Horticulture
Horticulture Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Farming : जिद्दीच्या जोरावर माळरानाचा कायापालट

Team Agrowon

रघुनाथ शिंदे

ही गोष्ट २००५ मधली. सकाळी अंघोळ, चहा पाणी करून शेतीची कामे मार्गी लावली आणि दहाच्या दरम्यान सकाळ पेपर आणण्यासाठी पाबळमध्ये गेलो. स्टॉलधारकाने दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी कृषी दैनिक सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मी पाबळमधील हनुमान मंदिरात पोहोचलो. तेथे सुमारे १०० ते १५० शेतकरी दाखल झाले होते.

या बैठकीसाठी ‘दैनिक सकाळ’चे संपादक आणि पत्रकार हजर होते. त्यांनी सांगितले, की शेतीच्या विकासासाठी एक दैनिक सुरू करीत आहोत. त्या वेळी संपादकांनी दैनिकाचे नाव सांगितले नव्हते. मात्र एक महिन्याभरात हे दैनिक वाचायला मिळेल, असे सांगितले.

मी त्यांना माझी शंका विचारली, की ‘आपण शेतीविषयक बातम्यांना प्राधान्य देणार, की इतरांसारखे राजकारणी लोकांच्या बातम्याच छापणार?’ त्या वेळी त्यांनी सांगितले, की कृषी दैनिकात ९० टक्के शेतीविषयक उपयोगी बातम्या, तांत्रिक सल्ले आणि शेतकरी यशोगाथा असणार आहेत. यातून माझे समाधान झाले आणि गेल्या १८ वर्षांपासून मी ‘ॲग्रोवन’ सोबत आहे.

शिरूर तालुक्याच्या (जि. पुणे) पश्‍चिम भागातील कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेले खैरेनगर हे माझे छोटेसे गाव. गावशिवारात पडणारा पाऊस अत्यल्प असल्याने गावातील काही शेतकरी कुटुंबासह शहरी भागात रोजगारासाठी गेले.

परंतु मी मात्र शेतीमध्ये जिद्दीने टिकून राहिलो. तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि लोकांशी झालेल्या उपयुक्त चर्चेतून मी गावात शेतकरी गट स्थापन करण्यापासून ते शेतीमालाची थेट विक्री करण्यापर्यंत मजल मारली.

आमच्या चार भावांच्या एकत्रित कुटुंबात मी सर्वांत मोठा. माझ्या पाठोपाठ ज्ञानोबा, तुकाराम आणि सुभाष असे तीन भाऊ. आमच्या एकत्रित कुटुंबाची पन्नास एकर शेती आहे. आम्ही सर्व जण शेतीत काम करत असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी प्रसिद्ध होणारे पीक विशेषांक, पाणी विशेषांक, दिवाळी अंकातून प्रेरणा घेऊन शेतीमध्ये बदल केले. कमी पाण्यात पीक उत्पादनाचे गणित आम्ही जमवले आहे.

जल, मृद्‍संधारणावर भर...

माझे शिक्षण चौथीपर्यंत झाले, पुढील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. परंतु परिस्थिती अभावी शिक्षण थांबले. शिरूर तालुक्यात लहरी पावसाच्या उपलब्ध पाण्यावरच शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ज्वारी, बाजरीसारखी पिके घेत होतो. परंतु या उत्पन्नात कुटुंब चालविणे अवघड जात होते. शेतीमध्ये बदल केला तरच आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी खूणगाठ मनाशी बांधली.

सन १९७४ मध्ये कर्ज घेऊन करून दोन विहिरी घेतल्या. यास बऱ्यापैकी पाणी लागले. जमिनीचे सपाटीकरण करून बांधबंदिस्ती केली. त्यामुळे धूप थांबून जमिनीचा पोत सुधारला. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरत असल्याने विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली.

टोमॅटोची लागवड करून बऱ्यापैकी आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यानंतर कांदा, भुईमूग, बटाटा यांसारखी नगदी पिके घेणे शक्य होऊ लागले. शेतीत येणाऱ्या नवनवीन बदलाचा अवलंब करीत राहिलो.

कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आंबा, सीताफळ, आवळा लागवड केली. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक, तुषार सिंचनाचा वापर सुरू केला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भेटी देऊन येथील तंत्रज्ञान समजून घेतले. त्याचा शेतीमध्ये अवलंब केला. तसेच ही माहिती परिसरातील शेतकऱ्यांना देखील सांगण्यास सुरुवात केली.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करून सन १९८० मध्ये स्वखर्चाने शेतामध्ये तलाव तयार केला. शेती करत असतानाच दुग्ध व्यवसाय सुरू केला. सेंद्रिय खताच्या उपलब्धता झाल्याने जमिनीचा पोत सुधारला, पिकांना जिवामृत वापरण्यास सुरुवात केली. रासायनिक खतांचा वापर मर्यादित होऊ लागला.

१९८२ मध्ये मी बायोगॅस बांधला. यातून स्वयंपाकासाठी इंधन उपलब्ध झाले. गेल्या चाळीस वर्षांमध्ये बायोगॅसच्या माध्यमातून सुमारे तीन लाख रुपयांची बचत केली आहे. या चाळीस वर्षांत एकदाच मला बायोगॅस दुरुस्तीचा २५ हजार रुपये खर्च आला होता.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bitter Gourd : कारले लागवडीत खत, कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Agriculture Spentwash : स्पेंटवॉश : प्रदूषणातून मुक्ती, सुपीकतेची युक्ती

Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

Nilesh Lanke : दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खा. लंकेंचा मोर्चा; कार्यकर्ते व पोलिस भिडले!

Warehouse Management : माहिती तंत्रज्ञानातून गोदामाचे नियोजन

SCROLL FOR NEXT