Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Aashadhi Wari 2024 : देवाच्या दारी, स्वच्छता भारी

Palkhi Sohala 2024 : १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीला पहाटे तीन वाजता विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि माझ्या शिरस्त्याप्रमाणे पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा सुरू केली. लोक-भाविक न्याहाळत, काहींशी गप्पा करत मी अख्खे पंढरपूर पायी पालथे घातले. सगळीकडे भारी स्वच्छता दिसली.

Team Agrowon

अरुण चव्हाळ

Aashadhi Wari Pandharpur: १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीला पहाटे तीन वाजता विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि माझ्या शिरस्त्याप्रमाणे पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा सुरू केली. लोक-भाविक न्याहाळत, काहींशी गप्पा करत मी अख्खे पंढरपूर पायी पालथे घातले. सगळीकडे भारी स्वच्छता दिसली.

पंढरीची वारी, आनंदाची वारी, अनुभवाची वारी, आरोग्य वारी, निर्मल वारी-हरित वारी असे वारीचे विविध रूपं बदलत्या काळानुरूप आपणास दिसत आहेत. आपल्या बदलानुसार आणि विचारांच्या विस्ताराने कर्मसंस्कृती जपल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मुळातच असे आहे, की शेती, शिक्षण, संस्कार आणि स्वच्छता या प्रत्यक्षात करण्याच्या गोष्टी आहेत.

श्रमसंस्कृती जोपासणारी माणसं, काबाडकष्ट करून जगणारी माणसं या चारही गोष्टी नित्यनेमाने करतात. प्रश्‍न आहे तो, साहेबी लोकांच्या मनोवृत्तीचा आणि स्वच्छता करण्याच्या कष्टाचा! कष्टाची कामे करणे हे कमी बुद्धिवंतांचे काम आहे आणि ज्ञानी लोक कष्ट करत नाहीत, या अशा आत्मघातकी वागण्यामुळे स्वच्छतेचा इस्कोट होतो. मुद्दा हा आहे, की यंदा २०२४ मध्ये आषाढी वारीला पंढरपुरात यात्रेच्या दरम्यान खूप स्वच्छता ठेवलेली आहे. अगोदर पंढरपुरात आणि चंद्रभागेच्या वाळवंटात भाविक नाकाला रुमाल धरून आणि आयाबाया तोंडाला पदर बांधून मार्गक्रमण करायच्या.

अस्वच्छता का होत होती?
लाखो लोक पंढरपूरला वारीच्या निमित्ताने एकत्र येतात. अशावेळी बंदिस्त शौचालये आणि फिरती शौचालय असायची, पण भाविकांपेक्षा त्यांची संख्या नगण्य होती. प्रातर्विधी एकाच वेळी आटपायची घाई असल्यामुळे आणि पंढरपूर नगर परिषदेनेही स्वच्छताकर्मी नियुक्त केल्यामुळे झालेली घाण त्यांनीच साफ करणे, अशी विचित्र व्यवस्थाच तयार झाली होती. त्यामुळे पंढरपुरात जत्रेच्यावेळी-जत्रेनंतर पाऊस असायचा, अशावेळी गावात नाल्या तुंबल्यामुळे आणि रस्त्यांवरील कचऱ्याच्या घाणीमुळे रोगराई पसरायची. चंद्रभागापात्रात मलमूत्र विसर्जन महापुराच्या पाण्यात विघटित व्हायचे. पण पंढरपूरकरांना आणि खालील गावांना नदीपात्रात आलेल्या पाण्यामुळे घाण पाण्याचा आरोग्यदृष्ट्या आणि शेतीसाठी अपाय व्हायचा. या गोष्टी सगळ्यांना माहीत होत्या. पण भावनाप्रधान सरकारी यंत्रणा शांत राहायची. खमक्या अधिकारी मिळाल्यानंतर ‘स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर’ या अभियानाला सुरुवात झाली.

१७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीला पहाटे तीन वाजता मी विठ्ठलाचो दर्शन घेतले आणि माझ्या शिरस्त्याप्रमाणे पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा सुरू केली. रस्त्यावरच्या टपरीवर चहा पीत, लोक -भाविक न्याहाळत, काहींशी गप्पा करत मी पंढरपूर पायी-पायी पालथे घातले. स्टेशन रोड, चौफळा, मंदिर परिसर, प्रदक्षिणा रोड, भक्तिमार्ग, संत पेठ, शिवाजी चौक, पंढरपूर अर्बन बँक रस्ता, रेल्वे पुलाखालील दोन्ही बोगदे, सरगम चौक, टाकळी रेल्वे बोगदा, पद्मावती उद्यान समोरील रस्ता, तुळशी वृंदावनाकडे जाणारा रस्ता, बायपास रस्ता, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि गोपाळपुरा, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा नदीवरील जुना आणि नवीन पूल, ६५ एकरांवरील एसटी स्टँड, संत गजानन बाबा मंदिर संस्थान आणि असंच गल्लीबोळात हिंडलो. मठ, धर्मशाळा, मंगल कार्यालये, हॉटेल्स, राहुट्यांचे तळं, दुकाने सगळं काही बारीकपणे पाहिले. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लगेच नजरेत आणि डोक्यात पक्के झाले, की पंढरपुरात निश्‍चित स्वच्छता नांदत आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांनी ३ जुलै २०१४ रोजी निर्देश देऊन पंढरपूरच्या वारीदरम्यानच्या स्वच्छतेविषयी अंमलबजावणी करण्याचे सांगितले. तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या धडक स्वच्छता मोहिमेमुळे आज स्वच्छतेचे प्रत्यक्ष अनुभव चांगले येत आहेत.

