लेखिका - कल्पना दुधाळ
एके दिवशी शाळेत शिक्षक सांगत होते, कोणतंही काम मन लावून केलं की चांगलं होतं. प्रत्येक गोष्ट मनापासून करा. साधी भाकरीसुद्धा अशी करा की, तिच्यासारखी सुंदर तीच असेल. शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवण्याचं ते शाळकरी वय होतं. ती वाक्यं डोक्यात ठेवून शाळेतून घरी आले होते. गावातल्या शाळेतून चार किलोमीटर चालत शेतात घरी येईपर्यंत खूप भूक लागायची. आल्या आल्या घरात जे असेल ते खायचं. त्या दिवशीही भूक लागली होती. नेहमीप्रमाणे शिंक्यावरचं टोपलं खाली घेतलं. टोपल्यात भाकरी नव्हत्या. पातेल्यात थोडी आमटी होती. मी ठरवलं, आज आपण मन लावून छानपैकी भाकरी करायची. गरम गरम भाकरी खायची. रोज तर टोपल्यातली सकाळची गारठोण, वाळलेली भाकरी खावी लागते. मग काय, मी नव्या जोमानं कामाला लागले.
आईनं चूल पेटवायला आणून ठेवलेल्या बारीक काटक्यांनी चूल पेटवली. चुलीवर तवा ठेवला. पिठाचा डबा घेतला. वाडग्यात पाणी घेतलं. आईसारखी ऐटीत पाटावर बसले. काटवटीत पीठ घेतलं. पिठात पाणी घेऊन पीठ मळायला लागले. कधी पाणी जास्त तर कधी पीठ जास्त झालं. कसंबसं गोळा करून पीठ मळलं. भाकरी थापायला पिठाचा बारीक उंडा घेतला. उरलेल्या पिठाचा गोळा बाजूला ठेवला. थापायला सुरुवात केली. थाप थाप थाप करत कशीबशी भाकरी थोडी गोल होता होता काटवटीत जी चिकटून बसली ती जागची हलेना. कशीच कुठं सरकेना. मग मोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. मोडली.
पुन्हा थोडं पाणी, थोडं पीठ असं करता करता पिठाचा बराच मोठा गोळा झाला. तो बाजूला ठेवला. मग काठवटीत कोरडं पीठ टाकून पुन्हा बारीकसा उंडा थापायला घेतला. थापताना तो सगळीकडून चिरला. भिजवलेलं पीठ तर होतंच शिल्लक. मग चिरलेल्या जागा पीठ लावून बुजवून घेतल्या. चुलीकडं बघते तर चुलीतल्या आधीच्या काटक्या पार विझून गेलेल्या. फू फू फू करून ही जाळ होईना मग कागद टाक, रॉकेल ओत असं करून चूल पेटवली. आता भाकरी तव्यावर टाकायची तर दुहेरी भीती. एकतर न मोडता अख्खी भाकरी उचलायची कशी ? दुसरी गोष्ट तवा हाताला भाजायची भीती. मग अर्धी भाकरी तव्यात, अर्धी खाली ! पण शेवटी अर्धा अर्धा भाग तव्यात जाऊन तिथं जरा गोल झाला. मग जरा बरं वाटलं. पण तोपर्यंत पुन्हा चूल विझलेली. मग पाटावरून उठून जाळ घालायला चुलीपुढं आले. तर चूल पेटवायला आणलेल्या बारीक काटक्या संपल्या होत्या. पळत जाऊन घरामागूण काटक्या आणल्या. चुलीत सरकवल्या. आता जाळ घालायची बराचवेळ काळजी नव्हती. आई भाकरी करत असताना चुलीपुढं बसून मी भाकरीचे कडक पापोडे मोडून खायचे ते आठवलं. विस्तवावर भाजलेल्या भाकरीचा खरपूस, खमंग वास आठवला. अख्खी फुगलेली भाकर हाव-यासारखी घेताना भाकरीची वाफ लागून कातडीची आग झालेली आठवली. पण नुसतं आठवून काय उपयोग ? आज मी प्रत्यक्ष भाकरी करत होते. मग मी पुन्हा आईच्या जागेवर भाकरी थापायला आले. उलथण्यानं भाकरी उलथायला लागले तर भाकरी बसलीय तव्याला जाम चिकटून.
शिवाय पाणी लावायचं राहिलंच की ! भाकरीला पाणी का ग लावायचं असतं आई, असं विचारल्यावर आई म्हणाली होती- पाणी लावल्याशिवाय भाकरीला पापोडा कसा काय येईल ? ते आठवून मला माझ्या भाकरीवर टम्म पापोडा फुगल्याचा भास झाला. पण हाताला भाजायच्या भीतीनं भाकरीवर पाणी इतकं जास्त झालं की काय करावं तेच कळेना. मग हळूच सांडशीनं तवा जरा कलता करून पाणी निथळलं. तर हा मोठा पिठाच्या पाण्याचा पांढरा ओघळ चुलीवरनं खाली ! चुलीवर असं काही सांडलेल्याचा आईला भारी राग यायचा. घरी आली की पहिल्यांदा त्यावरून ओरडणार, ती भीती वेगळीच. म्हणून अगोदर कसंतरी ते निस्तरावं लागलं. आता तव्यातली भाकरी उलथायची कशी ?एकदा आई म्हणाली होती, भाकरी तव्यात पचली नाही तर उलथत नाही. मला वाटलं तशी पचली बिचली नाही की काय ? पण काय झालंय ते कळायला काही मार्ग नव्हता. मग भाकरीखाली उलथणं घालण्याच्या नादात तव्याला हात लागून हाताला चंद्रकोरीसारखं भाजलं. पण भाकरी काही केल्या उलथता उलथेना. मग रागानं उलथायच्या नादात तव्यात तुकडेच तुकडे झाले. एवढं करून भाकरी मोडलीच शेवटी.
आता काय करायचं ? भिजवलेल्या पीठाचा हा एवढा मोठा गोळा बघून माझ्या पोटात गोळा आला. काटवटीच्या भवताली पीठाची, पाण्याची सांडलवंड झालेली. उलथणं पिठानं रेडबाडलेलं. चुलीवर भाकरीचे तुकडेच तुकडे पडलेले. सरपण इकडंतिकडं पसरलंय. शंभर भाकरी केल्यासारखे माझे हात पिठानं भरलेले. असा सगळा राडा झालेला. आता भाकरीच्या ऐवजी घरातल्यांची बोलणी खावी लागणार होती. घरी कुणी यायच्या आधी ‘बघा आज मी स्वतः भाकरी करून खाल्ली, तुम्हाला काय वाटलं मला काय साधी भाकरी करायला येत नाही’ असा तोरा मला मिरवायचा होता. पण कशाचं काय ?
अंधार पडायला लागला होता. माझा भाकरखेळ चालूच होता. भूक लागलेली. त्यात हा इतका पसारा. शेतातून सगळेजण घरी आले. पहिल्यांदा भाऊ घरात आला, अरे अरे, हे काय बघतोय मी ? मी चुकून दुसऱ्या कुणाच्या घरी आलो की काय ? थांब चिमटा घेऊन बघतो असं म्हणत मोठमोठ्यानं हसायला लागला. मला त्याचा खूप राग आला. मी मनातल्या मनात म्हणत होते, ही भाकरी बिकरी कुणी कशाला शोधून काढली असेल बरं ? काय गरज होती एवढा कुटाना करायची ? वैतागय नुसता. कुणी शोध लावला की, अशानं असं धान्य पिकवावं, वाळवावं, निवडावं, दळून त्याचं पीठ करावं. त्याची इतक्या सायासानं भाकरी करावी आणि मग खावी. कुणाला दुसरा काहीच उद्योग नव्हता म्हणून हा भाकरी करण्याचा शोध लावला. त्यापेक्षा तांदूळ घ्या, धुवा, शिजवा, झाला भात. तसं का नाहीत करत ? शिवाय मला चुलीचापण राग आला होता. रोज आईशी शहाण्यासारखी वागणारी चूल आज मी पेटवायला गेले तर सारखी विझतेय काय, धूराचे लोट करतेय काय, कशी भाजणार भाकरी ? तेवढ्यात भाऊ बाकीच्या मंडळींना हे अद्भूत दृश्य बघायला घेऊन आला. सगळा पसारा बघून आईचा पारा चढला. म्हणाली,
टोपल्याला मुंग्या लागल्या होत्या म्हणून भाकरी ताटाखाली झाकून ठेवल्या होत्या. बघीतलं नाही का तू ? इकडं तिकडं जरा हुडकायला डोळं नाहीत का तुला ?
अरे देवा, इतकं कशाला करत बसले मी ? ताडकन उठून हात धुतला आणि जेवायला घेतलं. भाकरी करता आली नाही म्हणून मला भाकरीचा, चुलीचा राग आला होता खरा पण दुसऱ्याच क्षणाला आईनं केलेली भाकरी खाताना मी भाकरीवरून हात फिरवला. भलेही ती भाकरी सकाळी केलेली होती पण चवीला फार छान होती. भाकरीवर आईच्या हाताची बोटं उमटलेली होती, बांगड्या रूतलेल्या होत्या. कुठंही करपू न देता, कच्ची न ठेवता काळजीपूर्वक भाकरी भाजलेली होती. खाता खाता मी विचार करत होते, नुस्तं मन लावून कामं करून काही होत नाही. त्यासाठी अगोदर ती गोष्ट नीटनीटकी शिकावी लागते. सराव करावा लागतो. आपण मन लावूनच भाकरी करत होतो पण झाली का धड ? शिक्षकांना सांगायला काय जातंय ! चांगल्या भाकरी झाल्या असत्या तर कशाला ही वेळ आली असती ?
माझ्या मोडलेल्या भाकरीचे तुकडे गोळा करून आईनं कुत्र्यापुढं टाकले तर त्यानं मान वर करून भाकरीकडं बघितलं आणि उठून दुसरीकडं जाऊन बसलं. बापरे ! आपण केलेल्या भाकरीला कुत्र्यानंसुद्धा तोंड लावलं नाही. याचं मला फारच वाईट वाटलं.
रानातनं दमून घरी आल्या आल्या आईला हा पसारा आवरायचं काम वाढलं होतं. पसारा आवरता आवरता आई म्हणाली, आधी हाताला चटके, तेव्हा मियते भाकर. मी चमकून आईकडं बघितलं. ती तिच्याच नादात होती. आधी हाताला चटके, हे तर बहिणाबाईंचं तत्त्वज्ञान ! अनुभवाच्या शाळेत आई हे रोज शिकते. प्रश्न फक्त चटक्यांचा आणि भाकरीचा नाही. हे सदासर्वकाळ जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. साध्या भाकरी करायला येईनात म्हणून मी इतकी वैतागले होते पण किती जणांच्या कष्टातून आपल्या ताटात भाकरी येते ते कष्ट भाकरी करण्यापेक्षा नक्कीच जास्त आहेत, याची जाणीव तेव्हा झाली.
नंतर हळूहळू मी चांगल्या भाकरी करायला शिकले. पुढे पुस्तकात कवी नारायण सुर्वे यांच्या एका कवितेतल्या ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ या ओळींनी थांबवलं. आयुष्याने ही ओळ पुन्हा पुन्हा ऐकवली. भाकरीचं महत्त्व कळत गेलं. रस्त्याच्या कडेला तीन दगडाच्या चुलीवर फुललेल्या भाकरीत चंद्र दिसला. एसटीची वाट बघून बघून कंटाळल्यावर म्हाता-यानं सोडलेल्या फडक्यातल्या भाकरीवर चंद्र दिसला. शिळंपाकं, भाकरतुकडा वाढ गं माय, म्हणणा-या लेकुरवाळीच्या आशावादी डोळ्यात चंद्र दिसला. वाळलेल्या भाकरी फोडणा-या भूकेत चंद्र दिसला. दुष्काळातल्या भाकरीच्या गोष्टींतून चंद्र उगवला. पुरून ठेवलेली भाकर बरोब्बर उकरून खाणा-या कुत्र्यात चंद्र दिसला. असा खरोखरचा चंद्र आणि भाकरी एकरूप झाली.
चंद्राची शितलता आजची तगमग शांत करते आणि उद्याची उन्हं झेलायची ताकद देते. अग्नीचे चटके सोसून भाजलेली भाकरी चंद्रासारखी दिसते. घरोघरी चुलीवर भाकरी व्हायच्या तेव्हा लोक हॉटेलमध्ये रोट्या खायला जायचे. आता चुलीवरची भाकरी खायला हॉटेलमध्ये जाऊ लागलेत. आता चुलीची जागा गॅसने घेतली. सरपण घरातून हद्दपार झालं. आजच्या एका मिनिटात शिळ्या होणाऱ्या या जगात आपली भाकरी शिकण्याची गोष्ट कुणाला सांगायची ? सांगितली तरी कुणाला खरी वाटेल ? मॅगी, पिझ्झा, बर्गरच्या या काळात भाकरीच करत बसलो तर आऊटडेटेड ठरु आपण. मी केलेल्या भाकरींनी टोपलं भरलं की टोपल़भर चंद्र गोळा होतात आणि मी कष्टाचं मोजमाप विसरून जाते.
रात्रीच्या शांततेत घरोघरी लक्ष्मी फिरते म्हणतात, म्हणून तांब्याभर पाणी आणि टोपल्यात भाकरीचा तुकडा ठेवतो आपण. भूमीला भाकरी म्हणतो आपण, भाकरीत चंद्र दिसतो आपल्याला. आयुष्याची भाकर कमवायला घरदार सोडावं लागतं पण भाकरी आपल्याला सोडत नाही. ती चिकटून राहते जगण्याला. या जगातल्या आपल्या शेवटच्या प्रवासात अस्थींबरोबर भाकरी बांधून देतात, हे कसं विसरायचं आपण ?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.