Satara News : कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या उसाच्या खोडव्याच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उसाच्या पाचटापासून मिळणाऱ्या खतामुळे जमिनीची सुपीकता टिकण्याबरोबरच भांडवली खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
पाचट व्यवस्थापन व योग्य नियोजनातून खोडव्याचे एकरी शंभर टनावर उत्पादन शक्य आहे, असे मत पुणे कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी ‘ऊस उत्पादन वाढ व खोडवा व्यवस्थापन’ विषयावर व्यक्त केले.
दै. ‘ॲग्रोवन’, जिल्हा मध्यवर्ती बँक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे स्व. आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात डॉ. फाळके बोलत होते. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नेटाफिम इरिगेशनचे एसबीयू हेड कृष्णात महामूलकर, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, कांचन साळुंखे,
अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, संचालक सर्जेराव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, मुख्य व्यवस्थापक राजेश निंबाळकर, ॲग्रोवनचे उपसरव्यवस्थापक संभाजी घोरपडे आदी उपस्थित होते.
डॉ. फाळके म्हणाले, ‘‘ऊस उत्पादनवाढीसाठी तीन प्रकारांत बदल करावे लागणार आहे. त्यात निरोगी बियाण्यांसाठी रोपाचा बियाणे मळा करा, दर्जेदार व निरोगी बियाण्यांमुळे १५ ते २५ टक्के उत्पादन वाढ होते. खते देण्याची पद्धतीत बदल करा, खते माती आड करा. पाण्यासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही.
ठिबकमुळे योग्य पाणी व वॉटर सोल्यूबल खते जात असल्याने मातीची सुपीकता टिकवणे शक्य होणार आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या उसाच्या खोडवा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.’’
ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना हवामान आधारित शेती करावी लागणार आहे. चुकीच्या व्यवस्थापनातून मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनीचा पोत टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीची पद्धत बदलावी लागेल.
खताचे दर वाढ होत असल्याने कमी खर्चात उसाच्या उत्पादनात वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. जिल्हा बँक, अजिंक्यतारा कारखाना, कृषी विद्यापीठे, तसेच ॲग्रोवन तुमच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत आहे. त्याचा लाभ घ्या.’’
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘ऊस उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शेतकऱ्यांना हेल्थ कार्ड दिली जात आहेत. उसाचे उत्पादन वाढ व्हावी, अतिपाणी व खते यामुळे खराब झालेल्या शेतजमिनीवर उपचार करण्यासाठी जिल्हा बँक, कारखाना व ॲग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’’
ऊस उत्पादनवाढीत ४० टक्के खते, पाणी व्यवस्थापनाचा वाटा आहे. पाण्याची टंचाई, जमिनीचे आरोग्य व मिळणाऱ्या विजेचा मेळ घालण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. नेटाफिम शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून काम करत आहे. इस्राईल देशातील ४५० शेतकऱ्यांनी एकत्र येत नेटाफिम कंपनी स्थापन केली आहे.
राज्यात गेली ३२ वर्षे नेटाफिम सेवा देत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे कृष्णात महामूलकर यांनी सांगितले. श्री. सोळसकर यांनी ॲग्रो संवाद कार्यक्रमाचा हेतू सांगितला. श्री. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. श्री. निंबाळकर यांनी आभार मानले.
जिल्हा बँकेचा पुढाकार...
जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व सुधारण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. बँक व महात्मा फुले कृषी महाविद्यालय, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या सामंजस्य करार केला आहे.
यात जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. याचा जिल्हा बँक ५० टक्के, साखर कारखाना २५ टक्के व शेतकरी सभासद २५ टक्के खर्च करणार आहे. या अंतर्गत अजिंक्यतारा कारखान्यांच्या सभासद शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.