Amaravati News : बियाणे, खते व कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके गठित केली आहेत. जिल्हास्तरावरील कृषिविकास अधिकाऱ्याच्या नेतृत्वातील पथकासह चौदा तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकांची नियुक्ती केली आहे.
खरीप हंगामास लवकरच सुरवात होत असून शेतकऱ्यांची बियाणे, खते व कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. खुल्या बाजारात वाढीव दराने बियाण्यांची विक्री, खतांच्या विक्रीत लिंकिंग व बोगस कीटकनाशके विकल्या जात असल्याचे प्रकार घडतात.
कृत्रिम टंचाई निर्माण करून कृषिनिविष्ठांचे दर वाढविण्यात येतात. या गैरप्रकारांवर आळा घालण्याचे काम भरारी पथक करणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कृषिविकास अधिकारी मल्ला तोडकर यांची पथक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वीराग देशमुख सचिव आहेत.
तालुकासत्रावर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथक गठित करण्यात आले आहेत, तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत. हंगामात या पथकाला कृषी निविष्ठांचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गत हंगामातील कारवाई
बियाणे ः३ खते ः ३ कीटकनाशक ः१ (फौजदारी गुन्हे दाखल)
त्रुटी आढळल्याने परवाने रद्द ः ९८
अप्रमाणित बियाणे ः ३७ नमुने
कारवाईस पात्र कंपनी ः १० (कोर्ट केस)
अप्रमाणित खते ः ६२ नमुने
कारवाईस पात्र कंपनी ः ४३ नमुने (कोर्ट केस)
अप्रमाणित कीटकनाशके ः ७ नमुने
कारवाईस पात्र कंपनी ः ४ (कोर्ट केस)
शेतकऱ्यांनी त्यांच्या परिसरात अनधिकृत बियाणे, बोगस भेसळयुक्त खते किंवा बोगस कीटकनाशकांची विक्री होत असल्यास आपल्या तालुक्यातील भरारी पथकाला त्वरित संपर्क करावा तसेच बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशकांची खरेदी अधिकृत परवानाधारक कृषिसेवा केंद्रातूनच करावी व त्याची रीतसर पावती जपून ठेवावी.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.