Simala Chilli Punjab Agrowon
ॲग्रो विशेष

Simala Chili Punjab : पंजाबमध्ये ढोबळी मिरचीचा दर १ रुपये किलो; शेतकऱ्यांनी टाकला रस्त्यावर मिरच्यांचा सडा

सध्या उत्तर भारतातील पंजाबमध्ये ढोबळी मिरचीच्या दरावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. बुधवारी (ता.१९) ढोबळी मिरचीला प्रतिकिलो १ रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर मिरची फेकून संताप व्यक्त केला.

Dhananjay Sanap

Simala Chili Update : सध्या उत्तर भारतातील पंजाबमध्ये ढोबळी मिरचीच्या दरावरून (capsicum Rate) शेतकरी आक्रमक झाले आहेत. बुधवारी (ता.१९) ढोबळी मिरचीला प्रतिकिलो १ रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर मिरची फेकून संताप व्यक्त केला.

तर पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पंजाबच्या शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पंजाबमध्ये प्रामुख्याने गहू आणि भाताचे उत्पादन घेतले जाते. परंतु पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना गहू आणि तांदळाऐवजी भाजीपाला पिकांच्या लागवडीचं साकडं घातलं होतं.

"पंजाबमधील भूजल पातळी टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी भातासारखे पीक घेऊ नये. त्याऐवजी पीक विविधता निर्माण करावी," असं मान यांनी आवाहन केलं होतं. त्यानंतर फिरोजपुर, संग्रूर, मानसा भागातील काही शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीची लागवड केली. परंतु आता ऐन आवकेच्या हंगामात ढोबळी कवडीमोल दर मिळत आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये ढोबळी मिरची काढणी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केली जाते. तर पंजाबमध्ये मार्च-एप्रिलमध्ये काढणी केली जाते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे ढोबळी मिरचीची मागणी घटली होती. कोरोनामुळे लग्नसराई, हॉटेल व्यवसायावर ठप्पचे ढग जमले होते. त्यामुळे बाजारात ढोबळी मिरचीला मागणी कमी होती. परिणामी ढोबळी मिरचीची लागवड शेतकऱ्यांनी कमी केल होती.

दरवर्षी आवकेच्या हंगामात सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर मिळतो, असं पंजाबमधील शेतकरी सांगतात. परंतु यंदा मुख्यमंत्र्यांच्या भाजीपाला लागवडीच्या साकड्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये ढोबळी मिरची लागवडीला पसंती दिली.

आता मात्र ऐन आवकेच्या हंगामात ढोबळी मिरचीचे दर ढासळल्याने शेतकरी उत्पादन खर्चही वसूल होत नाही, असं शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून तीव्र संताप व्यक्त केला.

पंजाब कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा राज्यात ३ लाख हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकांची लागवड झाली आहे. त्यापैकी ९ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड शेतकऱ्यांनी केली. ढोबळी मिरचीची सर्वाधिक लागवड फिरोजपुर भागात आहे.

पंजाब सरकारने मागच्या महिन्यात फिरोजपूर जिल्ह्यातील महालमा गावात ढोबळी मिरचीचं क्लस्टर तयार केलं होतं.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांना आवाहन केले खरं पण आता तेच प्रकरण पंजाब सरकारच्या अंगलट आलं आहे.

भाजीपाला हा नाशवंत माल आहे. त्याच्या साठवणुकीसाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव आणि बाजारातील मूलभूत घटकांचा विचार न करता भगवंत मान यांनी दामटवलेल्या टांग्यानं पलटी मारली.

त्यामुळे शेतकऱ्यांना आता ढोबळी मिरची कवडीमोल दरात विकण्याची वेळ आल्याचं बाजार अभ्यासकांचं मत आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सरकार घोषणांवर घोषणा करताना दिसत आहे. भाजीपाला लागवडीचं आव्हान केल्यानंतर संयुक्त किसान मोर्च्यातील काही नेत्यांशी मान यांनी चर्चा केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT