ॲग्रोवन वृत्तसेवा
Vijay Vadettivar : मुंबई : ‘‘कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल असा महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार आहे, असा संदेश या बदलीतून सरकारने दिला आहे,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (ता. १४) केली.
कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची नुकतीच सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली. अवघ्या दोन महिन्यांत ही बदली करण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावांना विरोध केल्याने ही बदली केल्याचे बोलले जात आहे. यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचं भलं करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरीविरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे.
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला श्रीमती राधा यांनी आक्षेप नोंदविला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत राधा यांचे होते. शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळविण्यासही विरोध होता. या योजनेतील १४०० कोटी वळविण्याला त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टहास होताच.
व्ही. राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपांच्या खरेदीवर आक्षेप घेतला होता. ‘यामध्ये अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा व्ही. राधा यांनी संबंधित फाइलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने श्रीमती राधा यांची बदली केली. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत हे दुर्दैव असून, कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.