Inter-Crop Study
Inter-Crop Study Agrowon
ॲग्रो विशेष

Inter-Crop Study : बारा धान्य आंतरपीक पद्धतीचा अभ्यास

टीम ॲग्रोवन

सिद्धेश साकोरे

भरड धान्ये ही पारंपरिक धान्य पिके (Traditional grain crops) आहेत. यांचा आहारात समावेश केल्याने भरपूर पोषणमूल्ये (Minerals) आपल्याला मिळतात. अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा आणि चारा सुरक्षा भरडधान्य पूर्ण करतात, म्हणून या पिकाचे खूप महत्त्व आहे. यासाठी बारा धान्य आंतरपीक पद्धती (Inter-Crop Technique) खूप जुनी आणि वातावरणनुसार खूप मोठ्या कालावधीमध्ये विकसित झालेली आहे. या पीक पद्धतीला चालना देणे गरजेचे आहे.

कोरडवाहू आणि पावसावर आधारित असलेल्या शेतीमध्ये जास्त प्रमाणात भरड धान्ये, डाळी, कडधान्ये आणि तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते. ॲग्रो रेंजर्स या संस्थेने पुण्याच्या बारा दुष्काळग्रस्त गावांमध्ये जुन्या पिकांचा अभ्यास आणि तिथे लागवड होणाऱ्या पिकांचे सर्वेक्षण केले होते. संस्थेतील सदस्यांनी बारा गावांमध्ये होणाऱ्या जुन्या शेती पद्धतीचा अभ्यास केला. या सर्वेक्षणामध्ये बारा धान्य आंतर पीकपद्धती ही खूप जुनी पीक पद्धती आढळून आली.

ॲग्रो रेंजर्स ही संस्था पुण्याच्या कोरडवाहू आणि पावसावर आधारित शेती असलेल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये काम करते. ही संस्था प्रामुख्याने शेतकऱ्यांना पुनरुत्पादन जैविक शेतीचे प्रशिक्षण आणि सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचे प्रशिक्षण देते. यातून प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क वाढला. यातून विविध पीक पद्धतींचा अभ्यास करण्यात आला.

सध्या काळाच्या ओघात बारा धान्य पीक पद्धती कोणताही शेतकरी वापरात नाही. या पूर्ण पीक पद्धतीमध्ये अकरा प्रकारची वेगवेगळी धान्य आंतरपिके म्हणून एक मुख्य पिकासोबत घेतली जातात. मुख्य पीक हे बाजरी जे भरडधान्य आहे आणि त्यामध्ये नऊ प्रकारची कडधान्ये, डाळी, बीन्स, अशा प्रकारची आंतरपिके मोग्याने पेरली जायची. या मॉडेलमध्ये कडेने एका बाजूने कारळे या पिकाची आणि दुसऱ्या बाजूने अंबाडी या पिकाची आडतास पाभरीने पेरणी केली जायची. ही आडतासाची पिके मुख्य पिकांचे जनावरांपासून संरक्षण करायचे काम करतात, कारण ही पिके चवीला कडू असल्यामुळे जनावरे तोंड लावत नाही.

अन्न आणि चारा सुरक्षा ः

१) पूर्ण बारा धान्यामध्ये बाजरी हे मुख्य पीक पाभरीने पेरले जायचे आणि ९ प्रकारची कडधान्ये जसे की, काळा वाल, लाल फरशी वाल, मूग, उडीद, तूर, हुलगा, मटकी, गौळी फरशी वाल, ही पिके मोग्याने पेरली जायची म्हणजेच आंतरपीक म्हणून पेरली जायची. या सगळ्या मॉडेलच्या कडेने एका बाजूने पूर्ण पाभरीने कारळे पेरले जायचे तर दुसऱ्या बाजूने अंबाडी पेरली जायची. अशा या बारा धान्याच्या एकत्र पीक पद्धतीला ‘बारा धान्य आंतरपीक पद्धती‘ म्हणतात.

२) ही सर्व बारा धान्यातील पिके शेतकऱ्याच्या पूर्ण वर्षभराच्या अन्न आणि पोषण सुरक्षेची काळजी घेण्याच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. काही जुन्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार किती पण दुष्काळ पडला किंवा जास्त पाऊस जरी झाला तरी ही पिके तग धरायची. यावरूनच या पिकांची बदलत्या वातावरण तग धरून राहण्याची क्षमता समजून येते. या पीक पद्धतीमध्ये खूपच खराब वातावरणामुळे एखादं दोन पिके वाया जायची परंतु इतर पिकातून पूर्ण वर्षभरासाठी धान्याचा साठा होऊन जायचा. या भागात मागच्या १० वर्षामध्ये सरासरी फक्त २३० मिमी प्रति वर्ष इतका कमी पाऊस झाला आहे. कमी पाण्यात तग धरणाऱ्या या पिकांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

३) बारा धान्य आंतरपीक पद्धतीमध्ये फक्त शेतकऱ्यांची अन्नसुरक्षाच नाही तर जनावरांची चारा सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली जाते. ही पीक पद्धती खूप जुनी आणि वातावरणनुसार खूप मोठ्या कालावधीमध्ये विकसित झालेली आहे. परंतु अलीकडच्या काळातील एक पीक पद्धतीमुळे देशी बियाणे आणि जुनी आंतरपीक पद्धती खूप कमी शेतकरी शेतीत अवलंबतात. बहुतेक देशी बियाणे आता मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. ॲग्रो रेंजर्स या संस्थेने जुनी देशी बियाणे खूप साऱ्या शेतकऱ्यांकडून गोळा करून बारा धान्य आंतरपीक पद्धतीचे पूर्णपणे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले आहे. नवीन ट्रॅक्टर पेरणी यंत्रामध्ये मोघण्याची सुविधा नसल्यामुळे बैलांनी याची पेरणी केली आणि नवीन मोघे बनवून आंतरपिकांची पेरणी करण्यात आली.

४) संस्थेने पीक पद्धतीच्या बरोबरीने ग्राहक वर्गासाठी भरडधान्य पिकांबद्दल जनजागृतीचे काम सुरू केले आहे. भरड धान्याच्या वातावरण बदलामध्ये तग धरण्याच्या क्षमतेमुळे ही पिके भविष्यामध्ये येणाऱ्या अन्न सुरक्षेची काळजी घेऊ शकतात. ही पिके वातावरण बदल विरोधी, कमी पाणी, कमी मजूर आणि कमी खते यामध्ये येत असल्यामुळे या पिकांचे महत्त्व शेतकऱ्यांसाठी पटवून देण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न सुरू आहेत.

भरडधान्य महोत्सवातून जागृती ः

भरड धान्य ही पारंपरिक धान्ये असून यांचा आहारात समावेश केल्याने भरपूर पोषण मूल्ये आपल्याला मिळतात. अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा आणि चारा सुरक्षा भरडधान्य पूर्ण करतात, म्हणून या पिकाचे महत्त्व खूप आहे.

शेतकऱ्यांना भरडधान्य लागवडीबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी चांगले मार्केट मिळवून देणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या भरडधान्याला चांगली मागणी आणि बाजारभाव मिळून देण्यासाठी संस्थेने एक दिवसीय भरडधान्य महोत्सव पुणे येथे आयोजित केला होता. भरड धान्यांबद्दल ग्राहक वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी ॲग्रो रेंजर्स या संस्थेने इंद्रधनुष्य युवा सामाजिक संस्था आणि शेकरू या संस्थांसोबत मिळून एक दिवसीय ‘मिलेट जत्रा‘ कार्यक्रम आयोजित केला होता. या एक दिवसीय प्रदर्शनामध्ये सामाजिक संस्था, महिला बचत गट, कृषी विज्ञान केंद्र, महिला उद्योजक, भरडधान्य उद्योजक, शेतकरी, ग्राहक, पोलिसी मेकर्स, कॉर्पोरेट्स, इत्यादी, समूहांनी सहभाग घेतला.

या उपक्रमामध्ये भरडधान्यापासून बनवलेली बहुविविध मूल्यवर्धित उत्पादने विविध उद्योजकांनी आणलेली होती. भरधान्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ यावेळी उपलब्ध करून देण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मोनालिसा कलाग्राम च्या लिसा पिंगळे आणि प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी केले होते. ग्राहकांना भरड धान्याबद्दल जागृती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भरडधान्याला चांगले बाजारभाव मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

संपर्क ः सिद्धेश साकोरे, ७७०९९२०१५५

( लेखक ॲग्रो रेंजर्स संस्थेचे संस्थापक आणि संचालक असून भरडधान्य पिकाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT