Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

यंदा खरीप पेरण्या ३३ टक्के पिछाडीवर

राज्यात लांबलेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १५ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्या यंदा ३३ टक्क्यांनी पिछाडीवर आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात लांबलेल्या पावसामुळे (Delayed Rain) आतापर्यंत केवळ १५ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या (Kharif Sowing) झाल्या आहेत. त्या यंदा ३३ टक्क्यांनी पिछाडीवर आहेत. मात्र शेतकरी पावसाचा अंदाज (Rain Prediction) घेत नियोजन करीत असल्यामुळे दुबार पेरण्यांची (Resowing) स्थिती अद्याप तरी उद्भवलेली नाही, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या (Department Of Agriculture) सूत्रांनी दिली.

१४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात खरिपाचा पेरा होतो. त्यात सोयाबीन, कापूस, धान, कडधान्ये ही मुख्य पिके आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या रखडलेल्या आहेत. “२३ जूनपर्यंत राज्यात १५.३० लाख हेक्टरपर्यंत खरीप पेरण्या झाल्या आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत २३ लाख हेक्टरच्या पुढे पेरा झाला होता,” अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

जूनमध्ये आतापर्यंत सरासरी २०७ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. परंतु केवळ ४१ टक्के पाऊस झाला असून, तो ८५.६ मिलिमीटर आहे. सरासरीपेक्षाही सर्वात कमी पाऊस पुणे विभागात असून तो २६ टक्के आहे. औरंगाबाद व लातूर भागात मात्र ६५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. गेल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. मात्र चालू आठवड्यात अनेक भागांत पेरण्यांपुरता पाऊस झालेला आहे. पावसाची वाटचाल पुढे व्यवस्थित चालू राहिल्यास १५ जुलैपर्यंत बहुतेक पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या असतील, असा अंदाज कृषी विभाग व्यक्त करीत आहे.

सोयाबीन, कपाशीची पेरणी सुरू

७५ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यानंतर किंवा चांगला ओलावा पाहूनच पेरण्या कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम पेरण्या करण्याची घाई केलेली नाही. सोयाबीन व कपाशीचा पेरा काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. मराठवाड्यात नांदेडसारख्या काही भागांत कपाशीची उगवण चांगली दिसते आहे. कृषी आयुक्त धीरज कुमार पुढील २-३ दिवसांत मराठवाड्यातील काही गावांना भेटी देत खरीप स्थितीचा आढावा घेणार आहेत.

“राज्यात लांबलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. मात्र चिंता करण्यासारखे चित्र सध्या तरी दिसत नाही. अनेक भागांमध्ये पेरण्या करण्यापुरता पाऊस होत असल्यामुळे शेतकरी सावधपणे पेरा करीत आहेत. आतापर्यंत कुठेही दुबार पेरण्याची स्थिती उद्‍भवलेली नाही.”
धीरज कुमार, कृषी आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT