Pune News : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन्ही घटना घडल्याप्रसंगी या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद होता. मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी मांडवगण फराटा परिसरातील सर्व घरांना अखंडित सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी लेखी मागणी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी महावितरणचे केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
वनविभागाने महावितरणला दिलेल्या पत्रात म्हटले की, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी जुन्नर वनविभागातील सुमारे २३३ गावे ही मानव-बिबट संघर्षाचे अनुषंगाने ‘आपत्ती क्षेत्रे’ म्हणून घोषित केली आहेत. त्या अनुषंगाने महावितरण विभागास देखील आवश्यक निर्देश दिलेले आहेत.
जुन्नर वनविभागामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राणी बिबट वावर असणाऱ्या अतिसंवेदनशील भागातील ग्रामस्थ शेतकरी-मजूर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१८ ऑक्टोबरला मांडवगण फराटा येथील सात वर्षीय वंश राजकुमार सिंग या चिमुकल्याचा बिबट या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी (ता. १५) मांडवगण फराटा येथील चार वर्षीय शिवतेज समाधान टेभेंकर हा चिमुकला घराच्या अंगणात खेळत असताना संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वन्यप्राणी बिबट हा सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर भक्ष्याच्या शोधात सक्रिय होत असतो. गावे व शेतपरिसरामध्ये अखंडित विद्युत पुरवठा असल्यास मानवावरील बिबट हल्ले टाळता येण्यास मदत होईल. दोन्ही घटना घडताना याठिकाणी विद्युत पुरवठा बंद होता. शक्यतो रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना, रात्री शेतात काम करताना अथवा सायंकाळी लहान मुले अंगणात खेळत असताना बिबट्याकडून त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत.
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी या बिबट प्रवण अतिसंवेदनशील गावात श्री फेज विद्युत पुरवठा नसेल अशावेळी सिंगल फेज विद्युत पुरवठा अखंडित उपलब्ध करण्यात यावा.
वस्ती-वाड्यांमध्ये रात्री सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू ठेवल्यास वन्यप्राणी मानवी वस्तीवर येण्यास प्रतिबंध होऊन मानव-बिबट संघर्ष टाळण्यास मदत होईल. मांडवगण फराटा तसेच शिरूर तालुक्यातील अन्य ठिकाणी देखील अखंडित विद्युत पुरवठा होण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे या पत्रात म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.