Pune News : पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या आडमुठेपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अ वर्ग परवानाधारक खोतीदारांचे परवाने रद्द करत, त्यांना भाजीपाला विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. काही संचालकांच्या बगलबच्चांना व्यापारासाठी जागा देण्यासाठी आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप खोतीदारांनी करत आंदोलन सुरू केले आहे.
खोतीदार व्यापाऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रयत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात रविवारी (ता.२८) आक्रोश मोर्चा काढून आंदोलन केले. दोन दिवसांत खोतीदारांना बाजार आवारात प्रवेश दिला नाही, तर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
मांजरी उपबाजारात गेल्या तीन महिन्यांपासून खोतीदारांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होत असल्याचा आरोप करून रविवारी (ता.२८) रयत शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चा काढून संचालक मंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली; तसेच खोतीदारांना बाजार आवारात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली.
या प्रसंगी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश देशमुख, शेतकरी नेते पांडा काळे, रामदास कोतवाल, मारुती तुपे, विलास भुजबळ, हेमंत चौधरी, अजय सावंत, कल्पना गव्हाणे आदी उपस्थित होते.
आंदोलनानंतर बाजार समितीचे विभागप्रमुख किरण घुले यांना निवेदन देण्यात आले. या सर्व प्रश्नावर बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव आर.एस. धोंडकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
खोतीदार म्हणजे काय
खोतीदार व्यापारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून शेतातील उभ्या पिकाची खरेदी करतात. या पिकाची तोडणी, प्रतवारी, पॅकिंग आणि वाहतूक करून, थेट बाजार समितीत आणून विक्री केला जातो.
अनेक वर्षांपासून आम्ही मांजरी उपबाजारात शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करत आहोत. गेली अनेक वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक होते तेव्हा कोणतीही अडचण नव्हती. मात्र आता काही संचालकांची माणसे बाजार दुपारी २ वाजता सुरू होण्याची वेळ असताना, नियमबाह्य पद्धतीने विनापरवाना सकाळी ११ वाजताच शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. आमचे परवाने रद्द करत आमच्यावर अन्याय करत आहेत.- बाळासाहेब भिसे, खोतीदार आणि उपोषणकर्ते
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.