Paddy Cultivation
Paddy Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Rainy Season : पावसाच्या नादानं झाली ना दमछाक !

कल्पना दुधाळ

रस्त्याच्या कडेला एक म्हातारबाबा ढेकळामागणं ढेकळं उचलून जोरात आभाळाकडं भिरकावत म्हणत होते, का, का असा जीव घेतोस माणसांचा ? असलाच तुझ्यात दम तर पड की बदाबदा.

साधं थुकलं तरी तळं होणाऱ्या या डांबरावर चार थेंबटं शितडून काय दाखवतोस साल्या. ह्या मोकळ्या वावरातल्या ताली हवार करून दाखव.

मागच्या कित्ती सालांत पोटभर पाणी नाय मिळालं या मातीला. म्हातारबाबा रागानं ढेकळं उचलून मारत अजून पावसाला शीव्या देत होते. काय झालं म्हणून विचारलं तर म्हणाले, काय सांगायचं, काय बोलायचं ? घर असून घरात माणूस नाय.

गोठ्यात जित्राब  नाय. विहिरित पाण्याचा थेंब नाय, शेत असून करायचं काय ? माती खायची का ढेकळं खायची ? ही झाडं जाग्यावर वाळून गेली. दिसतंय का हिरवं पान कुठं ? धरतीच्या पोटातलं पाणी आटलं. वरनं आग, खालनं रखरख. कसा जगवायचा भवताल ?  ह्या जमिनीच्या तुकड्याकडं तरी आशेनं बघतोय आम्ही.

ज्यांना काहीच नाही त्यांनी काय करायचं ? कर्तीधर्ती माणसं पोट भरायला जिकडंतिकडं पांगली. आम्ही कसं काढायचं दिवस ? कुठं जायचं ? कसं जगायचं ? काही खरं नाही रे देवा. जिवाची होरपळ नुसती.  म्हातारबाबा स्वतःशी बडबडत निघून गेले.

असे दुष्काळानं होरपळलेले म्हातारबाबा एकटे नाहीत, पावसाची वाट बघणारेही ते एकटे नाहीत. तळपत्या उन्हानं भाजून निघाल्यावर आता आपण सगळेच पावसाची वाट बघतोय.

कमी पडू, जास्त पडू माणूस पावसाशी बोलत बोलत लहानाचा मोठा होतो, म्हातारा होतो, मरून जातो. माणूस काही आजच पावसाची वाट बघत नाही. माणसाचं आणि पावसाचं आदिम नातं आहे. 

अनंत काळापासून हजारो, लाखो पावसाळे आले आणि गेले. उतू आलेले ढग कोसळले, सृष्टी न्हाऊन निघाली. आठवणींच्या धारा मनामनात रुतून बसल्या. पावसाचा दुष्काळ पडतो आठवणींचा  नाही.

निळ्या आभाळात पांढरे-काळे-खरडे ढग दिसायला लागले की माणसं पावसाशी बोलायला लागतात. 

उत्क्रांतीच्या काळापासून पावसानं माणसाला वेगवेगळी रुपं दाखवली असतील आणि माणूस हरखून गेला असेल किंवा गरजायला लागलं की घाबरून पळत सुटला असेल किंवा वीजा चमकल्या की दचकला असेल किंवा सुरुवातीचे विरळ थेंब पडायला लागले की गोंधळला असेल किंवा दाट सरी आल्यावर भांबावून झाडाखाली थांबला असेल

किंवा गारा पडायला लागल्या की पळत एखाद्या गुहेच्या कपारीला चिकटून पावसाची अनोखी जादू डोळ्यात भरून घेत असेल किंवा पाऊस थांबल्यावर हे काय झालं होतं ते शोधत असेल किंवा असं काहीही न करता माणूस मनसोक्त पावसात भिजला असेल किंवा

पावसात भिजून बरं वाटलं म्हणून अंगावर पाणी घेऊन आंघोळ करायला लागला असेल किंवा गोड पाण्याच्या झ-यात तोंड बुडवून जनावरासारखं पाणी पित असेल किंवा खळखळत्या पाण्यातल्या मोठ्या खडकावर उभं राहून पाण्याखालचं विश्व न्याहाळत असेल किंवा

माणसांनी मिळून नदीच्या काठी वस्ती केली असेल किंवा ओंजळीत पाणी घेऊन तोंडाला लावलं असेल किंवा पहिल्यांदा मातीचं मडकं बनवून त्यात पाणी भरल्यावर माणूस आनंदानं नाचला असेल किंवा मडक्यात तहान भरून सोबत नेताना तो स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा कितीतरी प्रगत समजत असेल किंवा

पावसानंतर बहरलेल्या जंगलातली फळंफूलं, कंदमुळं चाखून पुन्हा पावसाची वाट बघत असेल किंवा अजून काही असेल ते त्याच्या आठवणींबरोबर आपोआप मरून गेलं असेल किंवा अतीवृष्टीनं माणसाला मारून टाकलं असेल किंवा

कडाडत्या विजेनं माणसाचा जीव घेतला असेल किंवा माणूस पुराबरोबर वाहून गेला असेल किंवा पावसानं अशी पाठ फिरवली असेल की पाणी पाणी करून माणसं मेली असतील किंवा

वर डोंगरात प्रचंड पाऊस कोसळला असेल आणि अचानक खाली नदीला लाल गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे भयंकर रोरावत आले असतील आणि नदीच्या कडेचे सगळे वाहून नेले असेल किंवा कुणीतरी जाणत्या माणसांनी पावसाचे अचूक अंदाज सांगितले असतील किंवा एखाद्या देवाची भाकणूक म्हणजे पाऊसवाणी वर्तवली असेल

किंवा हवामान खात्याचा अंदाज डावलून पावसाने जलप्रलय केला असेल किंवा  समाधानकारक पावसाच्या अंदाजावर पाऊसच समाधानी नसेल किंवा कधीतरी हवामान खात्याशी पावसानं संगनमत केलं असेल किंवा एकामागून एक प्रचंड काळे ढग नुसतेच येऊन गेले असतील किंवा नक्षत्रांच्या नोंदीत काहीसुद्धा तथ्य नसेल किंवा पाणकळा म्हणजे काय तेच कुणाला कळालं नसेल किंवा ये रे ये महाराजा म्हणत पावसाची वाट बघणारी म्हातारी आभाळाकडं बघत बघत मरून गेली असेल किंवा

एखादा पावसाळा थांबेचना म्हणून अंगणात विस्तव टाकून घरोघरी पावसाला चटके दिले गेले असतील किंवा पावसाआधी नदी, नाले, विहिरींचा गाळ काढून ठेवला असेल आणि हटकून पाऊस  फिरकलाच नसेल किंवा मुसळधार पावसानं केलेली पीकपाण्याची नासाडी बघून डोळ्यातनं धारा लागल्या असतील किंवा चार थेंब शितडून हूल दाखवून पाऊस गायब झाला असेल किंवा

ताली फोडून रानातली माती पावसानं समुद्राला पोचवली असेल किंवा कधीतरी घराची भिंत पाडून पाऊस उधळलेला असतो किंवा जबरदस्त पावसानं एखाद्या डोंगराच्या कुशीतलं गावंच गुडूप केलेलं असतं आणि मग भूईला पडलेल्या बोटभर भेगेचीसुद्धा धास्ती वाटते माणसांना किंवा पावसानं पूल वाहून नेलेला असतो किंवा पावसाविषयी असं कितीतरी काय काय असेल जे मला माहीत नसेल किंवा मला आता आठवत नसेल.

पण  पावसाच्या नादानं झाली ना दमछाक ! माणसाचं आणि पावसाचं नातं नेहमीच असं दमछाक करणारं, हेलकावे खाणारं  राहिलं आहे.  

ही दमछाक अशीच पुढे नेता नेता असंख्य प्रश्नांचा पाऊस पडतो. जीवाला चटके देणारं विस्तवासारखं उन भाजून काढतं. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत जाणार, उन्हाची होरपळ वाढणार, पाऊसमान कमी होणार असं काही समजलं की आपण अस्वस्थ होतो.

मग पुन्हा पुढचे प्रश्न सुरु होतात. जसं की भविष्यात लेकरांनी मुसळधार पाऊस कसा असतो ते विचारून विचारून हैराण केल्यावर काय दाखवणार आहोत आपण किंवा वाळलेल्या झाडावरचं शेवटचं हिरवं पान गळून गेल्यावर झाडाला कसा धीर द्यायचा किंवा कधीकाळी इथं हिरवंगार जंगल होतं,  झुळझुळत्या गोड पाण्याचे झरे होते, इथं स्वच्छ सुंदर पाण्याची नदी होती,

इथं धरण होतं असं मनातल्या मनात म्हणायलाही आपली आपल्याला लाज वाटली तर किंवा इथं लोक पावसाच्या पाण्यावर शेती करायचे आणि घरात धान्याच्या पोत्यांची थप्पी असायची हे कुणालाच खरं वाटणार नाही किंवा गावाच्या मध्यभागी नितळ पाण्याचं तळं असायचं ही एक प्राचीन गोष्ट वाटावी किंवा गावात पाणी नाही म्हणून गावातल्या पोरांची लग्नच न व्हावीत किंवा गावंच्या गावं ओसाड पडालेली दिसावीत किंवा कधीकाळी नळांना बदाबदा पाणी यायचं ही इतिहासातली गोष्ट व्हावी आणि ती शिकवताना शिक्षकाच्या तोंडाला फेस यावा किंवा

कृत्रीम पावसाच्या अफवा कृत्रीमपणे विरून जाव्यात किंवा ढगफुटीच्या नुकसानीचे आकडेच लिहिता येऊ नयेत किंवा पावसाच्या कविता लिहिताना काही म्हणता काहीच सुचू नये कवींना किंवा कादंब-यातून पाऊस पळून जावा किंवा रडताना डोळ्यातून थेंबसुद्धा येऊ नये आणि कोरडे डोळे पुसताना कातडी सोलून निघावी किंवा अंगणात फुलझाडं असायची यावर विश्वास बसू नये कुणाचाच किंवा गळक्या छपरातनं घरात पावसाचं पाणी साठायचं हे ऐकून हसत सुटावं ऐकणा-यांनी किंवा चिखलात माणसं रूतून बसायची हे खरं वाटू नये कुणालाच किंवा

भरपूर पाऊस पडण्याचा संकेत म्हणून कावळ्यानं घरटं झाडाच्या शेंड्याऐवजी मध्यावर बांधणंच सोडून द्यावं किंवा काळ्या मुंग्यांच्या रांगाच्या रांगा तोंडात पांढरी अंडी घेऊन आडोशाला निघाव्यात आणि आडोसाच सापडू  नये किंवा छत्री पावसाळ्यात वापरली जायची हा एक विनोदच असावा किंवा हंडामोर्चा काढून तरी हंडाभर पाणी मिळायचं आणि गावात पाण्याचे टँकर यायचे असं ऐकून एखाद्यानं खो खो हसावं किंवा

तांब्या कळशी घेऊन विहिरीत उतरलेलं कुणीतरी पाय घसरून विहिरीत पडल्यावर मरतानाही घोटभर पाणी मिळू नये किंवा पाणलोट क्षेत्र विकासासाठी कोटीच्या कोटी रुपये खर्च केले जायचे असे लेखी पुरावे सापडावे आणि ते उगीचच पाहून पुन्हा नीट ठेवले जावेत किंवा पेर्ते व्हा असं पावशाला ओरडताच येऊ नये किंवा

लेकीच्या लग्नात तुळशीला पाणी घालणा-या माऊलीनंही पाण्याचा हात आखडता घ्यावा किंवा पावसाळा हा ऋतूच नाहीसा व्हावा किंवा पाणी चोरीला जाण्याच्या भितीनं डोळ्याला डोळा लागू नये माणसांचा किंवा तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल असं कुणीतरी भाकीत करावं आणि ते शंभर टक्के खरं व्हावं किंवा ही अशी पावसाच्या संदर्भांची यादी संपता संपू नये.

पुन्हा पावसाच्या नादानं झाली ना दमछाक ! अशा किंवा यापेक्षा आणखी वेगळ्या पावसाच्या रूपाचा आपल्याला अनुभव आलेला असतो. दिवसेंदिवस वेगळंच वातावरण तयार होत आहे. एकाच दिवसात तिन्ही ऋतू बघायला मिळतात.

निसर्गाचा आणि जगण्याचा मेळ कसा बसवायचा ते कळत नाही. जंगलांवर पडलेली कु-हाड अशी आपल्याच पायावर पडलेली आहे. माणूस निसर्गाचा भाग आहे हे विसरून गेलो आपण. जोपर्यंत माणूस निसर्गानं दिलेल्या हातापायांच्या आधारानं हवं ते त्याच्यापासून मिळवत होता तोपर्यंत माणूस निसर्गमित्र होता. मात्र अविरत धडपड करून माणसानं अशा काही उर्जांचा शोध लावला की निसर्गाला गुलाम केलं,

निसर्गरचनेत  ढवळाढवळ केली. स्वार्थासाठी निसर्गाचा -हास केला. मग आता घासभर अन्न आणि थेंबभर पाणी यासाठी निसर्ग माणसाला वेठीस धरू लागला यात नवल नाही.

मातीच्या घरातून सिमेंटच्या घरात आलेला माणूस खुर्चीवर बसल्याबसल्या घामाघूम होतो. रस्ते, औद्योगिकीकरण, प्रगती, तंत्रज्ञान यांच्या आड दडलेला निसर्ग काही दिवसांच्या सहलीतून दिसतो.

पण पुन्हा निसर्गाचं देणंघेणं नसतं. आपण मोठी झाडं तोडली. कुंडीत झाडं लावली आणि स्वतःचं समाधान केलं. ओलसावट होते म्हणून बांध भुंडे केले. एक झाड तोडलं म्हणजे कित्येक सजीवांचा आसरा नाहीसा केला.

पाणी वाचवणं हे आपलं काम नाही असं हात झटकून मोकळे झालो म्हणून पाण्यानं आपल्याला गोत्यात आणलं. आपण आपल्या अज्ञानाच्या पडद्याआड भोळेपणाचं सोंग घेऊन उपसत राहिलो सृष्टीला.

पण आता  प्रत्येकानं जागं होण्याची वेळ आलेली आहे. ही सुरूवात स्वतःपासून केली तरच आपण पुढच्या पिढीसाठी निसर्ग शिल्लक ठेवू. नाहीतर पावसाच्या आठवणी जशा आपली दमछाक करतात तसा निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याला हैराण करणार आहे. काही तज्ञ मंडळी पर्यावरणासाठी चांगल्या गोष्टी शोधत असतात.

सांगत असतात. आपण ते अनुसरले पाहिजे. तरच पाऊस कसा असतो या लेकरांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकू. नाहीतर म्हातारबाबासारखं आभाळाला ढेकळं फेकून मारणा-यांत आपण एक असू.  भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गाइतका माहीर कुणीच नाही !

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT