारी जरा घाबरायलीय. आपुन आखड्यावर बसलेलो तव्हा बाप घरी आलेला. म्हातारीला म्हणत होता, पैसं दे. बापाला वाटतंय, आज्जानं मरायच्या आधी आज्जीकड चंबूगबाळं दिलंय.

Dhananjay Sanap

लेखक - धनंजय सानप

खैरबांडे डॉक्टर गावातला (Village Story) एकमेव डॉक्टर होता. त्याच्या दवाखान्यात सगळी म्हातारी माणसं भरलेली असायची. दहा बाय आठच्या एका गाळ्यात खैरबांडेची प्रॅक्टिस चालायची. दवाखान्यापेक्षा (Clinic) ती एखाद्या पानटपरीला शोभून दिसेल अशी जागा होती. गावातली पोरं आणि म्हातारी तेवढी पेशंट असायची. बायका मात्र त्याच्या दवाखान्यात जायच्या नाही. गावातल्या आख्या बायकांचं दुखणं अंगावर काढणं कायमचं होतं. त्यात कुणाच्याही सल्ल्यानं गोळ्या खाणं आणि त्यावर दुखणं ढकलत राहणं कायमचं. लैच आणीबाणीचा प्रसंग आला तरच खैरबांडेच्या दवाखान्याची चौकट बायका ओलांडयच्या.

खैरबांडेची एक खासियत होती, कुणाचं काहीही दुखणं असू देत सलाईन लावल्याशिवाय तो सुट्टी देत नव्हता. सुन्याला चालता चालता आठवलं, खैरबांडेनं एकदा त्याला पोटदुखीवर औषध दिलेलं. पोटदुखी थांबलेली पण नंतर दोन दिवसांनं ओठ सुजलेला. डॉक्टरला विचारलेलं तर म्हणला, 'औषधाच्या पॉवरनं होत असतंय. होईन दोन तीन दिवसात नीट.' सुन्या पुढं चार दिवस ओठ सुजलेल्या अवस्थेत तोंडाला रुमाल बांधून फिरत होता. पोरं आला बघा माकड म्हणून त्याला डिवचत होती. सुन्याला स्वतःचंच हसू आलं आणि क्षणभर त्यानं हाताला हात चोळत विषय सोडून दिला.

गल्लीत चार पाच कुत्री एकमेकांसोबत खेळत होती. इकडं तिकडं वास हुंगत भटकत होती. सुन्याला वाटलं, कुत्री आपल्यावर गुरकणार म्हणून त्यानं चालण्याची गती थोडी कमी केली. कुत्र्यांसमोरून माणसं पावलं मोजत चालू लागली की, ती शांत बसतात. त्यांना माणसांचा वास हुंगायला आवडत असावा. माणसं धुंदीत चालत असली की, त्यांच्या झर्रकन जाण्यानं ती बावचळत असावीत, असं सुन्याला वाटून गेलं.

कुत्री मागं पडली होती. सुन्या आता जोश्याच्या शामच्या किराणा दुकानाजवळ पोहचला होता. शाम नेहमीप्रमाणं दुकानाच्या पुढं झाडझुड करून कचरा जाळत उभा होता. त्याचं रात्री साफसफाई करणं नित्याचं होतं. शाम आपल्याला काहीच बोलणार नाही, याचा अंदाज त्याला आलेला. गावातल्या माणसात आपुलकी राहिली नाही, की आपणचं कोत्या मनाचे झालोत, असा विचार करत करत पावलं टाकणं सुरूच होतं. आता सुन्या किराणा दुकान ओलांडून किसन अण्णाच्या घराजवळ पोहचला. तिथून पुढं गल्लीत अंधार होता.

लाईटचा खांब थेट पुढच्या गल्लीत होता. म्हणून सुन्यानं खिशातून मोबाईल काढून मोबाईलचा फ्लॅश ऑन केला. त्या अंधारात का कुणास ठाऊक त्याला जरासं शांत वाटलं. गल्लीच्या कॉर्नरला तीन-चार बायका रस्त्यावर भजन गात बसलेल्या होत्या. उन्हाळ्याच्या दिवसात जेवण झालं की, बायका एकत्र जमून भजन गात बसतात. त्या भजन गाताना तल्लीन असतात. देवाच्या नामस्मरणात दिवसभराचा क्षीण झावळत जात असावा. नामस्मरणात ताकद असते, असं बाई म्हणायची. पण तिचं काही त्याला खरं वाटलेलं नव्हतं. नाहीतर आत्तापर्यंत नाही तहसीलदार पण किमान ग्रामसेवक तरी आपण व्हायला हवं होतंच.

परिक्षेला जाताना कित्येकदा हनुमान चालीसातले कित्येक दोह्याचे पठण करून झालेत. 'बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार। बल-बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।' तर आपलीच लाज काढणारं होतंच. स्वतःला बुद्धीहीन म्हणून आपण त्या मारोतीकडं काय मागत होतो? फक्त एकदा निकाल मनासारखा लागू दी एवढंच ना! पण कशाचं काय. काय झालं आपल्या जिंदगीत. उगाच विषय घोळवत सुन्या पावलं टाकत होता. आता दोनशे तीनशे पावलावर खैरबांडेच्या दवाखाना आलेला. लांबून दवाखान्याची पाटी लाईटच्या उजेडात चमकत होती.

सुन्या गडबडीच्या देहबोलीवर स्वार झाला. त्यानं मोबाईलचा फ्लॅश बंद करून मोबाईल पॅन्टच्या खिशात टाकला. तिथून दवाखान्याचा गाळा स्पष्ट दिसत होता. पाटीवर लिहिलेल्या नावावर नजर फिरवली. 'श्री क्लिनिक डॉ.डी.के खैरबांडे डी.एच.एम.एस' मळकट रंगात लिहिलेली पाटी आता स्पष्ट दिसत होती. सुन्या घाईनं दवाखान्यात शिरला. तसा त्याच्या नाकात दवाखान्यातल्या औषधांचा उग्र वास घुसला. गाळ्यातल्या कॉटवरच्या गचाळ अशा चिपटी झालेल्या गादीवर शऱ्याची आज्जी पडून होती. खैरबांडेनं तिला सलाईन लावून दिलेलं होतं.

शऱ्या थकलेल्या अवस्थेत भिंतीला पाठ देऊन उभा होता. आज्जी गप पडलेली होती. डॉक्टर खैरबांडे त्या कोचकाडातल्या टेबलच्या मागच्या खुर्चीवर बसून काहीतरी लिहीत होता. त्यांच्याकडे पाहून सुन्यानं हलकीशी परिचयाची लहर चेहऱ्यावर खिळवली. डॉक्टरनं स्मित करत "काय रं सुनील कधी आलास, काय म्हणतोय अभ्यास?" असा नको असणारा प्रश्न विचारलाच. त्यावर सुन्या म्हणला, "पाच-सहा दिवस झालेत. सुरुय चांगला." डॉक्टरनं पुढचं बोलणं उगाच "जेवण झालं का?" वगैरेवर आणलं. त्यावर सुन्या व्हय! आत्ताच झालं म्हणाला. मधेच शऱ्या म्हणाला, "डॉक्टर साहेब सलाईननं फरक पडन ना?" त्यावर डॉक्टरनं भलं मोठं उत्तर द्यायला सुरुवात केली.

सुन्याला खैरबांडे डॉक्टरचे ओठ आणि जीभ हालताना दिसत होती. पण शब्द कळत नव्हते. शून्यात नजर हरवलेली. परत थोड्या वेळानं थाऱ्यावर येत सुन्यानं डॉक्टर खैरबांडेला निरखून पाहायला सुरुवात केली. डॉक्टर शर्ट इन करून होते. अंगात उभ्या धुरकट रेघांचा शर्ट. खिशात पेन आणि डोळ्यावर सोनेरी दांडीचा कित्येक वर्षे जुना चष्मा. डॉक्टर बोलताना एक हात सतत चेहऱ्यावर फिरवत होते. लाईटच्या प्रकाशात त्यांचा काळा चेहरा तेलकट दिसत होता. रेघाळ शर्ट त्यांच्या ढेरीवर घडी मारून बसलेला होता. हात चेहऱ्यावर फिरवताना बोटातली सोन्याची अंगठी लाईटच्या प्रकाशात चमकत होती. त्याला क्षणभर कसलासा मोह झाला. त्याची नजर अंगठीवर स्थिरावली. हातात मोबाईल घेत डॉक्टरनं अंगठी असलेलं बोट स्क्रीनवर फिरवलं. तेवढ्यात शऱ्यानं सुन्याला बाहेरच्या ओट्यावर बसू म्हणत दंडाला हिसका दिला. डॉक्टर पुन्हा कशातरी गढून गेला.

शऱ्या आणि सुन्या दवाखान्याच्या बाहेर येऊन समोरच्या ओट्यावर बसले. ओट्यावर धूळ होती. बसल्यावर आपल्या पॅन्टला धूळ लागणार याचा अंदाज सुन्याला आलेला पण शऱ्या फतकल मारून बसला म्हणून सुन्यानं गप बुड टेकवलं. रात्र निवळत गेली की, गाव शांत होत जातं. आणि तसंही इकडं मंदिराकडच्या सारखी वर्दळ नसते. जनावरांच्या वैरणकाडीला आलेली माणसं तेवढी दिसत असतात. औरंगाबादहून परत गावात आल्यापासून सुन्याचं गावातल्या आजवर किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींकडही लक्ष जायला लागलं होतं. क्लासवाला मोटे मास्तर म्हणायचा अधूनमधून पोरं कंटाळली की, फिलॉसॉफीकल भपऱ्या मारायचा. त्याचंच वाक्य होतं, अस्वस्थता माणसाला अधिक गहीरं करत जाते. ओट्यावर बसल्यावर सुन्याला ते सहज आठवलं होतं.

सुन्या म्हणला, "काय झालतं? डॉक्टर काय म्हणला?""म्हातारी जरा घाबरायलीय. आपुन आखड्यावर बसलेलो तव्हा बाप घरी आलेला. म्हातारीला म्हणत होता, पैसं दे. बापाला वाटतंय, आज्जानं मरायच्या आधी आज्जीकड चंबूगबाळं दिलंय. अन् आज्जी काय ते बापाला द्यायला तयार नाई! म्हणून घरात कावदळ माजीत डब्बेडूबे रिकामे केले. अन् लागला धिंगाणा घालायला. मी घरात गेलो तर सगळा राडाच राडा. तोवर बाप फरार होता. म्हातारी आपलं रडत बसलेली. अंधाऱ्या यायला लागल्यात म्हणत होती, म्हणून आलो इकडं घेऊन. तर ह्येव बाबू बसलाय सलाईन खुपसून. केलीय दोनशे सोय!" शऱ्या भडाभड बोलून गेला. त्याला आपलं बोलणं डॉक्टर खैरबांडे ऐकायला जातंय हेही कळालं नाही. तेवढ्यात सुन्यानं हातानं खुणावत हळू बोलण्याचा इशारा केला.

सुन्या आता दबक्या आवाजात बोलायला लागला, "तू म्हातारीला घेऊन जाय सोबत." "आरं आतालोक हजारदा सांगून झालंय. म्हातारीचा जीवच निगत नाइ तिच्या लेकातून. मी असतो ना तिच्या जागेवर तर लहानपणीच याचा गळा दाबून टाकला असता." शऱ्या संतापून म्हणला. सुन्यानं पुन्हा एकदा शऱ्याला आवरतं घ्यायला लावलं. सुन्या आणि शऱ्याचं बोलणं सुरू असताना डॉक्टर इकडून तिकडं चक्कर मारत होता. सुन्याच्या ते लक्षात आलं म्हणून त्यानं विषय बंद केला. आणि बसल्या जागेवरून उठत नाईट पॅन्टवरची धूळ झटकत "चल रं उठ आज्जी एकटीचय तिकडं" म्हणत शऱ्या आणि तो दवाखान्याच्या गाळ्यात आले.

शऱ्या पुन्हा भिंतीला पाठ देऊन उभा राहिला. सुन्याला आपण इथंवर आलो पण अजून आज्जीला काहीच बोललो नाहीत याचं जरासं संकोचल्यासारखं वाटलं. म्हणून मग त्यानं कॉटजवळ जात "आज्जी बरं वाटायलंय ना!" अशीच कोरडी शब्द फेक करून बघितली. त्याचे शब्द ऐकून आज्जीच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. आवंढा गिळत आज्जी म्हणाली, "शरूनं भाकर खाल्ली नाइ अजून! त्याला भूक लागली असन." तसा शऱ्या म्हणला, "अक्का खालीय भाकर म्या!" च्यायला इतकं वेळ आपण शऱ्याला साधं जेवण केलंस का नाही एवढंही विचारू शकलो नाहीत, यावरून त्याला स्वतःचीच चीड आली. पण चीड ठळक होऊ न देता, त्यानं आज्जीला बघतो त्याच्या भाकरीचं! तुम्ही नका ताण घेऊ, असलं विश्वासदर्शक वाक्य फेकलं. शऱ्यानं त्यावर सुन्याला नजरेनं खुणावत पुन्हा शांत राहायला सांगितलं.

तेवढ्यात दवाखान्यात घाई गडबडीत चेअरमनचा अर्जुन बप्पा आला. त्याच्या गाडीच्या फायरिंगवरून दोघांनाही अंदाज आलेलाच. दोघेही गाळ्यातून समोर बघत होते. अर्जुन बप्पा गाडीवरूनच म्हणाला, खैरबांडे डॉक्टर ओ डॉक्टर! चला बरं बिगीनं लई अर्जेंट गरजय तुमची!" अन् बाईकला एक्सरलेटर देत 'बसा की, लवकर!' म्हणत डॉक्टरला गाडीवर बसवलं. डॉक्टर गाडीवर बसत म्हणाले, "शरद आत्ता जाऊ लगेच वापस येतो. सलाईन संपलं त नुसती तेवढी पुंगळी फिरव. आलोच!" अन् सुसाट गाडी दामटवत अर्जुन बप्पा डॉक्टरला घेऊन निघून गेला.

दोघांनीही कसलाच अंदाज बांधला नाही आणि त्यावर चर्चाही केली नाही. दवाखान्यात आत्ता शांतता पसरली होती. सलाईनमधला थेंब हळूहळू टिपकत होता. जांभई देत सुन्या मोबाईल चाळत होता. आणि शऱ्या त्या सलाईनच्या नळीच्या तोंडाला असलेल्या डब्बीत पडणाऱ्या थेंबाकड बघत होता. अधूनमधून उठून भुकेला वटकन म्हणून डॉक्टरच्या बाटलीतलं पाणी पीत होता. आज्जीची पापणी लवत होती. शऱ्यानं भिंतीला पाठ देऊन कॉट शेजारी अंग मोकळं सोडलं. सुन्याही कॉटच्या लोखंडी पाईपवर अर्ध टिरीवर बसून कंटाळा होता. म्हणून त्यानेही कॉटवरच्या मोकळ्या जागेवर बुड टेकलं. पूर्वरात्रीनं वातावरणाला कवटाळायला सुरुवात केली होती.

क्रमशः

#गोतावळा_६

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT