Nashik News : निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भारनियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीजपुरवठा (Electricity Supply) करावा या मागणीसाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी ओझर येथील महावितरण कंपनीच्या (Mahavitaran) कार्यालयावर धडक मोर्चा काढून ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
या वेळी ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीजपुरवठ्याबाबत (Electricity Supply) निवेदन देण्यात आले.
सध्या उन्हाचा चटका वाढत असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करावे लागत आहे; मात्र वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, देखभालीअभावी ट्रान्स्फॉर्मर जळणे, वीज तारा लोंबकळणे असे प्रकार होत आहेत.
त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होत असून शेतकरी त्रस्त आहेत. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतीमाल उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. याचा विचार करून आठ तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, आनंदराव बोराडे, विनायक चौधरी, अरुण घुगे, डॉ. योगेश्वर चौधरी, देवीदास चौधरी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
सुरळीत पुरवठ्याचे आश्वासन
परिसरातील अनेक शेतकरी नियमित कृषीपंपाचे बिल भरत असूनही अशी परिस्थिती होते, हे योग्य नाही. याशिवाय क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागणे व बोलण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सहायक अभियंता मोरे यांनी शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शेतीसाठी वीजपुरवठा सुरू असताना देखभालीची कामे शक्यतो केली जाणार नाहीत, असे आश्वासनही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
सध्या द्राक्ष बागेसह कांदा, गहू, भाजीपाला या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे; मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे.अर्जुन बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना
तांत्रिक कारणाव्यतरिक्त सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार आहोत. तसेच, ग्राहकांनी अनधिकृत आकडे टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापर करू नये. अनधिकृत वीज वापरामुळे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.योगेश्वर पाटील, उप कार्यकारी अभियंता-ओझर उपविभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.