Drought Hits : राज्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे पिके हाताबाहेर जात आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. राज्यातील ३७३ गावे, १ हजार ४२२ वाड्या तहानल्या आहेत. भर पावसाळ्यात ऑगस्टमध्ये तब्बल ३९३ टँकरद्वारे पाणी पुरविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे २५ हून अधिक जिल्ह्यांतील पिकांनी माना टाकल्या आहेत. तेथे उत्पादकतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिके हातातून जात असताना आता पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शेतीसाठी अनेक ठिकाणी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती या विभागांत अनुक्रमे ३१.५१, ७८.९१ आणि ७०.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऑगस्टमधील तब्बल २८ दिवस पावसाविना गेले आहेत. त्यामुळे जनावारांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचे संकट वाढत चालले आहे.
टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच असून मागील आठवड्यात ३५० गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यात ३० गावांची भर पडली आहे. ३७० गावांना मंगळवारअखेर (ता. २९) टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच मागील आठवड्यात १३१९ वाड्या टंचाईग्रस्त होत्या. त्यात १०३ वाड्यांची भर पडली असून, सध्या १ हजार ४२२ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. ८ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अभूतपूर्व टंचाईला सामोरे जावे लागू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सध्या केवळ ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. नाशिकमध्ये ७५ गावे आणि ६२ वाड्या, जळगावमध्ये १३ गावे, नगरमध्ये ३३ गावे आणि ३७९ वाड्या तहानल्या आहेत. पुणे जिल्ह्यात ३४ गावे आणि ७७४ वाड्या, साताऱ्यातील ७८ गावे आणि ४०० वाड्या, सांगलीतील २९ गावे आणि १७६ वाड्या, सोलापुरातील ११ गावे आणि ९० वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा आहे. पुणे विभागातील १५२ गावे आणि ९६० इतक्या सर्वाधिक वाड्या तहानल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० गावे आणि चार वाड्या, जालन्यात २३ गावे आणि १८ वाड्या अशी ५३ गावे आणि २२ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बुलडाण्यात चार गावे तहानली आहेत. टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ एका दिवसात नगर जिल्ह्यातील १९ वाड्या आणि ९ गावांची भर पडली आहे. ही संख्या वेगाने वाढत असून, पावसाने अशीच ओढ दिल्यास पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणखी वाढत जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.