नगर ः नगर विभागात सुरू असलेल्या सव्वीस साखर कारखान्याकडे (Sugar Mills) आतापर्यंत गाळप (Sugarcane Crushing) केलेल्या उसाच्या रकमेपैकी २९० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. सव्वीसपैकी आतापर्यंत दहा कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी (Sugarcane FRP) अदा केलेली आहे.
आतापर्यंत ८१ लाख टनांपर्यंत गाळप झाले असले, तरी आतापर्यंत ६३ लाख टनांची एफआरपी रकमेतून एवढी रक्कम मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
नगर जिल्ह्यात १३ सहकारी व ८ खासगी असे २१ साखर कारखाने, तर नाशिक जिल्ह्यात चार सहकारी व एक खासगी असे पाच कारखाने सुरू आहे. विभागात एकूण २६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ८१ लाख टनांच्या पुढे उसाचे गाळप गेले आहे.
गतवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न झाला होता. त्यामुळे मिळेल त्या दरात शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस दिला. यंदा मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. अनेक कारखान्यांनी बऱ्यापैकी एफआरपी दिल्याचे दिसत आहे.
नगर विभागात दररोज एक लाख टन उसाची गाळप क्षमता आहे. उसाचे गाळप झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत किमान एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. त्याबाबत मात्र अजूनही अनेक कारखाने गांभिर्याने घेतले जात नसल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत ८१ लाख टन गाळप झाले असले, तरी साखर ६३ लाख उसाचा हिशेब करता निश्चित केलेल्या एकूण एफआरपी १४४० कोटी देणे आहेत. त्यातील ११४९ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत.
अजून २९० कोटी ३७ लाख रुपयांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दहा कारखान्यांनी शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली. ३० डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपाचा विचार करता अगस्ती (अकोले), अशोक (श्रीरामपूर) कारखान्याने ४८ टक्के, पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने ६७ टक्के, कुकडी कारखान्याने ४२ टक्के, गणेश (राहाता) कारखान्याने ४४ तर सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने ९५ टक्के रक्कम दिली.
मुळाने ५१ टक्के, वृद्धेश्वरने ६५ टक्के, केदारेश्वरने ४७ टक्के, पीयूषने ५४ टक्के, जयश्रीरामने ९८, गंगामाई कारखान्याने ६८ टक्के, यूटेकने ४४ टक्के, धाराशीव ६८ टक्के, कादवा ने ८८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली.
शंभर टक्के एफआरपी देणारे साखर कारखाने
लोकनेते मारुतराव घुले पाटील (भेंडा, ता. नेवासा), प्रसाद शुगर वांबोरी (ता. राहुरी), कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी, ता. कोपरगाव), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव), अंबालिका (राशीन, ता. कर्जत), साजन शुगर (देवदैठण, ता. श्रीगोंदा), द्वारकाधीश (सटाणा, नाशिक), अशोकराव बनकर (निफाड, जि. नगर), संत जनार्दन स्वामीनगर (पळसे, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.