Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Village Story : गावपण भारी देवा...

Rural Culture : ग्रामीण भागात पूर्वी सारं गाव ओळखीचं असायचं पण आता सारेच अनोळखी झालेत. जो तो आपल्या कोषात आणि अहंकारात जगतोय. आज जे थोडेबहुत शेतकरी शेतात राबून अन्नधान्य निर्माण करीत आहेत त्यांचे आभार मानले पाहिजेत.

सुरेश कोडीतकर

Indian Agriculture : आपण दिवसेंदिवस शहर केंद्रित जीवनाकडे चाललोय. शेतीला बारा महिने आणि ३६५ दिवस असलेली कष्टाची गरज आणि तरीही अनिश्‍चितता शेती सोडून बाहेर पडायला भाग पाडत आहे. शेतीच्या पुढच्या पिढीने पाटी, पुस्तके हाती धरली खरी. पण मग धड कारकून नाही आणि शेतकरीही नाही, अशी बिकट अवस्था झाली. मग आले बिझनेसचे खूळ. आधी पंचक्रोशीत एखादा जेसीबी होता. आता प्रत्येक गावात, गल्लीत जेसीबी आणि पोकलेन धूळ खात पडले आहेत. शेतीचे, सिंचनाचे खासगी आणि शासकीय काम मर्यादित आणि इच्छुक अनेक. यामुळे मागणी कमी आणि सेवा जास्त उपलब्ध झाली. भाड्याने जेसीबी देण्याचे दर पडले पण इंधनाच्या किमती वाढल्या. आता धंदा बंद पडायची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते थकलेत. पूर्वी पेट्रोल पंप दूरवर होता. आता तो आवाक्यात आहे. आता स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर आणि मिनरल वॉटरचा १५ लिटरचा जार खेडोपाडी घरपोच मिळतोय. खेडोपाडी आता शहरांचे अनुकरण आहे. हॉटेल, ढाबा, गुऱ्हाळ, मिसळ आणि तंदुरी, थाळी आणि बार यांची खेडोपाडी ददात नाही. पानगुटखा, विडी, दारू, मावा, तंबाखू आता मानपानाचे साधन आहे. तर ब्युटी पार्लरही खेड्यात पोहोचले आहे.

पिंपळाचा वा वडाचा पार आता नाहीसा झाला आहे. कारण पिकली पानं आता घरातच आडोशाला पडून असतात. आता चंची नाही की सरोटा नाही. जुनीजाणती आजोबांची पिढी अस्तंगत होऊन दोन, तीन दशके झाली. आता गावात काही नाही असे नाही. कापड, मोबाइल, हार्डवेअर, सिमेंट, भांडी, दारू, मटण, साजशृंगार सारे आहे. पण फक्त गावपण नाही. ऑनलाइन शॉपिंग कंपनी जर यापुढे खेडोपाडी घरापर्यंत सेवा देऊ लागली तर यापुढे नांगर, कासरा, चरवी, पाटी, भाकरी आणि टाळ धरणारा माणूस दिसणे मुश्कील होणार आहे. कारण शेतीत राबणारे हात कमी होत आहेत. शेती कोणाला हवी ही यादी घटत आणि शेती विकून श्रीमंत व्हायचे आहे, ही गैरसमज यादी मोठी होत चालली आहे. येत्या दहा-पंधरा वर्षांनंतर भाकर आणि माती शिल्लक राहील का, असा प्रश्‍न पडू लागला आहे.

शेती हा व्यवसाय कधी बंद होत नाही, असे म्हणतात. नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातून सावरण्याची ताकद शेती आणि शेतकऱ्यांत आहे. शेती हा उत्तम, शाश्‍वत व्यवसाय आहे. तो वाडवडिलांचा आशीर्वाद आहे. त्याला जगातील कोणीही नामशेष करू शकत नाही. शेतीला स्पर्धा नाही. गरज आहे वाडवडिलांचा आशीर्वाद ओळखण्याची! गरज आहे शेतीकडे व्यवसाय म्हणून बघण्याची आणि नवी वाट चोखाळण्याची! जगाच्या पाठीवरील सर्वांत जास्त व्याप्ती असलेला उद्योग म्हणजे शेती आहे. शेतकरी हा उत्तम व्यावसायिक आहे. शेती व्यवसाय हा पिढ्यान् पिढ्या टिकणारा आहे. आज तुम्ही करताय उद्या तुमची मुलं करतील. तो बंद न होणारा व्यवसाय आहे. आज शेतकरी जमीन विकायला तयार आहे, पण नोकरीवाला शेती विकत घेऊ शकत नाही. काळा पैसा असलेल्या धन दांडग्यांनी जमिनी फार पूर्वीच विकत घेऊन ठेवल्या आहेत. आता त्या विकास झोनमध्ये येणार आहेत. यापुढे ‘लँड डेव्हलपर’ आणि ‘कमिशन एजंट’ यांचा व्यापार शेतकरी समाजावर आक्रमण करणार आहे. तो दिन आता येऊ घातला आहे.

शेती वरिष्ठ, नोकरी कनिष्ठ असे पूर्वी मानले जायचे. आज शेती नावालाच वरिष्ठ आहे. पण शेतीतील कष्ट नको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली आहे. शेती हा व्यवसाय कष्टाचा आहे पण आता यांत्रिकीकरणामुळे कामे थोडी सोपी झाली आहेत. काल आणि आज शेती केली गेली, पण उद्या कोण करणार? शेतीतून बाहेर पडायला आज अनेक जण उत्सुक आहेत. सडकेच्या कडेला विकाऊ जमिनीचे फलक लागलेत. शेती विका आणि नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, जालना, अमरावती, नागपूर, गोवा, गुजरात, इंदूर, कर्नाटकात निघून जा, असे मनसुबे सध्या महाराष्ट्रदेशी आहेत. सुरक्षारक्षक म्हणून नोकरीवाला म्हणवून घ्यायला एकरदार शेतकरी तयार आहेत. गावी दोन एकर शेती असलेला शहरात दहा वीस हजार रुपयांत दिवसाला बारा तास राबायला तयार आहे. पण स्वतःच्या शेतीत तो शेणामातीत राबायला तयार नाही. भविष्यात नोकरी भले कमी होईल कदाचित आणि ते सहनही केले जाईल. पण शेती विकून धान्य उगवणे संपले तर मग उपासमार कोणीच सहन करू शकणार नाही.

शेतकरी जगला तर देश जगेल. म्हणून शेती आणि शेतकऱ्याला असलेले महत्त्व आपण ओळखायला हवे. शेती विकून अनेकांनी बांधकाम साहित्य, नर्सरी, मंगल कार्यालये, गोदामे उघडली आहेत. आणि आज त्यांची शेतकरी ओळख कायमची पुसली गेली आहे. शेतीत परके ठरणे हे न राबता मोठे होऊ पाहणाऱ्या पिढीला ना गावचे ना शेतीचे ठेवणार आहे. त्या वेळी त्यांच्याकडे पश्‍चात्ताप शिल्लक राहणार आहे. शेतीत फक्त आपलाच मान असतो. कोणतेही दडपण, दबाव, चिंता नाही. आपले काम, आपला घाम आणि आपले दाम. शेतीत आपणच आपले मालक असतो. शेती कायम आहे. शेती जिवंत आधार आहे. शेतात काम केले तरी शरीर काटक होते, मन प्रफुल्लित राहते. रानातील प्रदूषण मुक्त हवा, निसर्ग, निरोगी जगण्याची अनुभूती देतो. शेतात अनवाणी भटका आणि धन्य व्हा. सर्व झाडे, झुडपे, पीक आणि शिवार हे आपल्याला शुभेच्छा देत आहेत असे वाटते. भाजीपाला, दूध आपल्याच शेतात उपलब्ध आहे. घरभाडे नाही. पाणीपट्टी नाही. शेतघर म्हणजे अंगण, ओसरी, पडवी, माजघर, चुलांगण, परसदार. आता सर्वत्र शेतात बंगले उभे झाले असले आणि सडासारवण, रांगोळी, बंब, कापण्या, गराचे लाडू नाहीसे होऊन रेडिमेडचे ऑनलाइनचे खूळ माजले आहे.

आज दोन वेळेचे जेवण मिळते त्यासाठी ‘शेतकरी सुखी भवः’ असे शहरातील लोक म्हणत असतील का? शहरामध्ये कोण शेजारी राहते हे माहीत नसते. परंतु गावातही आता परिस्थिती वेगळी नाही. माणसे परागंदा, भूमिगत होत आहेत आणि दूरदूर जात आहेत. कारण शेती सुटत आहे, पण शेतकऱ्याची सुटका होत नाही... ना जगण्यातून ना आर्थिक विवंचनेतून! शेतकरी राजा आहे असे म्हणतात, तो विनोद असावा. कारण त्याच्या राजेपणाला किंमत नाही. आदर आणि मानसन्मान नाही. त्याच्या दुःखावर इलाज नाही. शेती कोणी आवडीने करत नाही. शेती सवडीने करता येत नाही. शेती ही निवड नाही. शेती ही नाइलाज आहे. फार कमी शेतीपुत्रांना शेती कसायचे सार गवसले आहे. ज्यांना गवसले त्यांचा मळा विठ्ठल झाला. तो वारकरी आगळा झाला. बाकीच्यांना शेतीला विकास झोनमधून निवासी झोनमध्ये आणायचे डोहाळे लागलेत.

(लेखक ग्रामविकासाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT