Jalgaon News : खानदेशात मागील आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर पूर्वहंगामी कापूस पिकात पातेगळ वाढली आहे. शेतकरी ही समस्या थांबविण्यासाठी बुरशीनाशके, अळीनाशके, कीडनाशके, संप्रेरके आदींचा उपयोग करीत असून, यात उत्पादन खर्च वाढला आहे.
खानदेशात मागील आठवड्यात म्हणजेच ५ ते ८ सप्टेंबर या दरम्यान चांगला पाऊस झाला. काही भागांत पाऊसमान कमी होते. परंतु काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती सुधारली. पिकांना जीवदान मिळाले. शनिवारी (ता. ९) पावसाने विश्रांती घेतली. सोमवारी(ता. ११) व मंगळवारी (ता. १२) बऱ्यापैकी सूर्यप्रकाशीत वातावरण होते.
याच कालावधीत पिकात पातेगळ अधिकची झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मंगळवारी व बुधवारी (ता. १४) फवारणी हाती घेतली. एका झाडानजीक १५ ते १८ पात्यांची गळ सरासरी झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात ही समस्या अधिक आहे. ही समस्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी लागलीच बुरशीनाशके, कीडनाशके, अळीनाशके, संप्रेरके, अन्नघटक आदींची फवारणी हाती घेतली.
यात एकरी दीड हजारावर खर्च अनेकांना येत आहे. पूर्वहंगामी कापूस पीक आता पाते लगडण्यासह कैऱ्या किंवा फळे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात १५ ते १६ दिवसांनी वेचणीदेखील करावी लागेल.
परंतु अशातच पाते गळ होत असल्याने उत्पादनावर परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खानदेशात कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यात पूर्वहंगामी कापसाची सुमारे दीड लाख हेक्टरवर लागवड झाली असून, पीकस्थिती बरी आहे.
पातेगळ झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. हलक्या, मध्यम जमिनीत पातेगळची समस्या अधिक आहे. काळ्या कसदार जमिनीत ही समस्या कमी आहे.- जी. डी. पाटील, शेतकरी, रेल, जि. जळगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.