Agri Expo 2024 : शेतीकामे करणारा ‘इलेक्ट्रिक’ बैल`
पुण्यातील ‘क्रिशीगती’ कंपनीतर्फे विकसित इलेक्ट्रिक अर्थात विजेवरील बैल प्रदर्शनातील आकर्षण ठरला आहे. हा बैल आंतरमशागत, पिकास माती लावणे, फवारणी, पेरणी आदी कामे करू शकतो.
एक व्यक्ती हा बैल चालवू शकतो. नेहमीच्या बैलांकरवी जी कामे करण्यासाठी पाच- सहा तासापासून ते एक दिवस लागतो ती कामे हा बैल अवघ्या काही तासात करू शकतो . त्याच्याद्वारे काम करताना शेतात वाफसा स्थिती आवश्यक आहे.
प्रामुख्याने मका, हरभरा, कापूस, द्राक्ष आदी पिकांत हा बैल काम करू शकतो. बैलावर आधारित हे बहुउद्देशीय यंत्र विजेवर किंवा ‘चार्जिंग’वर कार्य करते. त्यास कॅमेरा व अन्य आधुनिक यंत्रणाही आहे. मोबाईल ॲपवर आधारित ते कार्य करते. मजूर टंचाईवर चांगला उपाय शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानातून मिळण्याची सोय झाली आहे.
शेतकऱ्यांचा ओढा शेतीच्या पुस्तकांकडे
छत्रपती संभाजीनगर - शेतीविषयक विविध ज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी कृषी प्रदर्शनात घेत आहेतच. पण कृषीसह अन्य विविध विषयांवरील पुस्तकांच्या स्टॉल्सवरही शेतकरी आवर्जून थांबून त्यांची खरेदी करताना दिसत आहेत. प्रदर्शनातील सकाळ प्रकाशनाच्या कृषी विषयक पुस्तकांमध्ये विविध पुस्तकांचा समावेश आहे.
यात ऊस, द्राक्षे, संत्रा, सोयाबीन आदी पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, देशी गोवंश, मत्स्यसंवर्धन, दुग्ध तंत्रज्ञान, कांदा निर्यात, बांबू, अळिंबी लागवड, शेतीचे कायदे, जमीन सुधारणा, शेतकरी गाइड, पंचायतराज, अवशेषमुक्त तसेच सेंद्रिय शेती आदीं विषयांचा त्यात समावेश आहे.
ॲग्रोवनच्या स्टॉलवर सवलतीच्या दरात दिवाळी अंक (२०२३) तसेच २०२४ वर्षाची दिनदर्शिका उपलब्ध आहे. ॲग्रोवनच्या वार्षिक वर्गणीदारांची नोंदणीही या स्टॉलवर सुरु आहे. प्रदर्शनात अन्य प्रकाशनांचे स्टॉल असून शेतीसह अन्य विविध विषयांवरील पुस्तके खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
`शिवतारा ॲग्रो’ तर्फे ट्रॅक्टर जिंकण्याची योजना
येथील कृषी प्रदर्शनात ‘शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेस ॲण्ड स्पेअर पार्ट’ यांच्या वतीने रोटाव्हेटर आणि शेती अवजारांचे दालन सादर करण्यात आले आहे.
कंपनीतर्फे ११ जानेवारी ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत रोटाव्हेटर खरेदीवर ट्रॅक्टर मोफत देण्याची योजना मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव, हिंगोली व परभणी या जिल्ह्यांसाठी राबविली जात आहे.
‘लकी ड्रॉ’ तर्फे रोटाव्हेटर खरेदीदारास मोठा ट्रॅक्टर दिला जाणार आहे. तर दुसऱ्या विजेत्यास मिनी ट्रॅक्टर दिला जाणार आहे. प्रत्येक रोटाव्हेटर खरेदीवर हमखास भेटवस्तू देखील दिली जात आहे.
कृषी विद्यापीठाकडून ‘मिलेट्स’ विषयी जागृती
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे दालन कृषी प्रदर्शनात आहे. त्याव्दारे आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्षानिमित्त तृणधान्यांचा (मिले्टस) आहारातील समावेश वाढावा यासाठी जनजागृती केली जात आहे.
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ.एस.बी.पवार यांच्या मार्गदर्शनात दालनात वरिष्ठ संशोधन सहाय्यक शीतल कांबळे या शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने बाजरीचे एएचबपी १२००, एएचबी१२६९ हे जस्त व लोहाने युक्त वाण विकसित केले आहेत.
त्याचे तसेच नाचणी, , भगर, राळा, नाचणी, कोद्रा आदींचे नमुनेही शेतकऱ्यांना पाहावयास उपलब्ध केले आहेत. द्रवरूप ट्रायकोडर्मा, ट्रायकोकार्ड देखील दालनात उपलब्ध केले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.