Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीन गुत्तेदारांना पैसा जास्त मिळतो का? 

सोयाबीन काढणीचा हंगाम तीन ते चार आठवडे असतो. मजुरांना कमी कालावधीत जास्तीचं काम करून अधिक पैसे मिळवण्याची संधी असते.

महारुद्र मंगनाळे

सोयाबीन काढणीचा हंगाम तीन ते चार आठवडे असतो. मजुरांना कमी कालावधीत जास्तीचं काम करून अधिक पैसे मिळवण्याची संधी असते. गुत्ते घेतलं तरच हे शक्य होतं. त्यामुळं प्रत्येक टोळी जास्तीत जास्त गुत्ते घेण्याचा प्रयत्न करते. यामुळं काही शेतकऱ्यांची काढणी वेळेवर होत नाही. बऱ्याचदा दोन दिवस इथं, तीन दिवस इथं असंही करतात. कोणतं सोयाबीन आधी काढणं गरजेचं आहे, ते पाहून, कोणाचं गुत्तं आधी घेतलयं त्याप्रमाणे क्रम लागतो.

शक्यतो कुठलाही शेतकरी नाराज होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. कारण पुढच्या वर्षी त्यांना ही गुत्ते मिळवायची असतात. हंगाम कमी कालावधीचा असल्याने किमान दुप्पट वेळ आणि तेवढाच वेग ठेवल्याशिवाय वेळेत ही काम पूर्ण होत नाहीत. मी गुत्तेकरी बाया आणि गड्यांशी वेळोवेळी बोललोय. काय करणार भाऊ, चार पैसे शिल्लक राहायचं एवढंच तर काम हाय.

तब्येतीचा विचार करून कसं भागल. त्रास तर होणारचं. त्याशिवाय पैसे मिळतेत हुई! त्यांचं हे म्हणणं ठरलेलं असतं. पण मला हे पटत नाही. कारण हे पैसे काही त्यांच्या अंगी लागत नाहीत. या अतिताणाच्या कामाचा तब्येतीवर वाईट परिणाम होतो. 

सोयाबीनच्या एका गुत्त्यात बाईला रोजचे एक हजार अन् गड्याला बाराशे रूपये पडले. एका गुत्त्यात तर बाईला बाराशे अन् गड्याला दररोजचे पंधराशे रूपये पडले अशा चर्चा मी दरवर्षी ऐकतो. यात खोटेपणाही नाही. मात्र याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. यावर्षीचा बाईचा  रोजचा रोजगार ५०० रूपये तर गड्याचा ६०० रूपये आहे.

दुपारच्या जेवणाचा एक तास व तासा तासाला पाणी पिणे, लघवीला जाणे हा सगळा वेळ हिशोबात घेतला तर, रोजंदारीचे मजूर दिवसभरात सहा तास काम करतात. मात्र गुत्त्यात काम करणारे मजूर ११ ते १२ तास काम करतात. शिवाय रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा गुत्त्यात काम करणाऱ्या मजुरांचा कामाचा वेग अधिक असतो. हा काही चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा नाही. मी मजुरांशी या विषयावर बोललोय आणि त्यांनाही हे मान्य आहे. मुळात गुत्ते घेण्याचा हेतुच हा असतो की, कमी वेळात जास्तीत जास्त काम संपवायचं. त्यामुळं वेग अधिक ठेवावा लागतोच. 

बहुतांश बायका डॉक्टरची भरती करतात. इंजेक्शन,गोळ्या, औषधं चालू होतात. यातही स्त्री मजुरांना खूप ताण पडतो. त्यांना स्वयंपाक, लेकरांचं, घरची कपडे धुणी असं सगळं करून पुन्हा पुरूषांच्या बरोबरीने काम करावं लागतं. गुत्त्यातली महिला दररोज पहाटे तीन वाजता उठते तर दुसरी एक बाई चार वाजता उठते.

बहुतांश गुत्तेकरी सकाळी सहा वाजता रानावर असतात. यात काम करणाऱ्या स्त्रियांना किमान पहाटे चारला उठावंच लागतं. चारपासून सुरू झालेलं काम सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान संपतं.घरी येऊन रात्रीचा स्वयंपाक, जेवण असं सगळं आटोपून झोपायला नऊ ते दहा वाजतात. पुन्हा पहाटे तीन किंवा चारला उठून कामाला लागायचं. म्हणजे एवढे सलग शारीरिक कष्ट करूनही, त्यांना जेमतेम सहा तासाचीच झोप मिळते. याचा तब्येतीवर वाईट परिणाम होणं अटळ आहे. म्हणूनच हे पैसे पचनी पडत नाहीत, असं मी म्हणालो.यात आहाराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. मुळातच मजूर वर्गामध्ये सकस वा चौफेर आहार ही संकल्पना रूजलेली नाही. बजेटपेक्षा अज्ञान याला कारणीभूत आहे.

चपाती, भाकरी,एखादी भाजी असाच आहार असतो. स्वयंपाक लवकरात लवकर बनवून मोकळं व्हायचं असतं. एका बाजूला अतिरिक्त काम, निकस आहार, अपुरी विश्रांती या सगळ्याचा परिणाम तब्येतीवर होणे अटळ आहे. त्यात नेमक्या या कामाच्या काळात सण येतात. त्याचा ताण पुन्हा वेगळा दसरा म्हणून सगळे कपडे, पसारा काढणार. पुन्हा देवीचे उपवास करणार.आज आमच्याकडं आलेल्या मजुरांपैकी दोन महिलांना उपवास होता. घाईत सकाळी फराळ न करताच त्या आल्या होत्या. जेवढं दारिद्र्य अधिक तेवढी धार्मिकता, रूढी, परंपरा पाळणं अधिक, हे उघड दिसणारं चित्र आहे. स्वत:च्या चांगल्या आहारावर पैसे खर्च न करणारे हे लोक या सण व परंपरावर मात्र वायफळ खर्च करतात. हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. या निस्तेज स्त्रिया बघितल्या की, त्या कुपोषणाच्या बळी आहेत, हे सहज लक्षात येतं.तुलनेने मुस्लिम स्त्रिया तब्येतीने चांगल्या दिसतात. याचं कारण आहारात आहे.

आज आमच्याकडं सोयाबीन कापायला आलेल्या ग्रुपमधील चॉंदसाब हे सर्वात ज्येष्ठ सदस्य. त्यांच्याशी मी आहाराबाबत बोललो. ते बोलले, आम्ही मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असं आठवड्यातून तीन दिवस मांसाहार करतो. कितीही सर्वसाधारण मुस्लिम असला तरी आठवड्यातून दोनदा तो मांसाहार करतो. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर जाणवतो. शिवाय वर्षातून एक महिना रोजाचा उपवास सोडला तर, ते दुसरा कोणताच उपवास करीत नाहीत. शिवाय उपवासाच्या महिन्यात त्यांचं खाण्याकडं विशेष लक्ष असतं.त्यातही गुत्त्यातून उरलेले पैसे हे योग्य कामासाठी खर्च होतातच असं नाही.

गुत्त्यांमध्येही ८० टक्के महिला आणि २० टक्के पुरूष असतात. पुरूष गाठोडे वाहण्याचे काम करतात. स्त्रियांचा यातही सहभाग असतोच. मजूर पुरूषांमधील दारू पिण्याचं प्रमाण, पुरूषी अरेरावी असे बरेच विषय आहेत. मजुरांचं आपल्या मुलांच्या शिक्षणाकडं फारसं लक्ष नसतं. गुत्त्याच्या काळात तर ते अजिबात लक्ष देत नाहीत.  हे नुकसान पैशात मोजता येणारं नाही. त्यामुळे गुत्तेकरी पैसे कमावतात, त्यापेक्षा जास्त गमावतात, असं मला वाटतं. दूर्देवाने गुत्तेकऱ्यांना फक्त पैसे दिसतात. या मजूर महिलांची, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, नोकरदार महिलांशी कुठल्याच अर्थाने तुलना करता येणार नाही. अतिकष्टामुळे ज्यांच्या चेहऱ्याचे रंग कायमचे उडून गेलेत त्यांना नवरात्रीतील नऊ रंगाच्या साड्यांची गंमत कशी कळणार. या बायांचं जगच वेगळं आहे! त्यांच्या उन्नतीचे मार्ग केव्हाच कायमस्वरूपी बंद झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT