Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : नव्या पिढीने उद्योगाकडे लक्ष दिले पाहिजे ः शरद पवार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण डोक्यात ठेऊन चालणार नाही. तर उद्योगाकडे लक्ष दिले पाहिजे. आरक्षणाकडून अर्थकारणाची भूमिका नव्या पिढीसमोर मांडली पाहिजे. आजच्या काळात संघटनांनी कोणत्या दिशेने जावे याची खबरदारी घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आरक्षणाकडून अर्थकारणाची भूमिका घेतली. नव्या पिढीसाठी हा बदल दिशा देणारा आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे बुधवारी (ता. २८) बोलत होते. या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. मा. म. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंके, सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, ‘‘समाज पुढे नेण्यासाठी महिलांना वगळून चालणार नाही. त्यांना ५० टक्के स्थान दिले पाहिजे. कर्तृत्वाची संधी मिळाली तर महिला कामगिरी करू शकतात. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन द्या. संधी दिल्यास कुटुंब बदलेल. आता संभाजी ब्रिगेडने स्वतंत्र महिला ब्रिगेड काढावी, अशी सूचना केली. मुलींना प्रोत्साहित केल्यास याच सावित्री, जिजाऊंच्या लेकी वेगळे स्थान निर्माण करतील. तेव्हा आपण नवा इतिहास तयार करू.’’

मराठा म्हटले की वेगळी चर्चा सुरू होते. परंतु मराठा म्हणजे मराठी, उपेक्षित, गरीब माणूस. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा आणि त्यांची उन्नती करणारा असा हा मराठा आहे. आता एका कुटुंबातील एकाने शेती तर दुसऱ्याने दुसरा व्यवसाय करावा, असा सल्ला देताना पंजाबमध्ये शिखांमधील एक व्यक्ती शेती करतो, तर दुसरा देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उद्योग व्यवसाय करतो असे उदाहरण देऊन पवार म्हणाले, ‘पानिपत युद्धातील पराभवानंतर तेथे गेलेले मराठा बांधव ज्यांना ‘रोड मराठी’ म्हटले जाते. त्यांनी शेती बरोबरच नवे उद्योग व्यवसाय उभे केले. उद्योग व्यवसायाची ही शिकवण शेतीबरोबरच आपल्याला छत्रपती शाहू महाराजांनी दिली आहे. फुले, आंबेडकर यांच्यासोबत शाहू महाराज यांचेही विचार सोबत ठेवले पाहिजे, असाही सल्ला द्यायला पवार विसरले नाहीत.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, संभाजी ब्रिगेडने सातत्याने केलेली चळवळ ही प्रभावी ठरली आहे. समाजाला योग्य व वेगळी दिशा देण्याची गरज बनली आहे. आपण आरक्षणासाठी सर्वजण भांडत आहोत. पण त्यावर फार अवलंबून राहू नये, अशी अपेक्षा आहे. आता आपण अमेरिका ते कॅनडा पर्यंत जात आहोत. पण काहींनी पुन्हा परत येऊन मार्गदर्शन करावे, जेणेकरून हा समाज एका उंचीपर्यंत जाईल. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतलेला आहे. चुकीचा इतिहास लिहीत असेल तर ते चालणार नाही. नंतरच्या काळात ही असेच प्रकार चालू असून त्यासाठी बहुजन समाज पुढे येत आहे. सध्या संविधानाला डावलून काही चुकीच्या पद्धतीने काम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण ते हाणून पाडण्याचे काम केले जात आहे.

ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे म्हणाले की, इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहास जाणून घेऊन भविष्याचा वेध उज्ज्वल करण्यासाठी तरुण काम करत आहे. शिक्षण क्षेत्रात काम करताना तरुणांमध्ये निराशा असल्याचे दिसून येते. त्याची आजही तळमळ असून ती भरून काढण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केली जात आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार म्हणाले की, ‘‘संघटनेने आता कात टाकली आहे. याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. यापुढे संघटनेने बिझनेस कम्युनिटी हे ध्येय घेऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अनेक अडचणी येणार आहेत. मात्र, त्या अडचणीवर मात करून पुढे जावे लागणार आहे. आज संभाजी ब्रिगेड ही प्रत्येक खेड्यात गेली आहे. सामाजिक कार्याची जोड घालून दिली आहे. त्यामुळे येथून पुढे समाजाला सांगून प्रत्येक मुलीच्या लग्नात पुस्तकाचे ग्रंथालय दिले पाहिजे, ते अंमलात आले पाहिजे. तसेच फेटा हा सामान्य माणसाचे प्रतीक आहे. त्याची कोल्हापूरमध्ये अंमलबजावणी केली जाईल. शाहू महाराजांचे जीवन ग्रंथ हा विविध भाषेत प्रसिद्ध होत आहे. अधिवेशनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी प्रास्तविक व आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT