Pune News : उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आतापर्यंत केवळ खासगी संस्था किंवा उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था अशा ठिकाणीच आंतरवासिता (इंटर्नशिप) उपलब्ध होत होती. यापुढे आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय विभागांमध्येही आंतरवासिता उपक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पारंपरिक आणि व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक आराखडा निश्चित केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये आंतरवासितासाठी सत्रनिहाय आठ ते बारा श्रेयांक निश्चित केले असून, ही आंतरवासिता बंधनकारक केली आहे.
त्यानुसार खासगी व्यवस्थापन आणि संशोधन संस्थांशिवाय आता शासकीय विभागांमध्येही त्या त्या स्तरांवर आंतरवासिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये, तेथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सरकारी योजना, प्रकल्प यांमध्ये आंतरवासिता उपक्रमांतर्गत कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळू शकणार आहे.
प्रशासकीय कार्यालयांनी विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपक्रम उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार केला होता. त्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विधी व न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, मुख्य निवडणूक अधिकारी, कृषी विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून पथदर्शी स्वरूपात अभिप्राय मागविले होते.
आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रशासकीय कार्यालयांमधील आंतरवासितासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यात साधारणत: २४ लाख विद्यार्थी पदवीपूर्व तसेच जवळपास तीन लाख ३० हजार विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशासकीय विभागांमध्ये आंतरवासिता उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी घेता येणार आहे.
प्रशासकीय विभागांमधील आंतरवासितेमुळे होणारे फायदे...
शासकीय व्यवस्थेसंबंधीची सविस्तर माहिती आणि वास्तववादी दृष्टिकोनासह अनुभव मिळेल
शैक्षणिक अभ्यासक्रमाचा प्रत्यक्षात कसा वापर करावा, यासह कौशल्य वाढविण्यासाठी विद्यार्थी सक्षम होतील
शासकीय अधिकारी, मार्गदर्शक, तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन मिळेल
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सरकारी विभागांमध्ये आंतरवासिता देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शासकीय विभागासाठी नोडल अधिकारी असेल, या अधिकाऱ्यांमार्फत त्या त्या विभागातील आंतरवासिता उपक्रमाच्या संधी शोधल्या जातील. त्यानंतर हे नोडल अधिकारी संबंधित पोर्टलवर आंतरवासिताबाबत माहिती अपलोड करतील. सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे आंतरवासितासाठीचे स्वतंत्र पोर्टल असले, तरीही लवकरच राज्य सरकारमार्फत राज्यांतर्गत आंतरवासिताच्या संधी अपलोड करण्यासाठी पोर्टल कार्यान्वित केले जाणार आहे.- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.