Rain Update : मागील आठ ते दहा दिवसांपासून दिवसाआड पुणे शहर, उपनगर व इतर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांच्या मशागतीची कामे रखडली आहेत. या पावसाने अनेक ठिकाणी, झाडे तसेच घराच्या भिंती कोसळण्याचे प्रकार घडले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपासून पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण दररोज सायंकाळी तयार होत आहे. तर दिवसाआड मॉन्सूनपूर्व पाऊस मेघगर्जनेसह धो-धो कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक झाडे पडली, तर हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त होत आहेत.
सोरतापवाडीसह काही ठिकाणी पॉलिहाऊसचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी फळबागा, भाजीपाला, उन्हाळी बाजरी, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी (ता.१९) पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतील परिसरात दुपारी चारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. वडगावशेरी, हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी, कोथरूड, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, कोथरूड, वारजे, धायरी, औंध परिसरांत जोरदार पाऊस झाला.
सोमवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
हवेली १६.५, वडगाव शेरी १६.०, हडपसर १५.०, मगरपट्टा १४.०, चिंचवड ११.५, दौंड १०.५, बारामती ९.४, एनडीए ९.०, शिवाजीनगर ६.४, तळेगाव ढमढेरे ४.०, राजगुरुनगर २.५, कोरेगाव पार्क १.०
शेतकरी हवालदिल
सध्या उन्हाळा संपत आल्याने शेतकरी खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामांसाठी आतूर झाला असला तरी रोजच मॉन्सूनपूर्व पावसामुळे हतबल झाले आहेत. शेतीची मशागत होऊन पाऊस झाला तर तो पिकांसाठी उपयुक्त ठरतो. तालुक्यात रस्त्यावर, शेतात झाड कोसळणे तसेच वीज कोसळण्याचे दोन-तीन प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
‘हिरवा चारा उगवू लागला’
पंधरा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने माळरानावर तसेच शेताच्या बांधांवर हिरवा चारा उगवू लागला आहे. त्यामुळे जनावरांना उन्हाळ्यात काही प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध येणार आहे. तसेच, पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असल्याचे भोर तालुक्यातील वाजेघर येथील लक्ष्मण खेडकर यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.