आपल्या लोकशाहीमध्ये सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता आणून स्वच्छता उजळ करणारे हे अधिकारी महत्त्वाचे आहेत. आता त्यांचा कित्ता पंढरपूरमध्ये गिरवला जातोय, हे महत्त्वाचे आहे.
पंढरपूर नगर परिषदेचे स्वच्छताकर्मी कामाच्या बाबतीत खूपच जागरूक दिसताहेत. एखादा-दुसरा भाविक चंद्रभागेच्या काठाला लघुशंकेसाठी उभा राहिलेला दिसला, की ते एकसारख्या जोरजोरात शिट्ट्या फुंकताहेत; त्याच्यापुढे किंवा बाजूला जाऊन उभे राहत आहेत; त्यामुळे स्वच्छतागृहात भाविक आपोआप जाताहेत. ‘सुंठीवाचून खोकला घालण्याचे’, त्यांचे हे कसब वाखाणण्याजोगे आहे. या वेळी शौचालयाच्या बाजूला पाणीपुरवठ्याची भरपूर आणि अखंड सोय आहे. चंद्रभागा पात्रात महिलांना कपडे बदलण्याची कापडी घरं ठिकठिकाणी दिसत आहेत. चहावाले आणि फराळवाले छोटे-छोटे विक्रेते, पाणीविक्रेते स्वतः कापडी पिशव्यांत चहाचे रिकामे कोन, प्लॅस्टिकच्या बाटल्या, बिड्या-तंबाखूचे कागद, भाकर तुकड्याचे कुटके जमा करून टाकताना दिसले. खेड्यातील माणसांनी मेणकापड, खताच्या थैल्यांचे चवाळे अंथरुणाला आणि कपडे ठेवायला सोबत आणले आहेत. त्यामुळे वर्तमानपत्रांची कागद किंवा पुठ्ठे वाळवंटात टाकून त्यावर झोपणारी भाविक मंडळी या वेळी दिसत नव्हते.

मी तर रात्री मुद्दाम वाळवंटात डोक्याला रुमालाचे टापर बांधून आराम केला. नदीपात्रात अन्नपदार्थ फेकून न दिल्यामुळे व येणाऱ्या गार हवेच्या झुळकेने मस्त डुलकी लागली. शुद्ध हवा-स्वच्छ हवा आणि त्या हवेत अन्नपदार्थांचा दर्प नाही. चंद्रभागेच्या पूर्वेला आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), पंढरपूर तर्फे प्रभुपाद घाट अर्थातच, कृष्णपाद घाट बांधलेला आहे. त्याचे बांधकाम मजबूत आणि देखणे झाले आहे. त्या ठिकाणी अत्यंत स्वच्छ पाणी असल्यामुळे भाविकांनी स्नानासाठी मोठी गर्दी केलेली आहे. देवस्थानाने अशी डोळस भूमिका घेतल्याने चांगला पायंडा पडलेला आहे. नगरपरिषदेने तीन-चार मजली शौचालये बांधलेली आहेत, पंढरपूरकरवासीय नाममात्र दरात स्वतःची घरगुती शौचालये वापरू देतात. त्यामुळे स्वच्छतेला हातभार लागतो. लोहदंड तीर्थावर पूर्वी खूप गर्दी असायची, डुबकी मारण्यासाठी भाविक याच ठिकाणी यायचे. आता मात्र ही गर्दी चांगल्या बांधकामामुळे आणि स्वच्छ पाण्यामुळे प्रभुपाद घाटाकडे वळली. आणखीही पूर्वेला अशी घाट आणि चंद्रभागेच्या पश्‍चिमेला अर्थातच, काठावर कडुनिंबाचे आणि गुलमोहराचे झाडे लावली तर सावलीसाठी विसावा आणि ‘सुंदर परिसर, स्वच्छ परिसर’ तयार होऊ शकतो.

‘माऊली लगबग चालली गं,
पंढरपुरात बजबज नव्हं गं’,

या कर्णमधुर आणि काळीजकोरीव डोंबाऱ्याच्या गाण्याने सत्यता अनुभवास आली. यात्रेकरू-भाविक स्वस्वच्छता पाळत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषदेचे कर्मचारी, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महाद्वार घाटावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र, गृहरक्षक दल, नदीपात्रातील बोटधारक, गस्त पथक, स्वयंभू रक्षक अशा कितीतरी सरकारी आणि सामाजिक सेवांचा संगम पंढरपूरच्या यात्रेत दिसून येत आहे. या अनुषंगाने सगळ्यांच्या मनातील पवित्र भावना आणि कर्तव्य श्रेष्ठ आहे. ‘देवाच्या दारी, स्वच्छता भारी...’ दिसत आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा हे भाविकांना-भक्तांना आता खऱ्या अर्थाने कळले आहेत, असे म्हणावे लागेल. पंढरपूरच्या पांडुरंगाने स्वच्छता दाखवलेली आहे; ती गावागावांत गेली, तर लोकांचे आरोग्य चांगले राहील आणि होणारा खर्च टळेल. स्वच्छतेने अनेक गोष्टींचा शाश्‍वतपणा टिकतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, स्वच्छता वारीची स्तुती केली. सरकारला आणि समाजाला सगळ्याच गोष्टींची स्वच्छता पाहिजे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीमार्फत दिले जाणारे ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार महत्त्वाचे आहेत. लाखांच्या बक्षिसांचे मोल आणि स्वच्छतेचे मोल देवाच्या द्वारी आणि गावाच्या अंगोपांगी सारखेच आहे. मनावर घेतल्यावर गावात स्वच्छता अवतरते. चला, स्वच्छतेच्या कामाचं चांगभलं!

अरुण चव्हाळ, ७७७५८४१४२४ (लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT