Wet drought Agrowon
ॲग्रो विशेष

Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून शासनाकडे करण्यात आली आहे. या बाबत ठिकठिकाणी निवेदने दिली जात आहेत.

अस्तित्व संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

जिल्ह्यात पावसामुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

चार दिवसांपासून विविध भागात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बुलडाणा, मोताळा व मलकापूर तालुक्यांतील शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. कपाशी, मका, तूर, सोयाबीन व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा दिवाळीचा आनंद दुःखात परावर्तित होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तरी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

शेगावमध्येही मागणी

शेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतांमधील पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नेते राजेश शेळके यांनी तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनात म्हटले की, शेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाला आहे.

त्यामुळे शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन शेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करावा. तसेच २०२३ खरीप आणि रब्बी हंगामातील पीकविमा अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शासनाच्या नियमांनुसार विमा कंपनीने पीकविमा मंजूर करावा, अन्यथा कामकाजात दिरंगाई करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी. याशिवाय अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाचे पैसे आणि इतर आर्थिक लाभ मिळत नाहीत, हे खाते होल्ड काढून शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान मिळावे.

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन

मलकापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी व सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या बाबत मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली असून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

सततच्या पावसामुळे सोयाबीनला कोंब येऊन सोयाबीन खराब झाले. त्यामुळे कोणत्याही अटी शर्तीचे निकष न लावता तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत करावी व शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण होईल. संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रदेश संघटक योगेश पाटील, तालुका अध्यक्ष राहुल संबारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण संबारे, पवन संबारे, दीपक क्षीरसागर यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

SCROLL FOR NEXT