Maize Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Crop Issue : मक्याला आले मोड; सांगा कशी होईल दिवाळी गोड?

Maize Update : कुक्कुट खाद्य, मका प्रक्रिया तसेच चाऱ्याची उपलब्धता यामुळे गेल्या दशकापडून मका पीक हे नाशिक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वाढत गेले.

मुकूंद पिंगळे

Nashik News : कुक्कुट खाद्य, मका प्रक्रिया तसेच चाऱ्याची उपलब्धता यामुळे गेल्या दशकापडून मका पीक हे नाशिक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वाढत गेले. यंदा सरासरीच्या तुलनेत पेरणी वाढल्याची स्थिती आहे. मात्र या पिवळ्या सोन्याला पावसाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली मक्याची कणसे पाण्यात भिजून तरंगत होती. आता मक्याचे दाणे काळवंडले तर कणसाला मोड येत आहेत. या नुकसानीमुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान आहे. त्यामुळे ‘‘मक्याला आले मोड, सांगा कशी होईल दिवाळी गोड’’ याच विवंचनेत मका उत्पादक शेतकरी आहेत.

जिल्ह्यात मक्याचे सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख १७ हजार हेक्टर इतके आहे. तर प्रत्यक्षात २ लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पेरणीची टक्केवारी यंदा १२८ टक्के इतकी होती. मक्याची वाढ चांगली होऊन चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र आता ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मका पिकाची दैना केली आहे. कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान १९०३१.३० हेक्टरवर तर १४ ते १९ ऑक्टोबर दरम्यान ११,५८४ हेक्टरवर नुकसान आहे. मात्र बहुतांश भागातील आकडेवारी अद्यापही कृषी विभागाकडे आले की नाही असाही सवाल उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे शिवारात पाणी असल्याने अनेक ठिकाणी मका कापणीची कामे खोळंबली. आता पाणी कमी झाल्यानंतर व शिवार कोरडी झाल्यानंतर पुन्हा एकदा मका कापणीची लगबग सुरू झाली आहे. ऐन सणासुदीला ही कामे शेतकऱ्यांना करावी लागत आहेत. त्यातही मजूर भेटत नसल्याने अजूनही हा मका काढून खळ्यावर आला नाही. जनावरांसाठी चाराही उपलब्ध होणार नाही. त्यातच दिवाळीला हातात पैसा नसल्याने सण कसा करायचा, हाही प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

दिवाळी यंदा गोड नाही

मक्याची सोन्यासारखी पिवळी कणसे पाण्यात तरंगत असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर दाणे काळवंडले. त्यामुळे मका काढणी होऊन तो विकता आला नाही. आर्थिक नुकसान वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीसारख्या सणालाही पैसा नाही. आता तोंडाशी आलेला घास अस्मानीने हिरावला आहे. त्यामुळे जो साऱ्या जगाला पोसतो त्याच्या शेतकऱ्याच्या लेकरांची दिवाळी यंदा गोड होणार नाही.

तालुकानिहाय नुकसान (नुकसान हेक्टरमध्ये)

तालुका ११ ते १३ ऑक्टोबर नुकसान १४ ते १९ नुकसान तालुकानिहाय एकूण नुकसान

मालेगाव ४,५५० ५४९ ५,०९९

सटाणा १२,५०० ४,७८० १७,२८०

कळवण ० २६१ २६१

देवळा १,९८३ २,८०४ ४,७८७

निफाड ५.८० १०२ १०७.८०

चांदवड ३९२.५० २,४९३ ८,७८५.५०

येवला ० ५९५ ५९५

पावसामुळे मकाच्या बिट्यांना कोंब आले आहे. चारा संपूर्ण खराब झाला आहे. किती नुकसान झाले हे मका काढणी झाल्यावर कळेल.
गणेश चव्हाण, मका उत्पादक शेतकरी, उगाव, ता. निफाड
वादळी वाऱ्यासह पावसाने काढणीस आलेला मका भुईसपाट झाला. शेतात पाणी साचल्याने कणसे पाण्यात भिजले. त्यामुळे कोंब निघाल्याने ४० टक्के नुकसान आहे. उर्वरित मका दाणे आहे, ते काळवंडल्याने प्रतवारी नाही. त्यामुळे दरात मोठा फटका बसणार आहे.
महेश कलंत्री, मका उत्पादक, सायने खुर्द, ता. मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marigold Flower Rate : लाल-पिवळ्या झेंडूचा भाव वधारला

Crop Damage Survey Issue : पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

SCROLL FOR NEXT