Jalgaon News : खानदेशात मे अखेरीस कापूस लागवड सुरू होईल. शेतकरी देशी, सरळ कापूस वाणांसह एचटीबीटी कापूस वाणांची शोधाशोध करीत असून, त्यासाठी मध्य प्रदेश, गुजरातमध्ये अनेक जण संपर्क करीत आहेत.
मध्यंतरी कृषी विभागाने अवैध कापूस बियाण्यांबाबत चोपडा (जि. जळगाव) तालुक्यात मोठी कारवाई केली. परंतु नंदुरबार, धुळ्यासह जळगावातील यावल, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, जामनेर, अमळनेर, पारोळा भागांत अवैध कापूस बियाणे पाठविले जात असल्याची माहिती आहे.
खानदेशात देशी, सरळ कापूस वाणांचा तुटवडा असतो. यामुळे शेतकरी मध्य प्रदेशातून हे वाण आणून त्याच्या लागवडीसंबंधी तयारी करीत आहेत. मागील हंगामात देशी वाणांचा मोठा काळाबाजार जळगाव, धुळे भागांत झाला होता. यंदाही तशीच स्थिती तयार होत आहे. खानदेशात मे अखेरीस कापूस लागवड होईल, असे दिसत आहे.
पूर्वहंगामी कापसाची लागवड खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर होईल. त्यात यंदा घट होणार आहे. तर कोरडवाहू क्षेत्रातील लागवडीतही मोठी घट होईल. कापूस लागवडीसंबंधी चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार भागांत शेतकरी शेतात पूर्वमशागत करीत आहेत. लवकरच ठिबकची व्यवस्था केली जाईल. मे अखेरीस त्यात कापूस लागवडीस सुरुवात होईल.
जळगाव जिल्ह्यात यंदा चार लाख ८० हजार ते चार लाख ९० हजार हेक्टरवर एकूण कापूस लागवड अपेक्षित आहे. कापसाखील क्षेत्रात जळगावात यंदा २५ ते ३० हजार हेक्टरने घट अपेक्षित आहे. धुळ्यात सुमारे पावणेदोन लाख आणि नंदुरबारमध्ये सुमारे ९० हजार ते ९२ हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल. खानदेशात एकूण ५० हजार ते ६० हजार हेक्टरने कापूस लागवड घटेल, असाही अंदाज आहे.
सातपुडालगत अवैध बियाणे
खानदेशातील सातपुडा पर्वताचा भाग गुजरात व मध्य प्रदेशलगत आहे. या पर्वतालगतच्या खानदेशातील शहरे, मोठ्या गावांत अवैध कापूस बियाणे येत आहेत. अनेक शेतकरी ओळखीतून हे बियाणे घेत आहेत. काही शेतकरी अनेक वर्षे मध्य प्रदेश, गुजरातमधून बियाणे आणून त्याची लागवड करीत आहेत. नंदुरबारमधील तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), जळगावातील चोपडा, यावल, रावेर व जामनेरात अवैध कापूस बियाणे खरेदी-विक्रीसंबंधीचे छुपे व्यवहार होत असल्याची माहिती मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.