Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : पदोन्नती रखडवल्याने आंदोलनाला सुरुवात

दोन अधिकाऱ्यांचे कृषी खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील कृषी उपसंचालकांच्या पदोन्नतीची फाइल एका मंत्र्याने दाबून ठेवल्यामुळे अधिकारी संतप्त झाले आहेत. विशिष्ट हेतूने पदोन्नती रखवल्याच्या निषेधार्थ आता अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यातील दोघांनी अतिरिक्त पदभार सोडत असल्याचे पत्र कृषी खात्याच्या ( Agriculture Department) प्रधान सचिवांना दिले आहे.

राज्यातील ८१ उपसंचालकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) पदावर बढती देण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र, एका मंत्र्याने पदोन्नतीची फाइल हेतूतः दाबून ठेवल्याची चर्चा आहे. यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेले काही उपसंचालक हक्काची पदोन्नती न मिळताच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे उर्वरित उपसंचालक अस्वस्थ आहेत.

पदोन्नती प्रक्रियेच्या आडून या अधिकाऱ्यांकडून काही बिदागी मिळते का, याची चाचपणी काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळेच पदोन्नतीचे आदेश जारी केले जात नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी सेवा वर्ग एक श्रेणी अधिकारी कल्याणकारी संघटनेने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन यापूर्वीच राज्य शासनाला दिले होते.

त्यानुसार आता डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे उपसंचालक आरिफ शाह यांनी अकोला आत्मा विभागाच्या प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोडत असल्याचे पत्र कृषी सचिवांना दिले आहे. त्याचबरोबर अकोला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनीही अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार एक जानेवारीपासून एकतर्फी सोडत असल्याचे कृषी आयुक्तांना कळविले आहे.

‘‘सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती देण्यात विलंब केला जात आहे. पदोन्नतीची वाट पहात काही अधिकारी निवृत्त झाले. दिरंगाईतून हे घडत असून अधिकाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. शासनाच्या उदासीन धोरणाच्या व दिरंगाईच्या निषेधार्थ अधिकारी संघटनेच्या समर्थनार्थ मी पदभार सोडत आहे,’’ असे श्री. इंगळे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या उपसंचालकांनीही अशीच तक्रार करणारे पत्र दिले आहे. कृषी आयुक्तालयात सध्या या पत्रांची जोरदार चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची फाइल दाबून ठेवणारा राजकीय नेता कोण, असा प्रश्न आता कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT